याचसाठी केला होता का अट्टाहास


मुंबईमध्‍ये लॉकडाऊन ब-याच अंशी शिथील करण्‍यात आलेला आहे. कोरोनाग्रस्‍तांचे आकडे कमी होण्‍याचे नाव घेत नसले तरी ढासळती अर्थव्‍यवस्‍था सावरण्‍यासाठी लॉकडाऊनकडून आता अनलॉकची गिणती सुरु झालेली आहे. बाजारपेठा व कार्यालयेदेखील गर्दीने फुलू लागलेली आहेत. मुंबईमध्‍ये येणारे बहुतांश व्‍यावसायिक व चाकरमानी उपनगरांतून मुंबईकडे रोजगारासाठी धाव घेत असतात. त्‍यांंना स्‍वस्‍त व जलद प्रवासाचे एकमेव साधन उपलब्‍ध असते ते म्‍हणजे मुंबईची जिवनवाहिनी लोकल सेवा. सध्‍या सर्व व्‍यवहार, ऑफीसेस सुरु झाली असली तरी सुरक्षेच्‍या कारणास्‍तव लोकलसेवा मात्र बंंदच असल्‍यामुळे नोकरदार वर्गाचे मोठे हाल होताना दिसत आहेत. सध्‍या त्‍यांच्‍यासाठी खाजगी वाहने, बेस्‍ट व एसटी बससेवेशिवाय पर्याय नाही. लॉकडाऊन ज्‍या दिवशी शिथील केला त्‍याच  दिवशी सोमवारी ८ तारखेला व त्‍यानंतर बसेस व रस्‍ते गर्दीने तुडुंंब भरुन वाहताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी तर बस पकडताना चेंगराचेंगरीसदृश्‍य परिस्‍थीतीदेखील दिसुन आली. वास्‍ताविकतः कार्यालये, व्‍यवसाय सुरु करताना मुंबईतील गर्दिचा अंदाज घेऊन लोकांसाठी मुबलक वाहतूक व्‍यवस्‍था उपलब्‍ध आहे का याचा अंदाज घेणे आवश्‍यक होते. मात्र हे सर्व दैनंदिन व्‍यवहार सुरु करताना लोकांची रस्‍त्‍यांवर व सार्वजनिक वाहतूक सेवांंमध्‍ये होणारी गर्दी जर पाहिली तर याचसाठी केला होता का अटटाहास असा प्रश्‍न उपस्थित होतो. किमान अत्‍यावश्‍यक सेवेतील कर्मचा-यांसाठी उपनगरीय रेल्‍वेसेवा उपलब्‍ध करुन दयावी ही मागणी सातत्‍याने होत असताना रस्‍ते वाहतूकीवर ताण देऊन लोकांची परिक्षा पाहण्‍यात काय अर्थ आहे. त्‍यामुळे दिवसेंदिवस बिकट होत चाललेली ही परिस्‍थती आणखी बिघडण्‍याआधी मुंबई उपनगरीय रेल्‍वेसेवा सुरु करण्‍याचा निर्णय रेल्‍वे मंत्रालयाने घ्‍यायला हवा. अगोदरच कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे मेटाकुटीला आलेल्‍या लोकांचा आणखी अंत आता पाहू नये.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई  

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त