सकारात्मक विचारांचे व्यक्तीमत्व - 'सुशील घोसाळकर' - वाढदिवसाच्या शुभेच्छा














आज माझ्या आणखी एका 'खास' मित्राची ओळख आपणा सर्वांना करून देत आहे. सुशील घोसाळकर हा आमच्या लोकल ट्रेनच्या नेहमीच्या डब्यातील ग्रुप मेंबर. गेल्या चार पाच वर्षांपासून सोबत प्रवास करत असल्याने त्याच्यासोबत माझी चांगलीच गट्टी जमली आहे. अनेक घटना, कल्पनांचे आदानप्रदान आम्ही प्रवासात एकमेकांसोबत करत असतो. दक्षिण मुंबईतील एका बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयात कामाला असलेल्या सुशीलला सामाजिक कार्याची भारी आवड आहे. सतत काहीतरी नवनव्या आयडिया घेऊन तो येत असतो ज्यात सामाजिक हिताच्या गोष्टी अधिक लपलेल्या असतात. नुकत्याच आमच्या जॉय ऑफ गिव्हिंगच्या महापे आदिवासी शाळेत झालेल्या विद्यार्थी मदतीच्या उपक्रमात तो सर्व मुलांसाठी चॉकलेट घेऊन सहभागी झाला होता. ठाणे येथे वास्तव्यास राहताना पत्नी व एक मुलगी असे प्रापंचिक आयुष्य सांभाळणाऱ्या सुशीलला मित्रमंडळींचा गोतावळा देखील तितकाच भरभक्कम लाभलेला आहे. मग ती सोसायटी असो, कार्यालय असो, ट्रेन प्रवास असो की गावाकडील सवंगडी असो सर्वत्र मित्रमंडळींच्या गराड्यातच वावरायला त्याला आवडते. यामुळेच लोकल ट्रेनमध्येदेखील विविध वयाचे व विविध प्रोफेशनचे नवनवे मित्र जोडणे हा त्याचा आवडीचा व ठरलेला कार्यक्रम असतो. याच मित्रांच्या माध्यमातून काहीतरी समाजोपयोगी कार्य घडवण्याचा उत्साह त्याच्या अंगात संचारत असतो. ही झाली सुशीलची तोंड ओळख. सामाजिक कार्यातील ओढीतून एक अप्रतिम कार्य साकारले गेल्याची घटना नुकतीच त्याच्या बाबतीत त्याच्या गावाकडे घडली. सुशील मूळचा कोकणातील. मंडणगड तालुक्यातील पाचरळ हे त्याचे जन्मगाव. गावाकडची भारी ओढ असल्याने त्याचे सतत गावी येणे जाणे सुरू असते ज्यायोगे गावातील सवंगड्यांच्या तो चांगलाच संपर्कात असतो. दरवर्षी कोकणात खूप पाऊस पडतो. इतका की काही ठिकाणी पुरमय परिस्थिती असते. हेच पाणी माझ्या मते, अर्ध्या महाराष्ट्राला वर्षभर पुरेल इतके असते. पण ह्याच कोकणात उन्हाळ्यात पाण्याची परिस्थिती बिकट असते. गावक-यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. गावची हीच अडचण हेरून मुंबईकडे राहणाऱ्या सुशीलसारख्या तरुणांनी एकत्र येत "पाणी अडवा पाणी जिरवा" ही संकल्पना सर्वांसमोर मांडली. खरेतर मोठमोठया योजना, संकल्पना आखणे सोपे असते मात्र त्याची प्रत्यक्षात अमलबजावणी मात्र तितकीच कठीण असते. मात्र गावाजवळून पावसाळ्यात भरभरून वाहणारे पावसाचे पाणी अडवण्याची ही कल्पना पाचरळ ग्रामस्थांना भलतीच आवडली व सर्वानुमते ती यशस्वी करण्याचे ठरले. ह्या विषयावर चर्चा झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे