लालपरी वाचवायला हवी


एकेकाळी ग्रामीण भागामध्ये जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीची अवस्था आज दयनीय आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात व खेड्यापाड्यात आपली पाळेमुळे घट्ट रोवून बसलेल्या एसटीची अवस्था आज महामंडळाच्या अनास्थेमुळे खिळखिळी झाली आहे. आजही अनेक भागांतील गरीब व सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी व अनिवार्य सेवा म्हणून एसटीचा मोठा आधार वाटतो. मात्र ही सेवा सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होताना गेल्या कित्येक वर्षांत दिसलेले नाही. खाजगी वाहतूक सेवेमध्ये आमूलाग्र बदल घडत असताना एसटीसारखी सार्वजनिक वाहतूक सेवा मात्र कात टाकण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. वेळेत देखभाल दुरुस्ती होत नसल्याने बसेसची अवस्था आज मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहे. एसटीच्या अर्थसंकल्पात तिची आर्थिक अवस्थाही अत्यंत नाजूक असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. उत्पन्न व देखभालीचा खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने ही सेवा पुढे रेटण्यात येत्या काळात प्रचंड अडचणी येणार आहेत. मात्र ग्रामीण भागातील लोकांना एसटीचा आधार वाटत असल्याने ही सेवा टिकवण्यासाठी तिचे खाजगीकरण अनिवार्य होऊन बसले आहे. आधुनिक तंत्रज्ञान व सोयीसुविधा उपलब्ध करून किफायतशीर परिवहन सेवा एसटीच्या माध्यमातून लोकांना मिळाव्यात यासाठी प्रायोगिक तत्वावर काही ठिकाणच्या बसेस खाजगी संस्थांना चालवायला देण्यास हरकत नाही. शिवनेरीसारखी सेवा माफक तिकीट दरात अधिकाधिक भागांत पोहोचायला हवी. राज्य सरकारने लोकहीताची सेवा म्हणून आपल्या अर्थसंकल्पात काही प्रमाणात तरतूद करणेदेखील आवश्यक आहे. खाजगी परिवहन सेवेशी स्पर्धा करण्यासाठी बसेसची संख्या व फेऱ्या वाढवणेदेखील क्रमप्राप्त आहे. एसटी वाचवण्यासाठी सरकारदरबारी जाणीवपूर्वक प्रयत्न अपेक्षित आहेत अन्यथा एकेकाळी लोकप्रिय असणारी ही लालपरी इतिहासजमा होण्यास वेळ लागणार नाही एव्हढे नक्की.


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त