बलात्कारी आरोपींना माफी नाही हा संदेश द्या
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण माणुसकीच्या सर्व सीमा ओलांडणारे होते. संपूर्ण देशवासीयांच्या या घटनेवर तीव्र व संतप्त प्रतिक्रिया असून दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षाच देण्यात यावी अशी मागणी सातत्याने होत आहे. दोषी व्यक्तींना पकडण्यात आल्यानंतर त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध देखील झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फाशीची सजा सुनावून दोनदा तारीख निश्चित केल्यानंतरदेखील अद्यापि शिक्षा होऊ शकलेली नाही. लोकशाही व मानवतेचा आदर करणाऱ्या आपल्या देशात प्रत्येकाला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत न्याय मागण्याचा अधिकार निश्चितपणे आहे. मात्र बलात्कारासारख्या गुन्ह्यात आरोप सिद्ध झाल्यानंतरही दोषींना जलद शिक्षा न देता पुन्हा पून्हा न्याय मागण्याची संधी देणे उचित नाही. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागून आरोपींनी भारतीय न्यायव्यवस्थेवरच बोट ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी आता शक्य तितक्या लवकर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या शिक्षेची अमंलबजावणी होण्यासाठी आंतराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करावेत आणि बलात्कारातील आरोपींना कुठल्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही हा संदेश जगाला द्यावा.

Comments
Post a Comment