नाण्याची दुसरी बाजू

ठणठणीत रुग्‍ण नाण्‍याची दुसरी बाजू








महाराष्‍ट्रातील कोराना बाधितांची संख्‍या पाच हजारांच्‍या उंबरठयावर आहे. मात्र या आजारातुन बरे होऊन घरी परतणा-यांची संख्‍यादेखील लक्षणीय आहे हे दुर्लक्षित करुन चालणार नाही. जवळपास ६०० जण या आजारातुन पूर्णपणे बरे होऊन घरी परतलेले आहेत. खरेतर हे चित्र आशादायक व लोकांना दिलासा देणारे आहे. मात्र दररोज वृत्‍त वाहीन्‍यांवर दाखविण्‍यात येणा-या कोरोनाच्‍या दाहकतेमुळे लोक प्रचंड तणावाखाली आहेत. या आजारापासुन स्‍वतःचा बचाव करण्‍यासाठी आवश्‍यक काळजी ही घेतलीच पाहिजे मात्र उगाचच त्‍याला घाबरुन त्‍याचे दडपण घेतले तर मानसिक ताण व गैरसमजांमुळे होणा-या रुग्‍णसंख्‍येतदेखील मोठी भर पडेल एव्‍हढे लक्षात घेतले पाहीजे. त्‍यामुळे लोकांच्‍या मनातील या आजाराविषयी असलेले दडपण आता दुर करण्‍याची आवश्‍यकता आहे. कोरोनासारख्‍या गंभीर आजारातुन बरे होता येते हे ठणठणीत बरे झालेल्‍या जवळपास ६०० जणानी दाखवून दिले आहे. त्‍यामुळे कोरोनाची उगाच धास्‍ती बाळगण्‍याची गरज नाही मात्र प्रत्‍येकाने प्रतिबंधात्‍मक काळजी ही घेतलीच पाहिजे. महत्‍वाचे म्‍हणजे प्रसारमाध्‍यमांनी आजाराची सकारात्‍मकता लोकांसमोर प्रभावीपणे आणायला हवी. ज्‍या वेगाने हया आजाराचे रुग्‍ण वाढताहेत त्‍याच पध्‍दतीने रुग्‍ण बरे देखील होत आहेत हा संदेश लोकांमध्‍ये जायला हवा. जेणेकरुन लोकांमधील भीतीचे वातावरण काही अंशी कमी होईल. असाध्‍य आजार अशी ओळख निर्माण झालेल्‍या कोरोनावर मात करत गरोदर स्त्रीया, लहान मुले, वयोवृध्‍द मंडळी ठणठणीत बरे होऊन घरी परतताना दिसत आहेत ही सर्वांच्‍या दृष्‍टीने समाधानाची बाब असुन सामाजिक स्‍वास्‍थ्‍य प्रस्‍थापित करणारीदेखील ठरु शकते. यासाठी दुरचित्रवाहिन्‍यांनी आता आपल्‍या बातम्‍यांमध्‍ये बरे होणा-या कोरानाबाधित रुग्‍णांची संख्‍या ठळकपणे प्रदर्शित करावी व लोकांना हया आजारावर शासन करत असलेल्‍या उपचारांबाबत आश्‍वासित करावे. तसेच कोरोना रुग्‍णांवरील उपचारांमधील चित्र जरी आशादायक असले तरी लोकांनी एकदम निश्चिंत होऊन भ्रमंती करावी असे वातावरण तयार होणार नाही याचीदेखील दक्षता घेणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. कारण संसर्गाचा धोका अजुन टळलेला नाही. जोवर या आजाराचा एकही रुग्‍ण महाराष्‍ट्रात आढळणार नाही तोवर बिनधास्‍त राहून चालणार नाही. यासाठी सकारात्‍मक बातम्‍यांची आजाराच्‍या परिणामकारकतेशी सांगड घालणेदेखील तितकेच महत्‍वाचे आहे. त्‍यामुळेच लोकांमध्‍ये सध्‍या पसरलेले भितीचे वातावरण दूर करुन आशादायक मानसिकता तयार करण्‍याचे काम प्रसिध्‍दी माध्‍यमे चांगल्‍या प्रकारे करु शकतात. कोरोना प्रतिबंधासाठी सध्‍या सुरु असलेले सोशल डिस्‍टंसिंग, व्‍यक्‍तीगत सुरक्षा वगैरे या प्रतिबंधात्‍मक उपायांसोबतच या आजारातुन बरे होणा-या रुग्‍णांबाबत व्‍यापक प्रसिध्‍दी होणे गरजेचे आहे. कारण ठणठणीत बरे होणारे रुग्‍ण हे नाण्‍याची दुसरी बाजू आहेत.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई    

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त