प्लॅस्टिक बंदीचे ये रे माझ्या मागल्या



राज्यात पुन्हा एकदा प्लॅस्टिक बंदीची घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मागील शुक्रवारी विधानपरिषदेत केली. यापूर्वी अनेकदा प्लॅस्टिक बंदीचा कायदा आणूनदेखील बाजारातून प्लॅस्टिक पूर्णपणे घालवण्यास सरकारी यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत. आजदेखील दररोज बाजारपेठांमध्ये हे प्लॅस्टिक कुठल्या न कुठल्या स्वरूपात सर्रास विकले जात आहे. मात्र पूर्णतः प्लॅस्टिक बंदीमध्ये अनेकदा असफल झाल्यानंतरदेखील पुन्हा एकदा पर्यावरण मंत्र्यांनी प्लॅस्टिक हद्दपार करण्याची केलेली धाडसी घोषणा स्वागतार्हच आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावेच लागेल. नव्या घोषणेनुसार एक मेपासून सिंगल युज डिस्पोजेबल म्हणजेच एकदाच वापरले जाणारे प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून महिला बचत गटांच्या माध्यमातून कापडी पिशव्या उत्पादित केल्या जात आहेत. या बंदीतून प्लास्टिक बाटल्या वगळण्यात आलेल्या आहेत. प्लॅस्टिकला जोवर पर्याय उपलब्ध होत नाहीत तोवर प्लॅस्टिक बंद करणे अवघड आहे हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. कापडी व कागदी पिशव्यांची पुरेशी उपलब्धी बाजारात नाही तसेच कापडी पिशव्यांचे दर हे प्लॅस्टिक पिशव्यांपेक्षा खूप जास्त असल्याने किरकोळ बाजारात ते विकण्याऱ्यास व विकत घेणाऱ्यास परवडत नाही हेदेखील एक कारण प्लॅस्टिकच्या बेसुमार वापरास आहे. त्यामुळे प्लॅस्टिकला पर्याय हा प्लॅस्टिच्याच दरात उपलब्ध झाला पाहिजे जेणेकरून लोकांवर अनावश्यक अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही. वास्तविक, प्लास्टिक बंदी ही एक लोक चळवळच व्हायला हवी. सर्व स्तरांतील लोकांच्या सहभागाशिवाय प्लास्टिक बंदी यशस्वी होणार नाही. यासाठी प्लॅस्टिक बंदीचा प्रयोग लोकांनी आपल्या वैक्तीगत आयुष्यात उतरवला तरच पर्यावरण मंत्र्यांची प्लॅस्टिक बंदीची घोषणा यशस्वी होईल अन्यथा पुन्हा ये रे माझ्या मागल्या ही गत होईल एव्हढे नक्की. 













वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त