पोलिसांच्‍या पाठीवर कौतुकाची छाप

पोलिस व आरोग्‍य यंत्रणांंचे काम योध्‍दयासारखे 

करोनाच्‍या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्‍कळीत झालेले असुन जवळपास दीड महिन्‍यांपासुन लोक लॉकडाऊनमध्‍ये आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नगर आदींसह ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र महाराष्‍ट्रासारख्‍या एक मोठया राज्‍यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्‍यात आरोग्‍य यंत्रणांना मिळत असलेले यश एकमेवाव्दितीय आहे असेच म्‍हणावे लागेल. वेळेत निदान, योग्‍य उपचारपध्‍दती व संशयीत रुग्‍णांचे उचित नियोजन यामुळे राज्‍यातील यंत्रणांना या आजाराचा संसर्ग रोखण्‍यात ब-यापैकी यश आले आहे. एकंदरीत करोनाला पराभूत करण्‍याचा निर्धार राज्य सरकारनं केलेला आहे. या सर्वांमध्‍ये आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी आणि पोलीस विभाग हे एखाद्या योद्ध्यासारखा लढा देत आहेत. सर्वच जण झोकून काम करताना दिसत आहेत. एकीकडे सर्वसामान्‍य नागरीक कोरोना संशयीताच्‍या संपर्कात येण्‍यापासुन टाळण्‍यासाठी सामाजिक अंतर राखण्‍याचा आटोकाट प्रयत्‍न करताना दिसत आहेत तर दुसरीकडे रुग्‍णालयांमधील डॉक्‍टर, नर्स व इतर कर्मचारी वर्ग कोरोना बाधित रुग्‍णांच्‍या संपर्कात चोवीस तास त्‍यांच्‍या सेवेत व्‍यस्‍त आहेत. सर्वात महत्‍वाची भुमिका आज आपले पोलीस पार पाडताना दिसत आहेत. रस्‍त्‍यारस्‍त्‍यांवर, गल्‍लोगल्‍ली गस्‍त घालणारे पोलिस कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी कठोर उपाययोजना आखत सर्वांगाने प्रयत्‍न करताना दिसत आहेत. त्‍यामुळे कोरोनाविरुध्‍दच्‍या या लढाईतुन पोलिस वजा झाले तर काय परिस्‍थीती होईल याची कल्‍पनाही करवत नाही. असे झाले तर आपल्‍याकडे वुहान वा न्‍यूयार्कपेक्षा वेगळी परिस्‍थीती नसेल. आज प्रत्‍येकाला स्‍वताचा जीव प्रिय झालाय मात्र पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचारी डोळ्यांत तेल घालून पहारा देत आहेत. करोनाचे वाहक ठरणाऱ्यांना जिल्हा, तालुका आणि शहरांच्या सीमेवर रोखण्याचं काम केलं जात आहे. जशी ही सगळी यंत्रणा आपलं कर्तव्य बजावत आहे, तसंच नागरिकही आपले 'कर्तव्य' बजावत असल्‍याचे सुखद चित्र आपल्‍या राज्‍यात आहे. समाजातील अनेक नागरीक, सामाजिक संस्‍था आपली संवेदनशिलता दाखवत आरोग्य यंत्रणा आणि पोलिसांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहेत. खरेतर हीच आपल्‍या महाराष्‍ट्राची संस्‍कृती आहे. याचे एक उत्‍तम उदाहरण नुकतेच नाशिकमध्‍ये पाहायला मिळाले. नाशिकच्या सिडको भागात पोलिसांचा रुट मार्च निघाला होता. त्यावेळी नागरिकांनी त्‍यांच्‍यावर फुलांचा वर्षाव आणि टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचं स्वागत केलं. लॉकडाऊनदरम्यान पोलीस महत्वाची ठिकाणं, नाके, मुख्य रस्ते आणि विविध चौकांत तैनात आहेत. वाहनांची आणि अनावश्यक बाहेर पडणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करतात. प्रसंगी त्यांच्यावर कारवाईही केली जाते. अनेक पोलीस कर्मचारी तर अनेक दिवस आपल्या घरीही गेले नाहीत. पोलीस कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या राज्यातील, परिसरातील नागरिकांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहेत. त्‍यामुळेच, सर्वसामान्य नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी पार पाडली पाहिजे, या उद्देशानं नाशिककरांनी पोलिसांचे जोरदार स्वागत केले. करोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा म्हणून संचारबंदीत अनेक नियम घालून दिले आहेत जेणेकरुन सोशल डिस्टन्सिंगचं पालन नागरीकांनी करावं. या नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी पोलिसांनी केलेल्‍या हया संचलनादरम्‍यान नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत आपल्या घराच्या गॅलरीत उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करून पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पोलिसांच्या स्वागतासाठी काही ठिकाणी नागरिकांनी रांगोळ्यादेखील काढल्या होत्या. सध्‍या सुरु असलेल्‍या प्रचंड उकाडयातही कसलीच अपेक्षा न करता पोलिस आपलं कर्तव्य बजावत आहेत. अशा परिस्‍थीतीत त्‍यांच्‍या कार्याचा गौरव होणे नक्‍कीच चांगली बाब आंहे. करोनाचा कहर अजुन संपलेला नाही. आंतराष्‍ट्रीय स्‍तरावर हाहाकार माजवलेल्‍या हया जीवघेण्‍या गंभीर विषाणूविरुध्‍दची लढाई चिरकाल चालणारी असुन त्‍यासाठी पोलिस व आरोग्‍य यंत्रणांना बळ मिळण्‍यासाठी नागरीकांची लहानशी कौतुकाची थाप त्‍यांचा आत्‍मविश्‍वास वाढवणारी ठरेल एव्‍हढे नक्‍की. 


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई







Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त