डॉक्‍टर नव्‍हेत ''देवदूतच''

डॉक्‍टर नव्‍हेत ''देवदूतच''

सााधारण दोन आठवडयांपूर्वीची घटना आहे. कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे सध्‍या सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. अशातच ठाण्‍याच्‍या पारसीक नगर येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या माझे मामांची तब्‍येत अचानक बिघडली. दोन वर्षांपूर्वी झालेला त्रास त्‍यांना पुन्‍हा एकदा उदभवला. तीन चार दिवसांपासुन अस्‍वस्‍थता व अशक्‍तपणामुळे बेजार झालेले मामा त्‍या दिवशी दुपारी झोपल्‍यानंतर सायंकाळी उशीरापर्यंत उठेचनात. घरामध्‍ये असलेल्‍या मामी व मामाचा मुलगा अनूप दोघेही घाबरले. त्‍यांची ती अवस्‍था पाहून मामींचा सायंकाळी सातच्‍या सुमारास मला फोन आला. मामी तशा खंबीर, अनेक अडचणीच्‍या प्रसंगी प्रसंगावधान दाखवत योग्‍य मार्गदर्शन करणा-या म्‍हणून त्‍यांची कुटुंबात ओळख आहे. मात्र त्‍यांचा फोनवरील थोडासा बदललेला स्‍वर लगेच लक्षात आला व प्रसंगााचे गांभिर्य लक्षात घेत भावाला घेऊन मी लगेच पारसीक नगरच्‍या दिशेने निघालो. रस्‍त्‍यातच १०८ या हेल्‍पलाईनवर फोन करुन रुग्‍णवाहिकेची व्‍यवस्‍था केली. रुग्‍णवाहिका व आम्‍ही एकाच वेळेस साडेसातच्‍या सुमारास मामांच्‍या घरी पोहोचलो. मामांची हालचाल पूर्णपणे मंदावली होती. त्‍यांना जागे करण्‍याचा निष्‍फळ प्रयत्‍न आम्‍ही करत होतो. नंतर सोसायटीतील आणखी एक दोन रहिवाशांच्‍या मदतीने आम्‍ही त्‍यांना रुग्‍णवाहिकेत ठेवले. कोरोनाच्‍या साथीमुळे ठाण्‍याचे शासकीय रुग्‍णालय व ठाण्‍यातील इतर अनेक मोठी रुग्‍णालये कोरोना समर्पित करण्‍यात आलेली आहेत. अगदी मामांच्‍या घराजवळ असलेले व मागिल आजारपणाच्‍या वेळेस त्‍यांचेवर उपचार केलेले सफायर हे रुग्‍णालयदेखील कोरोना रुग्‍णांसाठी आरक्षित असल्‍याचे समजल्‍यामुळे मामांना कुठे घेऊन जावे यासाठी पर्याय सापडत नव्‍हता. मात्र मामींनी प्रसंगावधान दाखवत ओळखीलतल्‍या डॉक्‍टरांकरवी कळव्‍याच्‍या प्रकृती रुग्‍णालयाशी संपर्क साधला. योगायोगाने त्‍याच रुग्‍णालयात माझे परिचीत असलेले डॉ. साळवे हेदेखील उपस्थित होते. त्‍यांचेशी बोलून मामांना तडक प्रकृतीमध्‍ये घेवून आलो. कोरोना साथीमुळे रुग्‍णालयाने रुग्‍ण व नातेवाईकांसाठी लावलेले सुरक्षेचे सर्व नियम पाळत रुग्‍णालयातील डॉ. साळवे व डॉ. अल्‍पना यांच्‍या मदतीने मामांना दाखल करण्‍यात आले. मामा हायपॅटीकोमामध्‍ये गेल्‍याचे आमच्‍या लक्षात आले. डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍यानुसार त्‍याच अवस्‍थेत मामांच्‍या एमआरआय व सिटी स्‍कॅन हया चाचण्‍या आम्‍ही कळव्‍याच्‍या छत्रपती शिवाजी महाराज रुग्‍णालयातुन करुन घेतल्‍या. त्‍यानंतर लगेचच उपचार सुरु झाले. मामांची अवस्‍था पाहता पुढील ४८ तास जोखमीचे असुन त्‍यानंतरच काही सांगता येईल याची स्‍पष्‍ट कल्‍पना आम्‍हाला डॉक्‍टरांनी दिली. रुग्‍णालयातील डॉ. देशपांडे, डॉ. साळवे यांच्‍या सल्‍ल्‍यानुसार अगदी युध्‍दपातळीवर उपचारांना सुरुवात झाली. दुस-या दिवशीदेखील प्रकृतीत सुधार होत नसल्‍याचे लक्षात आल्‍यावर डॉक्‍टरांनी आम्‍हाला संभाव्‍य धोक्‍याची कल्‍पना दिली व उपचार सुरुच ठेवले. त्‍यामुळे आमच्‍या चिंतेमध्‍ये आणखीच वाढ झाली. अखेर तिस-या दिवशी मामांनी उपचारांना साथ देत हालचाल सुरु केली व आमच्‍यासहित रुग्‍णालयातील डॉक्‍टर कर्मचा-यांना जरा धीर आला. त्‍यानंतर मामांची प्रकृती सुधारत गेली व तब्‍बल आठ दिवसानंतर त्‍यांना प्रकृतीमधून डिस्‍चार्ज देण्‍यात आला. या सर्वात आम्‍हाला अनमोल सहकार्य करणारे डॉ. देशपांडे, डॉ. साळवे, डॉ. अल्‍पना व रुग्‍णालयातील कर्मचा-यांचे आभार मानत लॉकडाऊनच्‍या या अडचणीच्‍या परिस्‍थीतीत देवदूतासारखे धावून येत मामांचे प्राण वाचवल्‍याबददल मामींनी त्‍यांना शतशः धन्‍यवाद दिले. या सर्व परिस्‍थीतीत मामी व त्‍यांचा मुलगा अनूप याचे धैर्य खूप कामी आले. मामांच्‍या गंभीर परिस्‍थीतीत ज्‍या धिराने त्‍यांनी परिस्‍थीती हाताळली त्‍यामुळेच मामा आज सुखरुप आहेत.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त