अशी ही समाजसेवेची वादळवाट
श्री संतोष गायकवाड - एक अवलीया
सामाजिक कार्य करणारे अनेक लोक आज आपल्या समाजात आजूबाजूला वावरत आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने गरजूंसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. सध्याच्या कोरोनाच्या काळात तर परिस्थितीने गांजलेल्या लोकांसाठी यथाशक्ती मदत करणारे अनेक लोक समाजामध्ये सक्रिय आहेत. सर्वसामान्य लोक आपल्या व आपल्या कुटुंबापुरता विचार करतात. दिवसभर राब राब राबतात, काही तर सोळा ते अठरा तास काम करतात फक्त आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी.. कुटुंबाचं सुख हे त्यांचं सुख असते. त्यातच ते समाधान मानत असतात. खरेतर तर समाधान हे मानन्यावर आहे. कोण कशात समाधान शोधतो तर कोण कशात? एखाद्याच्या पाठीला खाज आली व आपला हात काही पाठीपर्यंत पोहचत नाही मग तो ती पाठ भिंतीला रगडतो व त्यात समाधानी होतो. मात्र काही लोक दुसऱ्यांसाठी केलेल्या मदतीमध्ये आपले समाधान शोधत असतात. परिस्थिती कशीही असो, मिळकतीतला थोडा जरी हिस्सा दुसऱ्याला देता आला तरी त्यात अशा सद्विचारी लोकांना समाधान मिळत असते. आमच्या घणसोली मध्ये असाही एक थोर समाजसेवक माझ्या माहितीत आला असून उदरनिर्वाहाव्यतिरिक्त इतरांची सेवा करण्यात तो धन्यता मानणारा आहे. आपली तुटपुंजी मिळकत असतानाही समाजासाठी माझंही काही देणं आहे हे समजुन तो जमेल तशी जमेल तेवढी मदत समाजसेवेसाठी करीत असतो. आपला जन्म हा केवळ आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी झालेला नाही हे त्यांना फार कमी वयात उमगले. आज लोकांची सेवा करताना त्यांच्या चेह-यावरील समाधान पाहुन या आसामीला कृत्यकृत वाटतं.
म्हणतात ना...
जे का रंजले गांजले त्यासि म्हणे जो आपुले!
तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा!!
या संतांच्या बोधवाक्यानुसार हा अवलीया रात्रंदिवस गोरगरीबांची सेवा करतोय. सेवा परमो धर्म या उक्तीनुसार तो कुठल्याही नफ्याची किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न करता हे सारं करतोय. संतोष गायकवाड असं या आसामीचं नाव. पेशानं रिक्षाचालक असणारा हा अवलिया जमेल तशी मदत लोकांना करण्यासाठी सतत धडपडताना दिसतोय. यामध्ये अपंगांना मोफत प्रवास असो, गरजुंना रुग्णालयात मोफत प्रवास असो स्वत:च्या रिक्षाने, स्वखर्चाने हे सर्व करतोय. रिक्षा मध्ये त्याने वाचनालय बनवले असून शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोयदेखील केली आहे. परिसरातील अडल्या नडलेल्याना मदत करणे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे हा त्याचा आवडीचा छंदच झालाय. एखादा रिक्षावाला दिवसाला किती कमवत असेल, पण आपले कुटुंब सांभाळून त्याची ही समाजसेवा सुरू आहे. आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो, या भावनेतून त्याची ही धडपड अविरत सुरू आहे. त्याची ही सेवा दिवसरात्र अखंडीतपणे चालुच असून नुकतीच त्याच्या या कार्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेदेखील दखल घेतली असल्याचे समजते. आज लाॅक डाऊनच्या काळात कोरोनारूपी वादळामध्ये सुद्धा हा आपली समाजसेवेची वादळवाट निर्माण करतोय. अशा या संकटात हा अवलिया इतरांप्रमाणेही कोलमडला आहे. व्यवसाय ठप्प आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, पण आपलं काम,आपलं कर्तव्य समजून तो अविरतपणे यथाशक्ती करताना दिसतोय. छत्रपतींच्या विचारांनी चालणारा हा आसामी एखाद्या योध्यापेक्षा कमी नाही जो विपरीत परिस्थितीतीदेखील इतरांना मदतीचा अट्टाहास धरतो आहे. अशा ह्या अवलीयाला मानाचा सलाम !






अतिशय उल्लेखनीय काम करत आहेत संतोष साहेब
ReplyDeleteSupar
Delete