जागतिक जल दिन

जागतिक जलदिन 

दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिवस म्‍हणून साजरा केला जातो. पाण्याचा नियंत्रित व गरजेपुरता वापर करून पाणीबचतीचा संदेश या दिनाच्या निमित्ताने देण्याचा उद्देश आहे. सन 1992 साली 'रियो डी जेनेरियो' येथे पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UNCED) संमेलनात पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी 22 मार्च हा जागतिक जल दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला व 22 मार्च 1993 पासून संपूर्ण जगभर हा दिवस विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येतो. खरेतर आज निसर्गाचे असंतुलित पर्जन्यमान व जागतिक तापमानात होत असलेली कमालीची वाढ या पार्श्वभूमीवर या दिवसाचे महत्व अधिकच अधोरेखीत झाले आहे. पर्यावरणाची अनावश्यक व नको तितकी हानी आज आपल्या भारत देशात सर्वाधिक होत असल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका आपल्या देशाला भोगावा लागू शकतो हे गेल्या काही वर्षात देशातील विविध भागांतील पाणीटंचाईने सिद्ध केले आहे. पाण्याची बचत व नियोजन या बाबी आपण आजच गांभीर्याने घेतल्या नाही तर येत्या काळात त्याचे दूरगामी परिणाम आपल्या भावी पिढयांना भोगावे लागतील. पाणी हि गोष्ट निर्माण करण्याची ताकत आपल्यात नाही त्यामुळे त्याचा अपव्यय करण्याचा अधिकारदेखील आपल्याला नाही. तसेच पाण्याचे स्रोत नष्ट न  करणे अथवा त्यास हानी न पोहोचवण्याची खबरदारीदेखील आपण घ्यायला हवी. जगात आजही जवळपास दीड अब्ज लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. सजीवांच्या जीवनचक्रामधून पाणी हि गोष्ट निखळली तर ते जीवनचक्रच थांबेल व एक दिवस हि सृष्टीही नाममात्र राहील. पाण्याच्या बाबतीत काही धक्कादायक गोष्टी आज या जलदिनाच्या निमित्ताने आपल्यासमोर आणाव्याश्या वाटतात. जगात सर्वात जास्त पाण्याचा अपव्यय भारतात होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली यासारख्या शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून 40 टक्केपर्यंत पाणीगळती होत आहे. मुंबईत दररोज 50 लाख लिटर पाणी केवळ वाहने धुण्यासाठी वापरले जात असल्याचे समोर आले आहे. इस्राईल राष्ट्रात केवळ 10 सेंमी पाऊस पडत असताना देखील तेथील शेतीत इतके धान्य पिकवले जाते की तेथून धान्याची निर्यात होते मात्र भारतात 50 सेंमी पाऊस पडत असूनही येथील जनतेला अन्नासाठी झगडावे लागत असल्याचे विदारक चित्र  आहे. टंचाई क्षेत्रामध्ये भारतीय स्त्री पाण्यासाठी साधारणतः 4 किलोमीटरपर्यंत दररोज पायपीट करते. दूषित पाण्यामुळे दरवर्षी मृत्यू पावलेल्यांची संख्या जगात 22 लाख इतकी आहे. पृथ्वीवर एकूण 40 घन किलोमीटर पाणी असून त्यापैकी 97.5 टक्के पाणी समुद्राने व्यापले आहे, 1.5 टक्के पाणी ध्रुवीय प्रदेशात बर्फाच्या रूपात गोठलेले आहे तर उर्वरित केवळ एक टक्के पाणी नदी, सरोवर, झरे, विहीर, कालवे यामध्ये आहे. या एक टक्के पाण्याचादेखील 60 टक्के हिस्सा शेती व उद्योगधंद्यांसाठी खर्च होतो तर 40 टक्के पाणी आपल्याला पिण्यासाठी, स्वयंपाक, अंघोळ, साफसफाई, कपडे धुण्यासाठी वापरता येते. ब्रश करताना पाच मिनिटे नळ खुला ठेवल्यास 25 ते 30 लिटर पाणी वाया जाते. बाथ टब मध्ये अंघोळ केल्यास 100 ते 150 ऐवजी 300 ते 500 लिटर पाणी लागते. पिण्यासाठी मानवाला रोज 3 लिटर तर प्राण्याला 50 लिटर पाणी लागते. जगात 10 पैकी 2 माणसांना पिण्यासाठी शुद्ध पाणी आजही मिळत नाही. पाण्याचा सर्वात मोठा स्रोत नदी हाच आहे मात्र नद्यांमध्ये कारखानदारी व रसायनांचे होत असणारे प्रदूषण, पुढील काळात सर्वानाच दूषित पाणी पिण्यासाठी प्रवृत्त करणारे आहे. 1 लिटर गायीचे दूध मिळवण्यासाठी 800 लिटर पाणी लागते तर एक किलो गव्हासाठी एक हजार लिटर व 1 किलो तांदूळ पिकवण्यासाठी सरासरी 4000 लीटर पाणी लागते अशा प्रकारे भारतात एकूण पाण्याच्या 83 टक्के पाण्याची गरज शेती व शेतीजन्य पदार्थांच्या उत्पादनासाठी आहे. यामुळेच पाण्‍याचा मुख्‍य स्‍त्रोत असलेल्‍या पावसाद्वारे मिळणाऱ्या पाण्याची बचत करण्याची वेळ आज आलेली आहे. पावसाद्वारे जमिनीवर पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे महत्व आपल्याला कळले पाहिजे अन्यथा भविष्यात पाणी हे केवळ आपल्या डोळ्यातच शिल्लक राहिल. एकेकाळी हजारो नद्या, सरोवरे असलेल्या आपल्या देशात आज केवळ शेकडो नद्या शिल्लक आहेत, सरोवरे तर कुठे गायब झालीयेत याचा पत्ताच नाही. वाढते नागरीकरण, वनस्पतीची बेसुमार तोड व सिमेंट कॉंक्रीटच्या जंगलाने पाण्याचे स्रोत नष्‍ट केले आहेत. मागील काही वर्षात तामिळनाडू राज्याने पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्यात जी आदर्शवत नीती अवलंबली आहे ती सर्वत्र राबवण्याची आवश्यकता आहे. पाण्यामुळे सजीवसृष्टीचे हाल होऊ नयेत व मानवाला पाण्यासाठी झगडावे लागू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना राहील मात्र पाण्याचे जतन, संवर्धन व बचत करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्या घटकांवर शासनाला कठोर निर्बंध आणावे लागतील. जलसंवर्धनाची मोहीम अधिक तीव्रतेने राबविणे आवश्यक आहे. पाण्याचे महत्व मानवी जीवनात अनन्यसाधारण आहे त्यामुळे माणसाचे जीवन असणाऱ्या पाण्याचे स्रोत नष्ट होऊ न देण्याचा संकल्प व शपथ आपण या जागतिक जल दिनाच्या निमित्ताने घेऊ या.
महत्‍व पाण्‍याचे अन थेंबाथेंबाचे जाणू या
पाणीबचतीचा संकल्‍प अन ध्‍यास एक घेऊ या 
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त