शाळा भरवण्याची घाई नको



कोलमडत चाललेल्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर कंटेनमेंट झोन वगळता इतर भागांत हळूहळू सरकार लॉकडाऊन शिथिल करणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. या ठिकाणचे बहुतांश सर्व व्यवहार लवकरच सुरू होणार आहेत. असे असले तरी कोरोनाचा धोका व कहर अजून संपलेला नाही. कोरोनाबाधित रुग्णांची दररोजची आकडेवारी तरी हेच दर्शवते. राज्यातील एकूण 72000 रुग्णांपैकी 30000 रुग्ण बरे होऊन घरी गेले असले तरी जवळपास 40000 रुग्ण अद्यापि उपचार घेत आहेत. अडीच हजार रुग्ण राज्यात आजवर या आजाराने मृत्युमुखी पडले आहेत. खरेतर परिस्थितीची भयावहता दर्शवणारे हे आकडे आहेत. असे असले तरी राज्याचा गाडा हा सुरू राहिलाच पाहिजे, उद्योग, धंदे व व्यवसायातून मिळणाऱ्या महसुलावर राज्य चालते. त्यामुळे ते अधिक काळ बंद ठेवणे राज्यहिताचे नाही. त्यामुळे कधी ना कधी ते सुरू करावेच लागणार आहेत. मात्र या सर्व व्यवसायातून काम करणाऱ्या व्यक्ती ह्या सुज्ञ असून प्रतिबंधात्मक काळजी घेण्यासाठी सक्षम आहेत. मात्र मुख्य अडचण आहे ती शाळांची. शाळांमध्ये शिक्षण घेणारी मुले कितीही म्हटले तरी वास्तविक परिस्थितीची जाण आलेली नाहीत. शिवाय सामाजिक अंतराचे नियम त्यांना शिकवणे या टप्प्यावर तरी घाईचे होईल असे वाटते. शिक्षक व शिक्षण संस्था या मुलांच्या बाबतीत कितीही संवेदनशील असल्या तरी शहरी भागातील शाळांमधील मुलांची पटसंख्या पाहता कोरोनासारख्या जिवघेण्या आजाराशी विद्यार्थ्यांना घेऊन मुकाबला करण्यात किती यशस्वी होतील याबाबत साशंकताच आहे. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल झाले तरी सरकारने शाळा उघडण्याची घाई करू नये असे वाटते. ऑनलाइन शिक्षणासारखे अनेक पर्याय आज उपलब्ध असून असे ऑनलाइन वर्ग शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास सक्षम आहेत. अनेक शाळांनी तर ह्याची सुरुवातदेखील केलेली आहे. झुमसारख्या अप्लिकेशनद्वारे ऑनलाईन वर्ग भरवण्यास काहीच हरकत नाही. मात्र प्रत्यक्षात शाळा सुरू करून मुलांना कोरोना संसर्गाचा मोठा धोका संभवतो व याचा परिणाम खूप विपरीत ठरू शकतो. वेळीच शाळा बंद केल्याने शालेय मुलांमध्ये या आजाराचा संसर्ग अजिबात पसरलेला नाही. आता भर साथीमध्ये पुन्हा शाळा भरवणे नक्कीच धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे शासनाने तूर्तास तरी प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याचा विचार करू नये व मुलांना घरच्या घरीच शिक्षण उपलब्ध करून देणे इष्ट ठरेल असे मत आहे. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त