आरोग्यमंथन - करोना - काळजी नको सावध राहा


कोरोना विषाणुचा प्रसार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जगभरातील अनेक देशांमध्‍ये या विषाणुने आपले जाळे पसरवण्‍यास सुरुवात केली आहे. भारतातदेखील काही भागात या विषाणूचे रुग्‍ण आढळले आहेत. ३१ डिसेंबर २०१९ रोजी चीन देशातील वुहान शहरात नवीन करोना विषाणूचा उद्रेक घोषित करण्यात आला. त्यानंतर चीनच्या इतर शहरात आणि प्रांतातही या आजाराचे रुग्ण आढळले असून दिनांक ०५ मार्च २०२० पर्यंत जगामध्ये एकुण ९५३३३ रुग्ण आणि चीनमध्ये ८०५६५ रुग्ण आढळले असून ३०१५ मृत्यू झाले आहेत. चीनच्या बाहेर भारतासह श्रीलंका, नेपाळ, जपान, थायलंड,दक्षिण कोरिया, अमेरिका, फ्रान्स, इराण, सिंगापूर, मलेशिया, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया, स्पेन, डेन्मार्क, पाकिस्तान इत्यादी ८५ देशांनीही या आजाराचे रुग्ण नोंदविले आहेत.  जगातील चीन व्यतिरिक्त जपान मध्ये ६, फ्रांस ४ , ऑस्ट्रेलिया ३, स्पेन, थायलंड व फिलिपाईन्स येथे  प्रत्येकी १ व रिपब्लिक ऑफ कोरिया  मध्ये ३५ , अमेरिका-९, इराण ७७ , इराक -२ आणि व इटली मध्ये १०७ मृत्यू झाले आहेत. आज पर्यंत भारतामध्ये ३० रुग्ण आढळुन आले आहेत. त्यातील केरळमध्ये या आजाराचे ३ रुग्ण दिल्ली 2 व तेलंगना -१ व राजस्थान मध्ये  १६, उत्तर प्रदेश ८ रुग्ण आहेत.  करोना हे विषाणूच्या एका समूहाचं नाव आहे. साध्या सर्दी खोकल्यापासून ते सार्स (Severe Acute Respiratory Syndrome) किंवा मर्स (Middle East Respiratory Syndrome) यासारख्या गंभीर आजारासाठी करोना विषाणू कारणीभूत असतात. ही मुख्यत्वे श्वसनसंस्थेचे निगडीत असतात ती सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारा सारखीच असतात. सर्दी ,खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे , निमोनिया, काहीवेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे मुख्यत्वेकरून आढळतात.  या आजारास जागतिक आरोग्य संघटनेने कोविड -१९ असे नाव दिले आहे.  करोना विषाणू मुळे होणारा आजार नेमका कसा पसरतो याबाबत अजून बरीचशी संदिग्धता असली तरी सर्वसाधारणपणे हा आजार हवेवाटे शिंकण्या खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून पसरतो. करोना विषाणूचे मूळ स्थान प्राणी जगतात आहे. 
करोना विषाणू आजारावर कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध नाही हे सत्‍य आहे. रुग्णास त्याच्या लक्षणानुसार उपचार केले जातात. करोना आजार होऊ नये यासाठी विशेष काळजी सर्वांनी घ्यायला हवी. सध्या महाराष्ट्रात या आजाराची लागण झालेली नाही मात्र खबरदारी घेणे हिताचे आहे. श्वसनसंस्थेचे विकार असणा-या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घ्‍यावी. हात वारंवार धुवावे. शिंकताना, खोकताना नाका तोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर धरावा. अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये. फळे, भाज्या न धूता खाऊ नयेत. काही विशिष्‍ट परिस्‍थीतीत ही दक्षता अधिकची घेणे आवश्‍यक आहे. श्वसनास त्रास होणा-या व्यक्ती, हा त्रास कोणत्या आजारामुळे होतो आहे हे स्पष्ट होत नसल्यास व रुग्णाने बाधित देशात प्रवास केला असल्यास, प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच बाधित देशात प्रवास केला आहे अशा व्‍यक्‍तींनी प्रकर्षाने घेणे गरजेचे आहे.
