योग्य निर्णय
कोरोनाच्या प्रदूर्भावाने सध्या गंभीर रूप धारण केलेले आहे. सध्या आपला देश कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात असून सामाजिक अंतर राहण्याची दक्षता घेतली नाही तर सर्वसामान्य जनतेत झपाट्याने लागण होण्याच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रवेश अटळ आहे. या विषाणूच्या प्रदूर्भावाची लागण होण्याचा सर्वाधिक धोका लहान मुलांमध्ये आहे कारण मोठया व्यक्तींच्या तुलनेत लहान मुले स्वच्छतेच्या बाबतीत आवश्यक काळजी घेत नाहीत. यामुळेच सरकारने सर्वप्रथम शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. परदेशामध्ये या आजाराची लागण व मृत्यूचे आकडे पाहिले तर त्याची दाहकता आपण वेळीच ओळखली पाहिजे. एकदा हा विषाणू समाजात पसरण्यास सुरुवात झाली तर त्याला रोखणे अवघड होऊन बसेल. महाराष्ट्रात 50 च्या वर लोकांना या आजाराची लागण झाली आहे तर त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांचा शोध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मार्च एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या पाहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय रास्तच आहे. यापूर्वी वर्षभरात झालेल्या तीन ते चार टर्म परीक्षांच्या आधारे मुलांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यास हरकत नाही. शेवटी जागतिक महामारी पसरवणाऱ्या या विषाणूपासून नागरिकांचे रक्षण करण्याच्या व्यतिरिक्त कोणतीही गोष्ट सध्या महत्वाची ठरू शकत नाही.

Comments
Post a Comment