ग्रीन झोनमधील गर्दी धेकादायक
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
ग्रीन झोनमधील गर्दी धेकादायक
सध्या महाराष्ट्रामध्ये उदभवलेल्या अभूतपूर्व अशा कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर सरकारी यंत्रणांमार्फत युध्दपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात येत आहेत. गेले जवळपास दिड - दोन महिने लोक लॉकडाऊनमध्ये आहेत. सर्वच व्यवसाय, कार्यालये, कारखाने बंद अवस्थेत असल्यामुळे लोकांना तसे घराबाहेर पडण्याचे कारणही नाही. मात्र घरात बसुन तरी किती दिवस राहायचे हा विचार करणारेही अनेक आहेत. त्यामुळे कधी एकदा हा लॉकडाऊन संपतो व बाहेर पडतो या विचारात अनेकजण आहेत. त्यातच आता सरकारने महाराष्ट्राची रुग्णसंख्येनुसार ग्रीन, ऑरेंज व रेड झोन अशी विभागणी केल्याने लोकांच्या आशा आणखीच पल्लवीत झालेल्या आहेत. ग्रीन झोनमधील व्यवहार ब-याच अंशी सुरु करण्यास सरकारने परवानगी दिल्याने आता या भागात लॉकडाऊनचे नियम मोठया प्रमााणावर शिथील झालेले आहेत. मात्र याचा फायदा घेत ग्रीन झोनमधील जिल्हयांमध्ये लोक मोठया प्रमाणावर रस्त्यांवर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. ग्रीन झोनमधील जिल्हयांमध्ये गेल्या काही दिवसांपासुन एकही कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण न आढळल्याने हे जिल्हे आजच्या परिस्थीतीत सुरक्षित आहेत हे नक्कीच खरे आहे. याला कारणीभुत त्या जिल्हयातील यंत्रणांनी योजलेल्या उपाययोजना व घेतलेली प्रतिबंधात्मक काळजी हे आहे. सोशल डिस्टंसिंगचे कोटेकोर पालन करत या ठिकाणच्या नागरीकांनी कोरोनासारख्या असाध्य आजाराला आपल्यापासुन दूर ठेवले आहे यात शंका नाही. मात्र हा आजार सध्या महाराष्ट्रातील इतर अनेक महत्वाच्या शहरांसह देशभरात परमोच्च बिंदूवर आहे हे विसरता कामा नये. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम शिथील केले म्हणून सर्वत्र गर्दी करण्यासारखी परिस्थीती सध्या नक्कीच नाही. उदयोग धंदे, कार्यालये, दैनंदिन व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरु करण्यास हरकत नाही. मात्र कोरोनाचे संकट अजुन टळलेले नाही हे लक्षात घेतले पाहिजे. ग्रीन झोनमधील नागरीक सर्वत्र गर्दी करुन पुन्हा एकदा या आजाराला आपल्याकडे आमंत्रण देऊ पाहताहेत. त्यामुळे अनावश्यकरित्या कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता सोशल डिस्टंसिंगचे पालन सर्वत्र काटेकोरपणे व्हायलाच हवे. कोरोना विषाणू हा संसर्गाने झपाटयात पसरत असल्यामुळे तसेच लक्षणे लपवलेल्या किंवा लक्षणे दिसत नसलेल्या व्यक्तींमधूनदेखील संक्रमित होण्याची शक्यता असल्यामुळे ही गर्दी ग्रीन झोनमधील असली तरी उदया अनेकांच्या जिवावर उठू शकते. त्यामुळे आपला जिल्हा जरी ग्रीन झोनमधला असला तरी धोका कमी झालेला नाही हे ध्यानात घ्यायला हवे व काही दिवस तरी आपल्या मनावर, हालचालींवर व दिनक्रमावर संयम ठेवायला हवा. बाकी आपण सर्वजण सदयाची परिस्थीती जाणून आहातच.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment