मानसिक आरोग्य अभ्यासणारे लोणावळ्याचे मनशक्ती केंद्र


मागील महिन्यात आरोग्य विभागामार्फत आयोजित योग प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने लोणावळा येथील कैवल्यधाम या जगप्रसिद्ध योग प्रशिक्षण संस्थेत जाणे झाले. दोन दिवसांच्या या कार्यशाळेदरम्यान तेथून जवळच असलेल्या मनशक्ती केंद्राला भेट दिली. कार्यालयातील डॉ घोलप सर, डॉ केंद्रे सर हेदेखील सोबत होते. योग कार्यशाळेतील पहिल्या दिवसाचे वर्ग आटोपल्यावर रात्री निवांतपणे या केंद्रात आम्ही पोहोचलो. त्यावेळी तेथे संस्थेचे डॉ गजानन केळकर व श्री सुहास दुधाटे यांची निवांत भेट झाली. त्यांनी जवळपास दीड तासांच्या गप्पांमध्ये संस्थेबद्दल विस्तृत व सविस्तर माहिती दिली जी एकून आम्ही थक्क झालो. मेडिकल सायन्सच्या पलीकडे जाऊन ही संस्था करत असलेले प्रयोग व संशोधन अचंबित करणारेच आहे. यामुळे या संस्थेबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली व त्यानुसार त्यांचेशी साधलेल्या संवादातून बरीच माहिती मिळाली. आज दैनंदिन व्यापात व्यग्र व त्रस्त झालेला व्यक्ती एक ना एक दिवस स्वतःसाठी मनशांती शोधत असतो. मनाला शांती मिळण्याबरोबरच स्वतःच्या कौशल्यवृद्धीसाठी व मानसिक विकासासाठी एखादी हक्काची व शांत जागेच्या शोधात प्रत्येकजण असतो. याला एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे व तो म्हणजे मनशक्ती केंद्र. महाराष्ट्रात पश्चिम घाटात सह्याद्री माथ्यावर मुंबई-पुणे हमरस्त्याला लागून लोणावळा शहराच्या निसर्गरम्य परिसरात हे मनशक्ती प्रयोग केंद्र कार्यरत आहे. गेली चाळीस वर्षे मनशांतीकरीता हजारोंच्या संख्येने लोक येथे येत आहेत. ताणमुक्त व अर्थपूर्ण जीवनासाठी, गर्भसंस्कारापासून मृत्यृ-पश्चात जीवनापर्यंत तीस प्रकारचे अभ्यास वर्ग आणि किमान साठ इलेक्ट्रॉनिक यंत्रे व कम्प्युटर आधारित चाचण्या (टेस्टस्) येथे चालू असतात. या प्रयोग केंद्रातील विविध तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने जीवनाकडे पाहण्याचा ‘नवा’ दृष्टीकोन लाभतो. प्रत्येक व्यक्तिला त्याच्या कुटुंबाची रास्त जबाबदारी पार पाडतांना, समाजासाठी काही किमान त्याग करून सुख शांती कशी मिळविता येईल याचे मार्गदर्शन करणे व त्याद्वारे व्यक्ती कल्याण, कुटुंब कल्याण, राष्ट्र व मानवता कल्याण साधणे ही या संस्थेची मुख्य उद्दिष्टे आहेत. स्वामी विज्ञानानंद यांनी मनशक्ती प्रयोग केंद्राची स्थापना केली. स्वामीजींनी ‘मना’बाबत प्रदीर्घ संशोधन केले. विज्ञानामध्ये जडाची व्याख्या आहे पण अजडाची (मनाची) व्याख्या नाही. स्वामीजींनी प्रथमतः वैज्ञानिक सूत्रांचा आधार घेऊन मनाची व्याख्या केली. प्रकाश वेगाची मर्यादा जडाला असते, तर प्रकाश वेगापलिकडेही जाऊ शकते ते ‘मन’. मनशक्ती केंद्राच्या लोणावळा, तळेगाव, चाकण येथे शाखा आहेत तर नवी मुंबईत खारघर येथेदेखील मनशक्ती केंद्र स्थापित आहे. इलेक्ट्रॉनिक यंत्रे व कम्प्युटर आधारित वैज्ञानिक, मनसंबधित चाचण्या करणे, विविध शिबिरे, चर्चासत्रे, कार्यशाळा, अभ्यासवर्गांचे आयोजन करणे, इच्छापूर्तीसाठी प्रकाश शक्तीवर आधारित ज्ञानयज्ञ व प्रकाश एकाग्रता उपक्रम साजरे करणे इत्यादी उपक्रम ह्या केंद्रांच्या माध्यमातून पार पाडले जातात. इंग्रजी, मराठी, गुजराथी, हिंदी, इत्यादी भाषांतील विपुल ग्रंथसंपदा व लिखाण येथे उपलब्ध आहे. तसेच स्मरणशक्तीवर्धक व इतर आयुर्वेदिक औषधांची निर्मितीदेखील संस्थेच्या मार्फत करण्यात येत आहे. संस्थेच्या माध्यमातून २००२ साली सुरु केलेली एक दिवसाची गर्भसंस्कार कार्यशाळा, अफाट लोकप्रिय झाली आहे. गरोदरपणाच्या कोणत्याही महिन्यात यामध्ये सहभागी होता येते. लोणावळा तसेच संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात, शहरी व ग्रामीण भागात, मराठी व