घाबरू नका जागरूक राहा
सध्या कोरोना विषाणूबाबत लोकांच्या मनात प्रचंड दहशत व भीती पसरल्याचे चित्र आहे. मुंबई, पुण्यासह राज्याच्या इतर भागांतदेखील कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने घराघरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. या आजाराची लागण नेमकी कशी व कधी होते याबाबत प्रचंड संभ्रम असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. प्रतिबंधात्मक काळजी हाच एकमेव उपाय यावर असून संसर्ग होऊ नये म्हणून आपली व आपल्या आजूबाजूची स्वच्छता राखणे अत्यावश्यक आहे. परदेशातून या आजाराचे संक्रमण आपल्याकडे झाल्यामुळे कोरोनाबधित देशांतून परतलेल्या प्रवाशांकडून सर्वाधिक धोका जाणवत आहे. एका व्यक्तीस या आजाराची लागण झालेली असल्यास त्याच्या संपर्कात येणाऱ्या सर्व व्यक्तींना त्याची लागण होण्याची भीती अधिक प्रमाणात आहे. पुण्याच्या एका दाम्पत्यास या आजाराची लागण झाल्यानंतर त्या दाम्पत्यास मुंबईतुन पुण्याला सोडणाऱ्या खाजगी वाहनचालकालादेखील त्याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा व्यक्तींचा संपर्कात आल्यास इतर व्यक्तींना ही लागण होणे अटळ आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या प्रवासात, गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अशा व्यक्तीने प्रवेश केल्यास काय हाहाकार उडेल याची कल्पनाही करवत नाही. त्यामुळे असे कार्यक्रम व प्रवास शक्यतो टाळायला हवेत. सॅनिटायझर व मास्क वापरल्याने संसर्ग टाळता होतो हा समज दृढ झाल्याने कधी नव्हे इतकी विक्रमी विक्री या वस्तूंची होऊ लागली आहे. मात्र संसर्ग टाळण्यासाठी साबण, रुमाल या साधनांचाही वापर होऊ शकतो ही साधी गोष्ट कुणाच्या लक्षात येत नाही. यामुळे नाहक या वस्तूंच्या साठेबाजीत व किंमतीत वाढ झाली आहे. उलट कोणताही संबंध नसताना चिकन, मटण सारखे पदार्थ खाल्याने करोना होतो हा भ्रम निर्माण झाल्याने या पदार्थांच्या उत्पादकांना देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. हा विरोधाभास केवळ गैरसमज व अपप्रचारामुळे होत आहे. यासाठी सोशल माध्यमांना आवर घालण्याची वेळ आली आहे. नको तितका कल्पनाविलास व त्यात प्रसिद्धी वाहिन्यांची कल्पकता यामुळे करोनाबाबत समाजात प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारी यंत्रणा या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत. जिथे सर्वसामान्य माणूस अशा प्रकारच्या संशयीत व्यक्तींपासून लांब पळण्याचा प्रयत्न करत असताना सरकारी आरोग्य यंत्रणा या रुग्णांवर जीवाची पर्वा न करता उपचार करण्यात व्यस्त आहेत. यातून सरकारी संवेदनशीलतेचे दर्शन महाराष्ट्राला घडत आहे. केंद्रीय आरोग्य विभागापासून राज्यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी अहोरात्र झटत आहेत. यातून लवकरच मार्ग निघेल व पुन्हा एकदा राज्यातील नागरिक चिंतामुक्त जीवन जगू शकतील अशी आशा आहे. तूर्तास सर्वांनी घाबरून न जाता व्यक्तिगत काळजी घ्यावी व संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करायला हवा. यासाठी आपल्या दिनचर्येत व स्वछता राखण्याच्या बाबतीत आवश्यक बदल स्वीकारावेत. या आजाराबाबत उगाच काळजी न करता जागरूक व सतर्क राहिल्यास निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीवर मात करणे शक्य होईल.

Comments
Post a Comment