स्वच्छतेची सवय नियमित असावी
कोरोना विषाणूने भारतासह जगभरात हाहाकार माजवलेला आहे. या आजाराने जगात लाखो लोक बाधित असून हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवा तसेच अस्वच्छतेमध्ये या विषाणूचा प्रसार अधिक जोमाने होत असल्याने लोकल ट्रेन्स, बसेस, एअरपोर्ट यासारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांची साफसफाई करण्यात येत आहे. यामुळे निश्चितपणे आजाराचा प्रसार रोखणे शक्य होणार आहे याबाबत दुमत नाही. मात्र स्वच्छतेची ही सवय चिरकाल व नियमितपणे लागणे गरजेचे आहे. आज कोरोनाचे संकट आले केवळ म्हणून जर आपण स्वच्छता राखत असू तर त्याला काही अर्थ नाही. प्रशासनाबरोबरच ह्या सार्वजनिक सेवा स्वच्छ राखण्याची जबाबदारी प्रवाशांचीदेखील तितकीच आहे. लोकांनी प्रवास करताना ट्रेन, बस अस्वच्छ करता कामा नये. खाद्यपदार्थांची वेष्टने, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या परिसरात इतरत्र फेकू नये, सार्वजनिक ठिकाणांवर थुंकू नये ही खबरदारी घ्यायला हवी. स्वच्छतेची सवय घरापासून सार्वजनिक ठिकाणी वावरेपर्यंत कायम ठेवायला हवी. ज्या ठिकाणची जनता व प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत गंभीर व आग्रही असतात ती ठिकाणे नेहमीच स्वच्छ, नीटनेटकी व निरोगी असतात.

Comments
Post a Comment