इंग्रजीतसुद्घा ही समूल्य कार्यशाळा घेतली जाते. गर्भाला जाणीव व स्मृती असते याचे वैज्ञानिक पुरावे या कार्यशाळेत सादर केले जातात. तसेच विडिओच्या माध्यमातून गर्भाच्या विकासाचे टप्पे, जन्माचा क्षण (ऍनिमेशनद्वारे), प्रार्थनाशक्ती, प्रकाशशक्ती याआधारे गर्भावर संस्कारप्रयोग, गरोदरपणातील प्रार्थना, वाचन, एकाग्रता, संगीत, योगासने, चाचणी आणि वैयक्तिक कॉम्प्युटराइज्ड् निष्कर्ष या कार्यशाळेत मांडले जातात. गरोदरपणाच्या पहिल्या ते नवव्या महिन्यापर्यंत फक्त गर्भधारी जोडपी या ८ तासाच्या शिबिरात सहभागी होऊ शकतात. स्वतः डॉ गजानन केळकर हे या शिबिराचे नेतृत्व करतात. त्यांच्या व्याख्यानाची झलक त्यांनी आम्हाला संगणकावर दाखवली ज्यातील त्यांचे कसब पाहून आम्ही त्यांचे फॅनच झालो. संस्थेच्या माध्यमातून ते सुप्रजनन कार्यशाळा घेतात ज्यात बीजनिर्मितीचे विज्ञान, बीजसंस्काराचे तंत्र, व्यक्तिमत्व चाचणी इत्यादीबाबत दृक्श्राव्य पद्धतीने मार्गदर्शन केले जाते. नुकतीच लग्न झालेली जोडपी, अपत्याच्या अपेक्षेत असणारी जोडपी, अपत्यलाभ कष्टसाध्य असलेली जोडपी यात सहभागी होतात. ‘मूल चांगले निघणे’ हा केवळ नशिबाचा भाग नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न हवेत. तसेच, आपले मूल चांगले निपजणे हा सामाजिक परिवर्तनाचादेखील एक भाग आहे! हे सर्व ५० वर्षांपूर्वी लक्षात घेऊन मनशक्तीचे प्रथमचिंतक, प्रयोगकार पू. स्वामी विज्ञानानंद यांनी याबाबतीतल्या प्रयोगांची आखणी केली. त्याचा एक भाग म्हणजे सुप्रजनन कार्यशाळेच्या माध्यमातून होणारी बीजशुद्धीची प्रक्रिया हा संदेश घेऊन ही शिबिरे आयोजित केली जातात. मनशक्ती केंद्रातर्फे, सर्व वयोगटातील तसेच सर्व स्तरांतील व्यक्तींसाठी, विविध प्रकारचे विनामूल्य किंवा अल्पमूल्यात उपक्रम, गेली अनेक वर्षे, ग्रामीण तसेच शहरी भागातही राबविले जातात. विविध विषयांवरील ज्ञान-बैठका, अभ्यासवर्ग, संस्कार शिबिरे, शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप, कपडे व खाऊवाटप, रुग्णरंजन, वैद्यकीय सेवा, ग्राम विकास, सेवाभावी संस्थांना देणगी, राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ देणगी आणि मदत-कार्य अशा स्वरुपात हे उपक्रम घेतले जातात. दीड तासांच्या चर्चेनन्तर संस्थेच्या व्यापक दृष्टिकोनाचे अनेक पैलू डॉ केळकर यांनी आमच्यासमोर मांडले. व्यक्तीच्या विविध स्तरांवरील मानसिकतेचा अभ्यास करण्यासाठी परदेशातून आणलेल्या यंत्रसामग्रीचे दर्शनदेखील त्यांनी आम्हाला घडवले. रात्रीचे जेवण आम्ही त्यांच्यासोबतच मनशक्ती मधील उपहारगृहात केले. येथील सर्वच पदाधिकारी व सेवेकरी पूर्णतः सेवाभावी वृत्तीने या ठिकाणी कार्यरत असल्याची माहिती त्यांनी आम्हाला दिली. सामाजिक बांधीलकीतून इतरांसाठी काहीतरी केल्याचा आंनद जगात सर्वोच्च असल्याचे त्यांचे मानने आहे. त्यामुळे मनशक्ती केंद्र गेली अनेक वर्षे स्वतःची एक वेगळी ओळख टिकवून आहे व या केंद्राला जोडल्या जाणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे. भोजन आटोपल्यावर मनशक्ती केंद्राचा परीसर न्याहाळत आम्ही अखेर डॉ केळकर व सुहास दुधाटे यांचा निरोप घेतला. मनशक्तीबद्दल जाणून घेण्याची गेल्या अनेक दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाली होती व या केंद्राबद्दल असलेला आदर आणखी वाढला होता. लहान मुलांपासून ते गर्भवती महिला यांच्यासाठी या केंद्रांमध्ये सातत्याने शिबीरे व कार्यशाळा सुरू असतात. सर्वच कुटुंबासाठी उपयुक्त अशा ह्या शिबिरांची अनुभूती एकदा तरी घ्यायलाच हवी. मनशक्तीसारख्या माणसाच्या सर्वांगाचा अभ्यास करून योग्य मार्गदर्शन करणाऱ्या एका अद्भुत संस्थेचा परिचय आपल्याला व्हावा यासाठीच हा लेखप्रपंच. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त