कोरोना आणि वृत्‍तपत्रे

कोरोना आणि वृत्‍तपत्रे


शहरी व ग्रामीण भागातील लोकांच्‍या जिवनात वृत्‍तपत्रांचे महत्‍व अनन्‍यसाधारण आहे. आजकालच्‍या सोशल माध्‍यमाच्‍या दुषीत व संभ्रमावस्‍था निर्माण करणा-या वातावरणात विश्‍वासार्ह बातम्‍या वाचण्‍यासाठी लोक वृत्‍तपत्रांकडे वळतात. त्‍यामुळे घरोघरी वाचली जाणारी ही वृत्‍तपत्रे आपले एक वेगळे स्‍थान जनमानसांत टिकवून आहेत. मात्र सध्‍या कोरोना प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर वृत्‍तपत्रांमधुनदेखील संसर्ग पसरतो असा समज तयार झाल्‍याने काही दिवसांपूर्वी या वृत्‍तपत्रांच्‍या विक्रीवरदेखील निर्बंध आणण्‍यात आले. मात्र वृत्तपत्रांमुळे करोना विषाणूचा संसर्ग होत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटना व वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केल्याने वृत्तपत्र वाचकांमध्‍ये आनंदाची लहर पसरली आहे. आधीच लॉकडाऊनमुळे घरी बसलेल्‍या लोकांचा वेळ जात नाही. मिनिटामिनिटाला बदलणा-या न्‍युज चॅनलवरील त्‍याच त्‍याच बातम्‍यांनी लोक कंटाळुन गेलेले आहेत. त्‍यातच घरी येणारे हक्‍काचे वृत्‍तपत्रदेखील बंद झाल्‍याने चोखंदळ वाचकांमध्‍ये नाराजी होती. अनेक वृत्‍तपत्र मालकांनी तर वृत्‍तपत्रांवर निर्बंध आणल्‍याने छापाई करणे किंवा डिजीटल प्रकाशित करणेदेखील सोडून दिले आहे. मात्र वृत्‍तपत्रांमधून संसर्ग होत नसल्‍याचा खुलासा करण्‍यात आल्‍याने आता एक एप्रिल पासुन  मुंबई, पुण्यासह राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण सुरू करणे सोपे झाले  आहे. तसेच अनेक वृत्‍तपत्रांनी आपल्‍या पत्रकारतेत खंड पडू न देता बंदीच्‍या काळात छापील अंक वितरित केलेला नसला, तरीही डिजिटल माध्यमातून हा अंक वाचकांपर्यंत पोहचवून आपली भुमिका चोख बजावलेली आहे. त्‍यामुळे अशा वृत्‍तपत्रांचे कौतुक करायलाच हवे. वाचकांनीही या डिजिटल अंकांना उदंड प्रतिसाद दिला. अनेक व्‍हाटसअप तसेच फेसबुक यासारख्‍या सोशल माध्‍यमांवर हे डिजिटल अंक अगदी दिमाखात पसरवले जात होते. पण त्याचबरोबर प्रत्यक्ष अंक कधी हातात येणार या विवंचनेत अनेक वाचक होते. करोना विषाणूच्‍या संकटामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. सगळीकडे अगदी चिंतेचे वातावरण आहे. कधी एकदा ही परिस्‍थीती निवळते याकडे सर्वजण डोळे लावून बसले आहेत. अशा वेळी लोकांचे प्रबोधन करण्‍याचे व परिस्‍थीतीचे वास्‍तव लोकांसमोर आणण्‍याचे काम ही वृत्‍तपत्रे करत असतात. बातमीदार व संपादक जिवाचे रान करुन बातम्‍या गोळा करतात, वाचनीय लेख संकलित करतात व शक्‍य तितक्‍या हजरजबाबीपणे लोकांपर्यंत पोहचवण्‍याचा प्रयत्‍न करतात. या काळात समाजमाध्यमे किंवा बातम्यांच्या इतर स्रोतांतून मिळणारी माहिती कितपत विश्वासार्ह असते, याचा अनुभव सगळ्यांनी घेतला आहेच. मोठया प्रमाणावर अफवा, गैरसमज वाढविणा-या बातम्‍या व संभ्रमावस्‍था अशी अवस्‍था ही सोशल माध्‍यमे करुन टाकतात. त्‍यामुळेच वर्तमानपत्रे ही वास्‍ताविक व विश्‍वासार्हतेची ओळख मानली जातात.
''वृत्‍तपत्रांमधून कोरोना संसर्ग पसरतो'' ही जागतिक आरोग्य संघटनेपासून ते आपल्या देशातील डॉक्टरांची शिखर संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनपर्यंत प्रत्येक संस्थेने ही अफवाच असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. वर्तमानपत्रे छापताना किंवा वितरित करतानाही योग्य ती सर्व काळजीदेखील घेण्‍यात येते. मुद्रणालयामध्ये कागदाला मानवी स्पर्शही होणार नाही इतके अत्याधुनिक तंत्रज्ञान आज वापरले जाते. वृत्‍तपत्र वितरकदेखील आवश्यक ती सर्व काळजी घेत असतात. या व्‍यवसायावर हजारो, लाखो लोकांची उपजिविका सुरु आहे. त्‍यामुळे कोरोनामुळे उदभवलेल्‍या विपरीत परिस्‍थीतीत वृत्‍तपत्र विक्रेते देशोधडीला लागू नयेत असे वाटते. योग्य माहिती मिळणे हा वाचकांचा अधिकार आहे व हा अधिकार त्‍यांच्‍यापर्यंत पोहोचवण्‍याचे काम वृत्‍तपत्रे व वितरक करत आहेत. त्‍यामुळे कुठल्‍याही प्रकारच्‍या आपत्‍तीजनक परिस्‍थीतीत सेवा देणा-या लोकशाहीच्‍या हया चौथ्‍या स्‍तंभाचा गांभिर्याने विचार व्‍हायलाच हवा. वृत्‍तपत्रे जगली तरच वाचनसंस्‍कृती जगेल, त्‍यामुळे वृत्‍तपत्रांना योग्‍य तो सन्‍मान देण्‍याची जबाबदारी सामुहिक आहे.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त