लोकांची जबाबदारी वाढली
सरकारने जाहीर केलेला पहिला अनलॉक ३० जूनला संपतोय. मात्र कोरोना रुग्णांची वाढत चाललेली संख्या पाहता सरकार पुन्हा लॉकडावूनकडे वळतेय की काय अशी एक अटकळ लावली जात होती. मात्र रविवारच्या संबोधनात मुख्यमंत्र्यांनी सरकार पुन्हा लोकडाऊनच्या मनःस्थितीत नसल्याचे सूतोवाच दिले आहे. त्यामुळे आता नागरिकांची जबाबदारी खूप वाढली आहे. लोकडाऊनमुळे ढासळलेली अर्थव्यवस्था व जनजीवन पुन्हा रुळावर आणण्यासाठी पुन्हा टाळेबंदी परवडणारी नक्कीच नाही मात्र दैनंदिन व्यवहार पूर्ण क्षमतेने जोमात सुरू करणेदेखील या परिस्थितीत धोकादायक आहे. महाराष्ट्रात आज दररोज सरासरी पाच हजारांच्या वर रुग्ण कोरोनाला बळी पडताना दिसत आहेत. रुग्णसंख्या दोन लाखांकडे झपाट्याने धाव घेत आहे. दिवसेंदिवस हे चित्र भयावह होत जाणार हे निश्चित आहे. कारण पुढे पावसाळा व त्यामुळे उदभवणारे साथरोग आहेत. त्यातच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये येणारे अडथळे, त्यामुळे रुग्णशोध व निदान यामध्येदेखील बऱ्यापैकी विलंब होत आहे. त्यातच वाढत चाललेले मृत्यू थोपवण्याचे आव्हानदेखील समोर उभे आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू सध्या तीन आकड्यांमध्ये आहेत. अशा परिस्थितीत बहुतांश व्यवहार नियमित सुरू करणे धोक्याचे आहे मात्र खरा धोका तेव्हाच होईल जेव्हा लोक प्रतिबंधात्मक काळजी घेणे बंद करतील. त्यामुळे व्यवहार सुरू झाले तरी त्यामध्ये सोशल डिस्टनसींग व मास्क वापरण्याची दक्षता ही घ्यावीच लागेल. ही जबाबदारी आता सामूहिक टप्प्यावर येऊन ठेपली आहे. मुंबईची लोकलसेवा व मेल गाड्या सध्या मर्यादेत आहेत. कालांतराने त्यादेखील पूर्वीप्रमाणे नियमित सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होतील. मात्र त्याचा वापर व गर्दी आटोक्यात आणाविच लागेल. यासाठी मुंबईतील कार्यालयांच्या वेळा बदलून प्रसंगी शिफ्टवर कराव्या लागणार आहेत. कारण उपनगरांतील बहुतांश गर्दी पोटापाण्यासाठी मुंबईच्या दिशेने सकाळच्या एकाच वेळेस धाव घेत असते व संध्याकाळी थोड्याफार फरकाने घरच्या परतीच्या वाटेवर असते. प्रवास, दैनंदिन व्यवहार, कार्यालये, बाजारपेठा, उद्योगधंदे, शॉपिंग मॉल यासारख्या ठिकाणी कोरोनाच्या प्रतिबंधाची काळजी आता जनतेवर येऊन ठेपली आहे. सरकार उपचार करेल मात्र आजाराची लागण होऊ नये म्हणून काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आता अधिक सतर्कता बाळगावी लागेल व सोशल डिस्टनसींगसाठी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करावे लागतील. आता सामूहिक प्रतिबंध हाच उपाय !


Thanks sir
ReplyDelete