लगेचच ७ जुलै २०१८ रोजी मुंबईतील सर्व चाकरमानी गावात पोहोचले. रात्रभर प्रवास करुन सकाळी ५:०० वाजता गावी पोहोचल्यावर सकाळचा चहा आणि नाष्टा करुन सर्वजण ठीक ९:०० वाजता कुलस्वामिनी मंदिरात आणि ग्रामदेवी कालिका माता मंदिरात देवीची प्रार्थना करुन कामासाठी सज्ज झाले. त्यानंतर सुरुवातीला सकाळी १० वाजता गावचे सरपंच व शाळेतील विद्यार्थ्यांसोबत नियोजित कार्यक्रमानुसार ग्रामदेवी कालिका माता मंदिर परिसरात सर्वांनी वृक्षारोपण केले. त्यानंतर नदीवरील पाणी अडवण्याची पुढील मोहीम फत्ते करायची होती. यासाठी ग्रामस्थांनी अगोदरच एका ठीकाणी खडी आणुन ठेवली होती. ती खडी पोत्यात भरुन नदीपर्यंत घेऊन जायची होती. सर्वांनी खडी पोत्यात भरण्यास सुरुवात केली. अनेकांनी त्यासाठी हाताला इजा होऊ नये म्हणून हातमोजे आणले होते त्यामुळे कामालाही वेग आला. हसत खेळत गप्पा मारता मारता खडीची जवळपास १५० पोती भरली गेली. ही पोती टेम्पोत भरुन जिथे नदीचे पाणी अडवायचे होते त्या जागेवर म्हणजे "सोन्न्यावर" (सोन्न्या म्हणजे नदीच्या काठची विशिष्ट जागा) आणली. एक जेसीबी आणण्यात आला. जेसीबीने नदी शेजारील झाडी, नदीतील गाळ आणि मोठ मोठे दगड बाजुला सारले. नंतर ग्रामस्थांनी खडी भरलेली पोती नदीत ठेवण्यास सुरुवात केली. हळुहळु बांध तयार होत होता. जिथे ढोपरभर पाणी होते तिथे पुर्ण माणुस पोहु शकतो इतकी जागा निर्माण झाली आणि पाहता पाहता एक सुंदर बांध नदीवर तयार झाला. काम करताना त्या ठिकाणी बिनविषारी सापाचे एक पिल्लुदेखील मिळाले ते नंतर तरुणांनी नदीत सोडून दिले. ग्रामस्थ व गावाबाहेर राहणाऱ्या तरुणांनी मिळून एकीने गावाजवळून वाहत जाणारा जलाशय अडवून गावासाठी पाण्याचा साठा निर्माण केला होता. हे पाणी कित्येक महिने ग्रामस्थांना आपल्या विविध गरजांसाठी वापरता येणार आहे. गावक-यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. यानंतर दुपारचे जेवण सुद्धा सर्वांनी नदीकिनारी केले. ही घटना कथित करताना सुशीलचा उर अभिमानाने भरून येत होता. त्याच्या मते, दोन दिवसाची गावची सहलही झाली आणि आपल्या गावासाठी आपण काहीतरी श्रमदान केले याचा एक वेगळा आंनदसुद्धा झाला. हीच परिस्थिती त्याच्यासोबत शहरातून त्या दिवशी श्रमदानासाठी गेलेल्या प्रत्येकाची होती. पाचरळ गावातील ग्रामस्थांनी व तरुणांनी पाण्याचे महत्व पटवून देणारा एक अनोखा आदर्श आज समाजासमोर उभा केला असून आज परिसरात गावात करण्यात आलेल्या कामाचे कौतुक होताना दिसत आहे. सुशील व त्याच्या गावाकडील मित्रमंडळींनी ठेवलेला आदर्श सर्वांना नक्कीच मार्गदर्शक ठरावा असाच आहे.

वैभव पाटील
घणसोली

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त