घरबसल्या मिळवा ई संजीवनीद्वारे मोफत आरोग्यसेवा

केंद्र शासनाचा अभिनव उपक्रम


कोरोना आजाराचा मुकाबला करण्‍यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्‍नांची पराकाष्‍ठा करत आहे. आज या आजारावर नियंत्रण मिळवण्‍यात काही अंशी तरी आपल्‍याला यश मिळाले आहे असेच म्‍हणावे लागेल. याला कारणीभुत आहे ते आपल्‍या देशात व महाराष्‍ट्रात अगदी वेळेवर जाहीर केलेला लॉकडाऊन. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेता   राज्‍यातील जनतादेखील लॉकडाऊनच्‍या काळात गेल्‍या सहा सात आठवडयांपासुन घरात बसुन प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करत आहे. त्‍यामुळेच इतर देशांच्‍या तुलनेत व आपल्‍या लोकसंख्‍येच्‍या मानात करोनाचा फार प्रसार व  संसर्ग आपल्‍याकडे अदयापपर्यंत होऊ शकलेला नाही. मात्र या लॉकडाऊनच्‍या काळात एक महत्‍वाची समस्‍या उदभवलेली आहे व ती महणजे ज्‍या लोकांना अथवा रुग्‍णांना वैदयकीय उपचारासाठी घराबाहेर पडणे शक्‍य होत नाही त्‍या रुग्‍णांना वेळेत उपचार मिळणे अडचणीचे ठरत आहे. मात्र अशा रुग्‍णांसाठी केंद्रीय आरोग्‍य विभागाने पुढाकार घेत एक नवीन योजना सर्वांसमोर आणली आहे. ई संजीवनी या नावाने सुरु करण्‍यात आलेल्‍या या योजनेनुसार रुग्‍णांचा घरबसल्‍या तज्‍ज्ञ डॉक्‍टरांशी थेट ऑनलाईन संवाद व संपर्क होतो व रुग्‍णाला आपल्‍या आजारावर डॉक्‍टरांकडून प्रिस्‍क्रीप्‍शदेखील मिळते. सध्‍या देशभरात महाराष्‍ट्र तसेच आंध्र प्रदेश, उत्‍तर प्रदेश आणि  हिमाचल प्रदेशात ही ई संजीवनी आरोग्‍य सेवा सुरु करण्‍यात आलेली आहे. महाराष्‍ट्रात या योजनेची सुरुवात नाशिक, नांदेड, औरंगाबाद, भंडारा, पुणे या ठिकाणी सुरु करण्‍यात आलेली आहे. मात्र महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून या पोर्टलद्वारे संपर्क साधता येईल. लॉकडाऊनच्‍या काळात घराबाहेर पडणारे बहुतांश नागरीक वैदयकीय सेवा मिळवण्‍यासाठी घराबाहेर पडत असल्‍याचे सातत्‍याने निदर्शनास आले आहे. या कारणास्‍तव केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाने नागरीकांना घरबसल्‍या आरोग्‍य सेवा उपलब्‍ध व्‍हावी यासाठी हया पोर्टलची निर्मिती केली आहे. यासाठी esanjeevaniopd.in या संकेतस्‍थळाची निर्मिती केली गेली आहे ज्‍यावर जाऊन रुग्‍णांना नोंदणी करावी लागणार आहे. त्‍यात नमुद केलेल्‍या फोनवर ओटीपी येतो. व्‍हेरीफीकेशन झाल्‍यावर रुग्‍णाला टोकन मिळते व रुग्‍णाचा लॉगीन आयडी तयार होतो. यानंतर रुग्‍णाची नोंद प्रतिक्षा यादीत होते आणि काही क्षणातच व्‍हॉईस कॉलव्‍दारे विशेष कक्षातील डॉक्‍टरांशी रुग्‍णाचा थेट संपर्क होतो. कोरोनाच्‍या लक्षणांसह अन्‍य व्‍याधी किंवा आजारांच्‍या रुग्‍णांना या सेवेचा मोठा फायदा मिळणार आहे. यासाठी शासकीय आरोग्‍य संस्‍थांच्‍या ठीकाणी विशेष ऑनलाईन ओपीडी कक्ष स्‍थापन करण्‍यात आलेले आहेत. या ओपीडीमध्‍ये उपस्थित डॉक्‍टर तात्‍काळ रुग्‍णाशी व्हिडीओ कॉलव्‍दारे थेट संवाद साधतात व रुग्‍णाच्‍या आजारानुसार ओपीडी केस फाईल करुन त्‍यांना औषधांचे प्रिस्‍क्रीप्‍शन ऑनलाईन पाठवतात. सदर प्रिस्‍क्रीप्‍शन औषध विक्रेत्‍यास दाखवुन रुग्‍णाला औषधे मिळतात. त्‍यामुळे डॉक्‍टरांचा सल्‍ला व इतर उपचार रुग्‍णांना घरबसल्‍या मिळत आहे. ही सेवा पूर्णपणे मोफत असुन त्‍याचा लाभ सुरुवातीच्‍या चार पाच दिवसांमध्‍येच राज्‍यातील शंभरच्‍या वर रुग्‍णांनी घेतलेला आहे. या ई संजीवनी ओपीडीची वेळ सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा अशी असून रविवारी ओपीडी बंद असणार आहे त्‍यामुळे वैदयकीय उपचारासाठी आता घराबाहेर न पडता घरात बसुन रुग्‍णांना आरोग्‍य सेवेचा लाभ ई संजीवनी योजनेव्‍दारा घेता येणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर आरोग्‍य विभागाचा हा उपक्रम सर्वच स्‍तरातील लोकांना मोठा दिलासा देणारा असुन त्‍याचा चांगला परिणाम येत्‍या काळात समाजात दिसून येईल अशी आशा करण्‍यास हरकत नाही.


































घरातच राहा, सुरक्षित राहा..


वैभव मोहन पाटील

घणसोली, नवी मुंबई              

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त