महाराष्‍ट्रात नवीन करोना विषाणू (कोविड -१९) ची लागण होऊ नये यासाठी या राज्‍य शासनाच्‍या  वतीने विषाणूच्‍या प्रतिबंध व नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या मदतीने अनेक उपाययोजना राबविण्‍यात येत आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार करोना बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग मुंबईसह देशातील २१ विमानतळांवर सुरू करण्यात आले आहे. सध्या चीन, हॉगकॉग, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, जपान द. कोरिया, नेपाळ, इराण आणि इटली या देशांमधून येणा-या प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात येत आहे. दिनांक ५ मार्च २०२० पर्यंत ८३५१६ प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे.  राज्यातील मोठया तसेच सर्व लहान बंदरांवरही कोविड - १९ आजाराच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणा-या प्रत्येक जहाजाची तपासणी करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. जे प्रवासी करोना बाधित देशातून भारतामध्ये येत आहेत त्यांची माहिती दैनंदिन स्वरूपामध्ये विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत राज्य आरोग्य विभागास कळविली जाते. वुहान (चीन) मधून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांकरिता विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते. इतर  बाधित देशातील प्रवाशांना लक्षणे असतील तरच विलगीकरण कक्षात भरती करुन त्याची प्रयोगशाळा तपासणी करण्यात येते. बाधित भागातून येणा-या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांकरिता घरी थांबण्यास (होम आयसोलेशन) सांगण्यात आले आहे. या सर्व प्रवाशांचा ते बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील १४ दिवस दैनंदिन पाठपुरावा करण्यात येतो. त्यांच्यामध्ये करोना आजार सदृश्य लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे याबाबत दैनंदिन विचारणा करण्यात येते. याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागास कळवण्याबाबत देखील प्रत्येक प्रवाशास सुचित करण्यात आले आहे. या दैनंदिन पाठपुराव्यामध्ये एखाद्या प्रवाशामध्ये संशयित करोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते. नवीन करोना विषाणु आजाराच्या रुग्ण निदानाची व्यवस्था राज्यात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एन आय व्ही), पुणे, कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळा, मुंबई आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर या ३ प्रयोगशाळांमध्ये करण्यात आलेली आहे. संशयित करोना आजारी रुग्णांना भरती करण्यासाठी सध्या मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालय आणि पुण्यात नायडू रुग्णालय येथे आवश्यक विलगीकरण व उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या शिवाय प्रत्येक जिल्हा रुग्णालयात आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात आले आहे. राज्यात सध्या ३९ विलगीकरण कक्ष कार्यरत असून एकूण ४६४ खाटा उपलब्ध आहेत. कोविड १९ आजाराच्या उद्रेकाचे स्वरुप लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने खाजगी रुग्णालयांमध्येदेखील विलगीकरण कक्ष सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या साठी हॉस्पिटल चेकलिस्ट तयार करण्यात आली आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सर्वसामान्य जनता, वैद्यकीय व्यावसायिक आणि बाधित भागातून आलेल्या प्रवाशांसाठी आरोग्य शिक्षण विषयक साहित्य तयार करण्यात आले असून ते सर्व संबंधितांना वितरित करण्यात आले आहे.
सर्वसामान्य नागरिकांसाठी टोल फ्री १०४ क्रमांक करोना विषयक शंकासमाधानासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय संचालक आरोग्य सेवा पुणे कार्यालयात करोना नियंत्रण कक्ष स्थापन (दूरध्‍वनी क्रमांक ०२० -२६१२७३९४) करण्यात आला असून तो सकाळी ८ ते रात्री १० या कालावधीत कार्यरत आहे. महाराष्‍ट्रात या आजाराचा एकही रुग्‍ण आढळलेला नसला तरी प्रतिबंधात्‍मक काळजी घेणे आवश्‍यक आहे. सोशल मिडियावर करोना संदर्भात विविध अर्धवट माहिती असणारे, चुकीचे, भिती उत्पन्न करणारे संदेश फिरताना दिसत आहेत. असे कोणतेही संदेश हे अधिकृत स्त्रोतांकडून खात्री करुन घेतल्याशिवाय पुढे पाठवू नयेत तसेच आवश्यक असल्यास नागरिकांनी हेल्प लाईनला फोन करुन शंका निरसन करुन घ्यावे असे आवाहन शासनाच्‍या वतीने करण्यात आले आहे.
कोरोनासारख्‍या गंभीर विषाणूचा सामना करण्‍यासाठी सर्वांनी सज्‍ज राहणे आवश्‍यक असुन त्‍या दृष्‍टीने आवश्‍यक दक्षता सर्वांनी घ्‍यावी व शासनपातळीवरुन करण्‍यात येत उपाययोजना सर्वांपर्यंत पोहोचाव्‍यात यासाठीच हे आरोग्‍यमंथन.


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त