सेवानिवृत्ती सन्मानाची
आज १ जुलै, डॉक्टर्स डे. कोरोना प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर समाजातील डॉक्टरांचे महत्व पुन्हा एकदा सर्वांच्या दृष्टीने अधोरेखित झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र याच परिस्थितीत, आरोग्य सेवेतील परिचारिका विभागाचे उपसंचालक डॉ आर टी चव्हाण हे काल ३० जून रोजी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. आपल्यावर सोपवलेली जबाबदारी निष्ठेने व कर्तव्यतत्परतेने पार पाडणे, वरिष्ठांच्या निर्देशानुसार प्रामाणिकपणे कामकाज करणे, सहकारी वर्गाशी व कर्मचार्यांशी अत्यंत खेळीमेळीचे संबंध यामुळे डॉ चव्हाण विशेष लक्षात राहतात. पेशाने नेत्रशल्यचिकित्सक असलेल्या डॉ चव्हाण यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सेवा दिलेली आहे. धुळे, नाशिक, नंदुरबार येथे विशेषज्ञ म्हणून तर औरंगाबाद येथे विभागीय उपसंचालक म्हणून त्यांनी कामकाज पाहिले. गेल्या काही वर्षांपासून ते आरोग्य सेवा आयुक्तालयात नर्सिंग विभागाची धुरा सांभाळत आहेत. २३ जानेवारी १९८९ रोजी सेवेत रुजू झालेल्या डॉ चव्हाण यांची तब्बल ३१ वर्षांची शासकीय सेवा त्यांच्यासाठी खूप मोलाची ठरली. या कारकिर्दीत त्यांनी अनेक चढउतार पाहिले. मात्र या सर्वांमधून बाहेर पडत त्यांनी आपली कारकीर्द यशस्वीरीत्या पूर्ण केली याचे त्यांना विशेष समाधान आहे. मधल्या काळात त्यांना एका जीवघेण्या आजाराने ग्रासले त्यामध्ये त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. मात्र त्यातूनही ते सहीसलामत सुटून पुन्हा सेवेत रुजू झाले. पत्नी व दोन मुले असा चौकोनी परिवार असलेल्या डॉ चव्हाण यांची कुटुंबाप्रति ओढ लपून राहिलेली नाही. आज त्यांची दोन्ही मुले विवाहित असून उच्चशिक्षित आहेत. शासकीय सेवेच्या काळात त्यांच्या सौभाग्यवतींचे योगदान व पाठिंबा खूप मोलाचा असल्याचे ते सांगतात. सेवानिवृत्तीनंतर नेत्रशल्यचकित्सक म्हणून खाजगी क्षेत्रात कार्यरत राहण्याचा त्यांचा मनसुबा आहे. मात्र गरीब, गरजू व परिस्थितीने खचलेल्या रुग्णांना मोफत व माफक रुग्णसेवा देण्याचा शिरस्ता सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या काळात त्यांनी शासकीय सेवेचा समारोप केलेला आहे. सोशल डिस्टनसींगच्या कारणास्तव त्यांना कार्यालयीन सोपस्कारात निरोप देणे शक्य झाले नाही. मात्र त्यांच्यासाठी आवर्जून आणलेले भेटकार्ड देण्याचा मोह आवरला नाही. डॉ चव्हाण यांना त्यांच्या सुखी, आनंदी व रुग्णसेवेशी निगडित भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
वैभव












Comments
Post a Comment