निगेटिव्ह चाचण्यांतून पॉझिटिव्ह संदेश
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
''निगेटिव्ह'' चाचण्यांमधुन ''पॉझीटिव्ह'' संदेश
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या जवळपास १५ हजारांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. तर ६०० च्या आसपास रुग्ण या आजाराने मृत्यूमुखी पडले आहेत. यातील सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईतील असुन मुंबई हे या आजाराच्या बाबतीत आज देशातील सर्वाधिक संवेदनशील शहर बनले आहे. जवळपास दहा हजाराच्या घरात रुग्ण एकटया मुंबईत असुन मृत्यूंचा आकडादेखील मुंबईत सर्वाधिक म्हणजे साडेतीनशेच्या वर आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आज सर्वात जास्त काळजी घेण्याची गरज आहे. मुंबईला लागून असलेल्या ठाणे व नवी मुंबई शहरातदेखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे जी नक्कीच चिंतेत टाकणारी आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये अधिक रुग्ण हे ४० वर्षावरील असल्यामुळे वय जास्त असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचा आकडा अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रतिकार शक्ती किंवा विविध व्याधींनी ग्रस्त रुग्णामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आहे. तसेच हा आजार आता बाहेरील देशातून आलेल्या बाधित व्यक्तींना सोडून समाजात पसरु लागलाय व साखळी तुटत चाचलीय हे नक्की झाले आहे. त्यामुळे आता बाधित व्यक्ती व त्यांच्या संपर्कात येणा-या इतर व्यक्तींना शोधुन काढण्यासाठी प्रशासनाचा अधिक कस लागणार आहे. असे असले तरी महाराष्ट्रातील अनेक जिल्हयांमध्ये या आजाराचा शिरकाव व प्रसार थांबविता आलेला आहे ही देखील एक समाधानाची बाब आहे. गेल्या काही दिवसांपासुन कोरोनाचा एकही रुग्ण न सापडलेले ग्रीन झोनमधील जिल्हेदेखील राज्यात आहेत. लॉकडाऊनमध्ये जिल्हयांच्या सिमा बंद झालेल्या असल्यामुळे जिल्हांतर्गत संक्रमण बंद झाले तसेच जिल्हयातील रुग्णसंख्या शुन्यावर आणण्यात प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीमुळे अनेक जिल्हयांमध्ये आज करोनाचे दडपण असले तरी रुग्ण मात्र नाहीत आणि ही कामगिरी नक्कीच प्रशंसनीय आहे. राज्यातील सर्वच प्रमुख महानगरपालिका आज रेड झोनमधुन ग्रीन झोनमध्ये प्रवेश करण्यासाठी धडपडत आहेत. मात्र या सर्व धडपडीत लोकांच्या मनात या आजाराविषयी असलेली भिती घालवून सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे दुहेरी आव्हान पालिका प्रशासनांसमोर आहे. कोरोनासाठी महाराष्ट्रातील प्रयोगशाळा चाचण्यांचा आकडा मोठा असून तो दोन लाखांच्या घरात आहे. दररोज जवळपास चार पाच हजार चाचण्या राज्यात होत आहेत. त्यामुळे इतक्या मोठया प्रमाणावर चाचण्या होत असल्या तरी निगेटीव्ह चाचण्यांचा आकडादेखील लक्षणीय व प्रचंड आहे. एकूण प्रयोगशाळा चाचण्यांपैकी ९० टक्क्यांच्या वर चाचण्या निगेटिव्ह आलेल्या आहेत. त्यामुळे या ''निगेटिव्ह'' चाचण्यांतून एक प्रकारचा ''पॉझीटिव्ह'' संदेश मिळतोय. राज्यात सर्वााधिक चाचण्या होणे ही तपासण्यांची योग्य दिशा दर्शवत आहे. अधिकाधिक लोकांच्या चाचण्या झटपट झाल्याने पॉझीटिव्ह रुग्णांचे निदान लवकर होण्यास मदत होते व त्या अनुषंगाने उपचारांचा मार्गदेखील सुकर होतो. वेळेत निदान व उपचार सुरु झाल्याने रुग्णांची बरे होण्याची शक्यतादेखील वाढते आणि अशाच प्रकारे योग्य उपचाराने बरे होऊन रुग्णालयातुन घरी परतलेल्यांची संख्यादेखील महाराष्ट्रात अडीच हजारांच्या वर आहे. खरे तर चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले व कोरोनासारख्या गंभीर आजारावर मात करत बरे झालेल्यांचे हे आकडे सामाजिक वातावरण नक्कीच ''पॉझीटीव्ह'' करणारे आहेत. यामुळे लोकांच्या मनात कोरोनाविषयी असलेले दडपण काही अंशी कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे काही हॉटस्पॉट व महानगरपालिकांमध्ये आज कोरोना पसरताना दिसत असला तरी त्याच्यापेक्षा कीतीतरी पट अधिक चाचण्यांचे येत असलेले निगेटिव्ह रिपोर्ट व बरे झालेले रुग्ण सकारात्मकतेचे प्रतिक आहेत. त्यामुळे आजाराची लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन आवश्यक चाचण्या व उपचार करुन घेण्यास कचरु नका. उपचाराने कोविड सारख्या आजारावर मात करता येते हे सिध्द झाले आहे. त्यामुळे घाबरु नका पण जागरुक राहा.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment