पर्यावरण पूरक होळी साजरी करा


होळीचा सण म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा व जल्लोषाचा उत्सव. यंदा दिनांक ९ मार्च रोजी साजरी होणारी फाल्‍गुन शुध्‍द पौर्णिमा म्‍हणजे होळी पौर्णिमा किंवा हुताशनी पौर्णिमा. ग्रामीण व शहरी भागामध्‍ये होळीच्‍या दोन-चार दिवस आधीपासूनच या सणाचे वारे वाहू लागतात. लहान मुले व तरुणांना या सणाची भारी ओढ असते. होळी दहनाच्‍या कार्यक्रमापासून रंगपंचमीपर्यंत तरुणाईचा उत्‍साह अगदी शिगेला असतो. मात्र हा होळी सण साजरा करत असताना आरोग्य व पर्यावरणाचे भानदेखील राखणे तितकेच महत्‍वाचे आहे. ग्रामीण भागात होलिका दहनासाठी जंगलातील वृक्षतोड केली जाते तर शहरी भागातदेखील झाडे तोडून किंवा वखारीतून होळीसाठी लाकडांची व्‍यवस्‍था करण्‍यात येते. खरेतर अशा प्रकारची वृक्षतोड करुन निसर्गाची न भरुन येणारी हानीच होत असते. त्‍यामुळे होळी दहनासाठी लाकडांचा वापर न करता घरातील किंवा परिसरातील निरुपयोगी वस्‍तू, पेपर, प्‍लॅस्‍टीक अशा गोष्‍टींचा वापर केल्‍यास पर्यावरणाचे नुकसान होणार नाही व घराची-परिसराची स्‍वच्‍छतादेखील राखली जाईल. होळी हा सण वाईट, दृष्‍ट, विचार, कल्‍पना व अपप्रवृत्‍तींना दहन करण्‍याचा सण आहे. त्‍याऐवजी आपल्‍याला अन्‍न, वस्‍त्र्, निवारा देणा-या वृक्षांची कत्‍तल करुन आपले नुकसान तर करत आहोतच पण निसर्गाच्‍या सौंदर्याला गालबोट लावण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत. होळीदहनानंतरचा दुसरा दिवस धुलिवंदनाचा तर पाचवा दिवस रंगपंचमीचा. या दिवशी विविध रंग व पाणीमिश्रीत रंग एकमेकांना लावण्‍याचा खेळ खेळला जातो. या खेळामध्‍ये वापरण्‍यात येणारे व बाजारात उपलब्‍ध असलेले रंग रसायनमिश्रीत व मानवी शरीराला अपायकारक असल्‍याने त्‍याचे दुष्‍परिणाम लोकांना भोगावे लागतात. यातील बरेचसे रंग विदेशी बनावटीचे असतात जे रसायनमिश्रीत असल्‍यामुळे त्‍वचेला अपायकारक असतात. या रंगांमुळे त्‍वचारोग तसेच कान-नाक-डोळयाच्‍या आजारांची लागण होण्‍याची शक्‍यतादेखील बळावते. त्‍यामुळे संभाव्‍य त्‍वचा वि‍कार व खेळ खेळताना होणा-या अपघातांची शक्‍यता लक्षात घेता नैसर्गिक रंगांनी किंवा शरिराला हानी न पोहचवणा-या रंगानी होळी खेळली पाहिजे, पाण्‍याचादेखील किमान वापर केला पाहिजे. तसेच एकमेकांना रंग लावताना सुरक्षेच्‍या दृष्‍टीनेदेखील सर्वतोपरी काळजी घेतली गेली पाहिजे. आज सर्वत्र होळी व धुळवडीचा सण म्हणजे मद्यपी व विविध व्यसने करणाऱ्या लोकांचाच उत्सव म्हणून ओळखला जातो. या दिवशी अनेक अतिउत्साही मद्यपी आपल्या 'सवंगड्यांसह' स्वतःच्याच दुनियेत मग्न होताना दिसतात. त्यामुळे या दिवशी आरोग्य व पर्यावरणाची नको तितकी हानी केली जाते. निसर्गावर व शरीरावर विपरीत परिणाम करणाऱ्या ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्यामुळेच होळीचा सण साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची खबरदारी घेण्‍याबरोबरच रंगाचा बेरंग होणार नाही याचीदेखील आपण काळजी घेतली पाहिजे. त्‍यामुळे हा होळी सण पर्यावरणपूरक, नैसर्गिक रंगानी, व्यसनरहित व सुरक्षितपणे आपण साजरा करावा हयाच या निमित्‍ताने शुभेच्‍छा.   


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त