मिडी बसचा प्रयोग उत्तम
रेल्वेच्या लोकल सेवेनंतर बेस्ट परिवहन सेवा ही मुंबईची दुसरी लाईफलाईन समजली जाते. बेस्टच्या ताफ्यात दाखल झालेली मिडी बस सेवा हा उत्तम उपक्रम आहे. आकाराने लहान व आरामदायी बैठक व्यवस्थेमुळे मुंबईकरांच्याही पसंतीस हा उपक्रम उतरत आहे. सुरुवातीला काही ठराविक मार्गांवर चालविण्यात येत असलेल्या ह्या बसचा विस्तार टप्प्याटप्प्याने इतर ठिकाणीही करण्यात येणार आहे. या प्रकारच्या जवळपास ४०० वातानुकुलीत बसेस येत्या काळात भाडेतत्वावर चालवण्यात येणार असल्याचे समजते. सध्या बेस्टमार्फत केलेल्या अभ्यासाअंती निवडलेले मार्ग रास्तच आहेत. यापुढील काळात नव्याने दाखल होणाऱ्या बसेस चालवण्यासाठी रेल्वे स्थानक, बाजारपेठा व गर्दीचे मात्र कमी फेऱ्या चालवण्यात येणारे मार्ग निवडले जावेत. तसेच या सेवेचा आणखी विस्तार करून ठाणे, नवी मुंबई ह्या उपनगरांमध्ये जाण्यासाठीदेखील या मिडी बसेस चालवण्यात याव्यात. प्रवाशांच्या दृष्टीने किफायतशीर, पर्यावरणपूरक व आरामदायी ठरत असलेल्या बेस्टचा हा उपक्रम मुंबईच्या परिवहन सेवेतील मैलाचा दगड आहे असे वाटते.

Comments
Post a Comment