नागरिकांचीही जबाबदारी अधिक



कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात आपण प्रवेश करत आहेत. कोरोनाग्रस्त इतर राष्ट्रांमध्ये त्याची लागण सुरू झाल्यापासून दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यातील बाधितांची आकडेवारी पाहिली तर कमालीची वाढली असल्याचे दिसून येते. बाधित लोकांच्या मुक्त संचाराला वेळीच आळा घातला नाही तर या विषाणूचा प्रसार पंधरा दिवसानंतर प्रचंड वाढतो व त्यामुळे पहिल्या आठवड्यापेक्षा कित्येक पट अधिक लोकांना विषाणूची लागण तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात झाल्याचे दिसून आले आहे. याला कारण तेथील निष्काळजीपणा. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना वेळीच शोधून काढून त्यांना उपचाराच्या कक्षेत आणले तर त्यांच्यामुळे इतर निरोगी लोकांमध्ये पसरणाऱ्या संभाव्य संसर्गाला आळा घालता येऊ शकतो. भारतात व पर्यायाने महाराष्ट्रात या उपाययोजना वेळीच सुरू केलेल्या असल्याने या विषाणूचा प्रसार बऱ्याच अंशी रोखण्यात यंत्रणांना यश आले आहे. मात्र तरीदेखील शासनाने स्पष्ट केल्याप्रमाणे आगामी दोन आठवडे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. शासनाने तातडीचे उपाय म्हणून अनेक सार्वजनिक स्थळांवर व कार्यक्रमांवर निर्बंध आणून तेथील होणारी गर्दी थोपवली आहे. मात्र आज घडीला राज्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी चिंतेत टाकणारीच आहे. अशाच पद्धतीने वाढ होत राहिली तर मुंबई- महाराष्ट्रात राहणारा एक मोठा जनसमुदाय कोरोनाच्या गर्द छायेत येऊ शकतो व त्यानंतर त्याला रोखणे तारेवरची कसरत ठरणार आहे. यामुळेच या विषाणूला प्रतिबंध करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सरकारच्या वतीने करण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणावर आरोग्य यंत्रणा यासाठी अहोरात्र झटत आहेत. विषाणूबाधित लोकांना शोधून त्यांच्यापासून होणाऱ्या प्रसाराला आळा घालण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. मात्र नागरिकांनीदेखील या मोहिमेत सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे. लोकांनी उचित काळजी घेतली नाही तर सरकारी प्रयत्नदेखील व्यर्थ ठरणार आहेत. त्यामुळे आपापली जबाबदारी ओळखून प्रत्येकाने या आजाराला पायबंद घालण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करायला हवेत. गर्दीचा प्रवास, समारंभ, कार्यक्रम, सभा टाळायला हवेत. महत्वाचे म्हणजे शारीरिक स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. हात स्वच्छ धुणे, खोकताना शिंकताना तोंडावर रुमाल धरणे, सार्वजनिक ठिकाणी वस्तू व साधनांना अनावश्यक स्पर्श टाळणे, आजाराची लक्षणे दिसताच डॉक्टरी उपचार सुरू करणे यासारख्या गोष्टी सर्वस्वी आपल्याच हातात आहेत. त्याबाबत सुयोग्य काळजी घेतली तर या आजाराला आपण बळी पडणार नाही. कोरोनाला उगाच घाबरण्याची गरज नाही मात्र थोडी जागरूकता दाखवत सार्वजनिक जीवनात सतर्क राहिलो तर कोरोनाच्या संकटापासून लवकरच आपली मुक्तता होईल एव्हढे नक्की. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त