किल्ले लोहगड
































लोणावळा येथे १५ व १६ फेब्रुवारी रोजी आयोजित योगप्रशिक्षण कार्यशाळेसाठी कार्यालयीन सहकाऱ्यांसमवेत उपस्थित राहण्याचा योग आला. रविवारी १६ तारखेला प्रशिक्षणाची समाप्ती झाल्यावर सायंकाळी तेथून जवळच असलेल्या मावळ तालुक्यातील ऐतिहासिक लोहगडास भेट देण्याचा प्लॅन तयार झाला व लगेच लोणावळ्याकडून आम्ही थेट लोहगडकडे कूच केली. साधारणतः अर्ध्या तासातच आम्ही डोंगरमाथ्यावरील काहीशी अवघड अशी नागमोडी वळणे चढत साधारणतः चारच्या सुमारास किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. थोडा अल्पोपहार व मुबलक पाणी सोबत घेऊन गड चढायला सुरुवात केली. गड चढण्यासाठी येथे पायऱ्यांची व्यवस्था असल्यामुळे अनेक हौशी पर्यटक आपल्या कुटुंबासह या गडाचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून येत असल्याचे दिसून आले. यात सर्व वयोगटातील महिलांची व विद्यार्थ्यांची संख्याही विशेषत्वाने आढळून आली. साधारणतः ४० मिनिटात पायऱ्या चढून आम्ही गडाच्या पहिल्या दरवाज्यापर्यंत पोहोचलो. सर्वात मजबूत व अभेद्य असा हा गड लोहगड या नावाला शोभेल असाच होता. येथील दगड, बुरुज व महाकाय दरवाजे तसेच शत्रूंना हेरण्यासाठी गडावर केलेली विशिष्ट रचना मन मोहून टाकते. अनेक ऐतिहासिक घटनांची व पात्रांची साक्ष असलेला हा गड आम्हा सर्वांना भुरळ घालत होता. गडाची अभेद्यता लक्षात घेता महाराजांनी सुरत लुटीनंतर आणलेला खजिना लपवण्यासाठी या गडाचा वापर केला असल्याचे येथील संदर्भांवरून आढळून येते. यासाठी गडावर डोंगर पोखरून दगडी बांधकामाची लक्ष्मी कोठी तयार करण्यात आली आहे. १६६५ साली शिवाजी महाराजांनी तहात गमावलेल्या २३ किल्ल्यांमध्ये हा किल्ला होता. शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानानंतर कोंढाणा उर्फ सिंहगड काबीज केल्यानंतर १६७० साली महाराजांनी लोहगड देखील पुन्हा जिंकून स्वराज्यात आणला. गडावर शिवशंकर महादेवाच्या मंदिराबरोबर काही कबरीदेखील आढळतात जे महाराजांच्या सर्वसमावेशक व्यापक दृष्टीकोनाचे दर्शन घडवतात. आम्ही संपूर्ण गडाची टेहळणी करत मनसोक्त भटकंती केली. गडाची व गडावरून दिसणारी विहंगम दृश्ये नजरेबरोबर मोबाईलच्या कॅमेऱ्यातही टिपली. अगदी ज्या ठिकाणी शिक्षा म्हणून कडेलोट व्हायचा त्या विंचुकड्यापर्यंत पोहोचलो मात्र सायंकाळचे पाच वाजून गेलेले असल्यामुळे व सहाच्या सुमारास गडाचे दरवाजे बंद करण्याची वेळ असल्यामुळे येथे तैनात सुरक्षा रक्षकांनी विंचूकड्याच्या टोकापर्यंत जाण्यास प्रवेश नाकारला. त्यानंतर आम्ही माघारी फिरलो व परतीच्या मार्गाला लागलो. गडाच्या विस्तीर्ण परिसरावर अनेक ठिकाणी असलेल्या भूमिगत जलशयांपैकी एके ठिकाणी पिण्याचे पाणी अशी पाटी वाचली. तेथील पाणी पिल्यानंतर ते अत्यंत शुद्ध व शीतल असल्याचा अनुभव आम्ही घेतला. साधारण अर्ध्या तासाच्या कालावधीत आम्ही गड उतरलो. छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचा इतिहास जिवंत करणाऱ्या लोहगड या ऐतिहासिक किल्ल्याला भेट देण्याची बऱ्याच वर्षांपासूनची आमची इच्छा पूर्ण झाली होती व याच तृप्ततेच्या हर्षोल्लासाने आम्ही मुंबईच्या दिशेने परतीच्या मार्गाला लागलो. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त