डॉ राजू जोटकर व श्री सुनील कुलकर्णी यांची सेवानिवृत्ती
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने आज संपूर्ण जनजिवन विचलित झालेले असताना आरोग्य विभागातील आणखी दोन सहकारी आज ३१ मार्च रोजी शाासकीय सेवेतुन सेवानिवृत्त झाले. त्यातले एक म्हणजे आरोग्य सेवा आयुक्तालयात गेल्या ३७ वर्षांपासुन आरोग्य संचालक कार्यालयात लघुलेखक या पदावर काम करणारे श्री. सुनिल कुलकर्णी. दिनांक १३ जुन १९८३ रोजी आपल्या शासकीय सेवेला आरोग्य सेवा संचालनालयातुन सुरुवात केलेल्या कुलकर्णी यांनी आज वयाच्या ५८व्या वर्षी आपली शासकीय सेवा यशस्वीपणे व मोठया दिमाखात पूर्ण केली. अत्यंत प्रामाणिक, हजरजबाबी, अभ्यासू व आरोग्यातील विविध विषयांंचा अगदी सखोल अभ्यास असणा-या कुलकर्णी यांच्या कार्यशैलीवर आरोग्य सेवेतील सर्वच अधिकारी आज समाधानी आहेत. आपल्यासोबत काम करणा-या इतर सहकारी वर्गाशीदेखील त्यांचे सौर्हादाचे व सहकार्याचे संबंध असल्यामुळे कधी कुणाशी त्यांचे बिनसल्याचे ऐकिवात नाही. कार्यालयीन कामकाजाव्यतिरीक्त इतर अनेक सामाजिक विषयांवर गप्पा मारताना त्यांच्या भौतिक ज्ञानाची अनुभुती मला अनेकदा आलेली आहे. सुटटीचे दिवस वगळता जवळपास दररोज सुनिल यांच्याशी संपर्क व्हायचा. कोणतीही अडचण असो, माहिती हवी असो, दुरध्वनी क्रमांक पाहिजे असो अथवा कुणाला कार्यालयीन निरोप दयायचा असो, सुनिल यांचे नाव सर्वप्रथम डोळयासमोर यायचे. दुस-याला सन्मान दिल्याने आत्मीक आनंंद मिळतो या त्यांच्या धोरणामुळे संपूर्ण कारकिर्दींत त्यांचेकडून सर्वांना नेहमीच सन्मानजनक वागणूक दिली गेली अशी धारणा आहे. पत्नी व मुलगा असे त्रिकोणी कुटुंब असलेल्या सुनिल कुलकर्णी यांच्या पत्नी यादेखील आरोग्य सेवेेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत तर मुलगाही उच्चशिक्षण घेत आहे. आरोग्यासारख्या संवेदनशिल विभागामध्ये काम करत असल्यामुळे तसेच सध्या कोरोना आजाराच्या उद्रेकामुळे राज्यात उदभवलेली न भुतो अशी साथीची परिस्थीती पाहता सेवानिवृृत्तीनंतरदेखील परिस्थती नियंत्रणात येईस्तोवर विभागात स्वयंस्फूर्तीने काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. खरंंतर ही बाब तमाम कर्मचा-यांसाठी प्रेरणादायी अशीच आहे. सेवानिवृत्तीनंतरदेखील आरोग्य सेवेत योगदान देण्याचा त्यांचा मानस असुन सामाजिक सेवेतील त्यांची व्यस्तता तशीच टिकवुुुन ठेवण्याचा मनोदयदेखील ते व्यक्त करतात.







Comments
Post a Comment