जान है तो जहान है



लॉकडाऊनमुळे कंटाळा आलाय, घरात बसवत नाही, शारीरिक व्यायाम होत नाही, प्रवास करता येत नाही, मनासारखी शॉपिंग करता येत नाही, रस्त्यावर भटकताही येत नाही अशा तक्रारी सध्या वाढू लागल्यात. पंधरा वीस दिवस घरातच बसल्याने अनेक लोक अस्वस्थ झालेत. १४ तारखेला लॉकडाऊन शिथिल होईल या आशेने बसलेल्यांची तर घनघोर निराशाच झाली. परवा बांद्रा रेल्वे स्टेशनवर गावी परतण्यासाठी हजारो लोक जमा झाल्याने प्रचंड गोंधळ उडाला. खरेतर या गोष्टींवरून लोकांना अजून कोरोना विषाणूची दाहकता लक्षात आलेली दिसत नाही असेच म्हणावे लागेल. जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या वीस लाखांवर गेली आहे. महाराष्ट्रात हा आकडा अडीच हजारापार गेला आहे. मृत्यूचा आकडा दोनशेच्या घरात आहे. मुंबईत ह्या आजाराचे देशामधील सर्वाधिक रुग्ण सापडले असताना लॉकडाऊन वाढवणे क्रमप्राप्तच होते. सरकारचा हा निर्णय सध्याच्या परिस्थीतिला धरूनच आहे. या विषाणूची निर्माण होत असलेली साखळी तोडणे अत्यंत महत्वाचे आहे. या विषाणूमुळे पसरलेली जागतिक महामारी पाहता सरकार लोकांच्या सुरक्षिततेसाठी गँभीर असताना अनेकांच्या ध्यानात ह्या आजाराचे गांभीर्य येत नाही हे खरेतर आकलनापलीकडले आहे. बाजारात भाजी, किराणा खरेदीसाठी होत असलेली गर्दी पहिली तर आजही लोकांना या विषाणूपेक्षा या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत आहेत असेच दिसून येते. संसर्गाने पसरणाऱ्या ह्या आजाराचा एक व्यक्ती हजारो लोकांना बाधित करू शकतो. परदेशात या विषाणूने माजवलेला हाहाकार उघड्या डोळ्यांनी दिसत असताना आपल्या दारापर्यंत पोहोचलेला हा धोका अनेकांना दिसत नाही याचेच अप्रूप वाटते. परप्रांतातील कामगार, बेरोजगार व ठिकठिकाणी अडकून पडलेल्या लोकांची पोटापाण्याची जबाबदारी घेण्यास सरकार तयार असताना लोकांना काही काळ धीर धरवत नाही ही शोकांतिका आहे. बांद्रा स्टेशनवर झालेला प्रकार तर याचा कळसच म्हणावा लागेल. सोशल डिस्टनसिंगसाठी एकीकडे अट्टाहास चाललेला असताना हजारो लोक एकत्र येणे म्हणजे या आजाराला स्वतःहून निमंत्रण देण्यासारखे आहे. याने हजारो लाखो लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे येणारे काही दिवस तरी लोकांनी आवश्यक काळजी घेत आहे तिथेच थांबणे आवश्यक आहे. सरकार योग्य मार्गाने परिस्थिती हाताळत असून त्याला सर्वांची मिळणारी साथच महामारीपासून मुक्ती मिळण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे लोकहो, थोडी कळ काढा, घरातच बसा, शेवटी जान है तो जहान है. 

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त