पुस्तके भेट देणारा अवलिया



जोगेश्वरीत राहणारे गणेश हिरवे सर वय वर्षे 46, शारीरिक दोन तीन ऑपरेशन झालेले, पेशाने शिक्षक, ज्ञानदानाच्या पवित्र कार्याबरोबरच या माणसाला छंद जडलाय तो मोफत पुस्तक व मासिकं वाटण्याचा. मागील वीस-बावीस वर्षात या पठयाने स्वखर्चाने जवळपास दहा-बारा हजारांवर पुस्तके विविध क्षेत्रातील व्यक्तींना, विविध स्पर्धांतील उपस्थित पाहुण्यांना, उत्कृष्ट खेळाडू, आयोजक, घरी येणाऱ्या अतिथींना, शाळेतील विविध कार्यक्रमात, ते ज्यांना भेटतात ते नातेवाईक, मित्र, इतर अनेक अभ्यागताना नेहमीच भेटीदरम्यान पुस्तक भेट देत असतात. नव्याने सुरू होणाऱ्या ग्रंथालयांनाही पुस्तक पुरवितात. सध्याचे डिजिटल युग पाहता अनेकांची वाचनाची आवड कमी होत आहे व बऱ्याचदा आपण सोशल मीडियावर आलेले लांबलचक मेसेज न वाचताच डिलीट करून टाकतो व नंतर आपल्याला कळते की एखादा मेसेज आपल्यासाठी खरच खूप महत्वपुर्ण होता. हिरवे सरांचे तसे नाही, दररोज ते स्वतः वीस-पंचवीस रुपयांची वर्तमानपत्र घेतात, शाळेतील अनेक हिंदी, इंग्रजी व मराठी वृत्तपत्रे, मासिक वाचतात, इतकंच काय सोशल मीडियावरील मेसेजेस देखील छोटा असो वा लांबलचक आवर्जून वाचतात व प्रतिक्रिया काळवितात. लेखन व वाचन केल्याने भाषा समृद्ध तर होतेच पण हा एक चांगला छंद असल्याचे हिरवे सर म्हणतात व मागील 20-22 वर्षात आपण स्वतः अनेक वृत्तपत्रांच्या माध्यमातून नागरी समस्याना वाचा फोडल्याचे समाधान वाटत असल्याचे सांगतात. आतापर्यंत विविध वृत्तपत्रे व मासिकांतून विविध विषयांवर त्यांची हजारो पत्रं व लेख प्रसिध्द झालेले आहेत. सामाजिक क्षेत्रातील कामाबद्दल त्यांना आजवर एकूण 75 पूरस्कार प्राप्त झालेले आहेत. तब्बल 28 वेळा त्यांनी रक्तदान केलेले आहे. विद्यार्थी प्रिय शिक्षक, समाजातील अनेक उपक्रमांत हिरीरीने सक्रिय सहभाग, स्पर्धा भरवणे, नागरी समस्या सोडवण्यात पुढाकार, अनेक संस्था, मंडळांवर पदाधिकारी, सल्लागार अशी हिरवे सरांची सामाजिक ओळख आहे. गरीब, गरजू लोकांसाठी काहीतरी करण्याची त्यांची धडपड व पुस्तके भेट देऊन वाचनसंस्कृती जोपसण्यामध्ये त्यांचे योगदान यामुळे त्यांचेशी आज सर्वच क्षेत्रातील अनेक लोक जोडले गेले आहेत. जॉय ऑफ गिविंग या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन विद्यार्थी, अनाथ, वृद्ध यांच्यासाठी अनेक मदतीचे उपक्रम विविध ठिकाणी राबवले आहेत. सामाजिक कार्यातून समाजाप्रती असलेली बांधिलकी अधिकाधिक काळ जोपासण्याचा त्यांचा मनोदय असून या कार्यात जास्तीत जास्त सहकारी जोडण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. प्रापंचिक जबाबदाऱ्या व नोकरी-व्यवसायातील रोजची दगदग यातून आपल्याला समाजभान जोपासण्यासाठी वेळच नसतो. मात्र हिरवे सर हे सर्व सांभाळून करत असलेले समाजकार्य खूपच छान व प्रेरणादायी आहे. 

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त