पोलिसांनो, काळजी घ्या
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
पोलिसांनो, काळजी घ्या
कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा आता १००० च्या वर गेलेला आहे. यामध्ये १०० पेक्षा अधिक पोलिस अधिका-यांनादेखील कोरोनाची लागण झालेली आहे. खरेतर आरोग्य यंत्रणांबरोबर पोलिसदेखील या कोरोनाविरुध्दच्या युध्दातील आघाडीचे शिलेदार आहेत. आज महाराष्ट्रातील परिस्थीती ब-याच अंशी नियंत्रणात आहे याला जबाबदार पोलिसांची कर्तव्यनिष्ठता आहे. २४ तास रस्त्यांवर उतरुन काम करत आहेत, लोकांना घराबाहेर पडू नका म्हणून भावनिक साद घालत आहेत तर प्रसंगी पालक बनून लाठीचा मारदेखील देत आहेत. अगदी गावाकडे निघालेल्या लोकांना सहकार्य करण्यापासुन ते अडचणीत सापडलेल्या लोकांना मार्ग दाखवण्यापर्यंत सर्व प्रकारची मदत पोलिस आज जागोजागी करताना दिसत आहेत. हि मदत करत असताना पोलिसांनाच या आजाराची लागण आता मोठया प्रमाणावर होताना दिसत आहे. कोरोनाविरुध्दच्या या लढाईत पोलिसांची भुमिका अत्यंत मोलाची असल्याकारणाने त्यांनी आता स्वतःची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. पोलिसांना आजाराची लागण होत असल्याने त्यांचे मनोधैर्य खच्ची होता कामा नये. त्यांनी मानसिक दडपणाखाली येऊन काम करता कामा नये. यासाठी पोलिसांनी आपले कर्तव्य बजावताना योग्य ती दक्षता घेणे गरजेचे आहे. प्रतिबंधात्मक साधनांचा वापर व शक्य तितके सोशल डिस्टंसिंग राखून काम करणे गरजेचे आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयांनी उपचारांमध्ये पोलिसांना थोडी सुट व सवलत देऊन त्यांच्या उपचारांना विशेष दर्जा देण्याबाबत विचार करावा असे वाटते. आरोग्य यंत्रणांसाठी सर्व रुग्ण समान असतात हे मान्य मात्र किमान पोलिसांची हेळसांड व त्यांना अवमानजनक वागणूक तरी देऊ नये. यामुळे पोलिस विभागाचे व पोलिसांच्या कुटुंबियांचे मनोबल वाढण्यास नक्कीच मदत होईल. आज कोरोनाची लागण झालेले हजारो पोलिस उदया या आजारातून बरे होऊन नक्की घरी परततील पण त्यांना यादरम्यान मिळणारी वागणूक व उपचार त्यांच्यात पुन्हा नव्याने जोमाने कामाला लागण्याचे बळ नक्कीच निर्माण करतील.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps


Comments
Post a Comment