लक्षणे नसतील तर गृहवीलगिकरण करा
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
लक्षणे नसतील तर गृहवीलगिकरण करा
कोविड पॉझीटिव्ह रुग्णांचे आकडे वाढत चाललेत. बाधित लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांनादेखील मोठया प्रमाणावर कोरोनाची लागण होत असल्याचे चित्र आहे. मात्र यातील बहुसंख्य लोकांमध्ये कोणतीही लक्षणे आढळुन येत नाहीत. त्यामुळे काही दिवस रुग्णालय अथवा कोविड सेंटरमध्ये मुक्काम केल्यानंतर लक्षणे दिसुन येत नसल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात येत आहे. वास्ताविकतः लक्षणे नसतील तर लगेच रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची गरज नाही. अशा व्यक्तींकडून घोषणापत्र लिहून त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्याच्या सूचना यापुर्वीच शासनाने दिलेल्या आहेत. मात्र ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी अदयापी अशा प्रकारे लक्षणे नसलेल्या पॉझीटिव्ह व संशयित व्यक्तींना क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती केले जात आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्या अजुनही नियंत्रणात असल्याने या कोविड सेंटरवरील भार प्रकर्षाने दिसुन येत नाही. मात्र शहरी भागात मात्र याच्या विपरीत अवस्था आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासारख्या मोठया व दाटीवाटीच्या शहरांत रुग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे. यात लक्षणे असलेल्या व नसलेल्या दोन्ही प्रकारच्या पॉझीटिव्ह व्यक्तींचा समावेश होतो. अनेक व्यक्ती आपला रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्यानंतर लक्षणे दिसत नसतील तरी भितीपोटी तातडीने रुग्णालय गाठुन उपचार सुरु करतात. यामुळे प्रचंड संख्येने वाढलेल्या रुग्णांनी मुंबई ठाण्यातील रुग्णालये हाऊसफूल्ल झालेली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नव्या रुग्णांना मग त्यांच्यात लक्षणे दिसत असतील तरीही दाखल करुन न घेण्याचे प्रकार समोर येत आहेत. यात प्रामुख्याने खाजगी रुग्णालयांची मोठी आर्थिक गणीते जुळलेली असतात हे एव्हाना लपुन राहिलेले नाही. येत्या काळात हे चित्र आणखीच गंभीर बनत जाणार हेदेखील नक्की आहे. मात्र आता प्रश्न आहे तो कोविडची गंभीर लक्षणे दिसत असलेल्या रुग्णांचा. या रुग्णांना वेळेत उपचार मिळाले नाहीत तर त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शहरी भागांत खाजगी रुग्णालयांनी लक्षणे नसलेल्या सरसकट सर्व रुग्णांना उपचारार्थ दाखल करुन घेणे टाळले पाहिजे. रुग्णांची वर्गवारी करुन ज्यांना खरोखर लक्षणे जाणवत आहेत त्यांना बेड उपलब्ध करुन दिले पाहिजेत. अशा आशयाच्या सक्त सुचना नुकत्याच मुंबई महानगरपालिकेने खाजगी रुग्णालयांना केलेल्या आहेत. लक्षणे नसलेल्या व्यक्तींनी घरीच राहुन काळजी व उपचार घेणे गरजेचे आहे. कोरोना हा काही असाध्य आजार नाही त्यामुळे प्राथमिक अवस्थेतच जर योग्य काळजी घेतली त्यातुन पूर्णपणे बरे होता येते. आतार्यंतच्या जवळपास दिड लाख पॉझीटिव्ह रुग्णांपैकी निम्मे रुग्ण सहिसलामत घरी परतलेले आहेत. त्यामुळे पॉझीटिव्ह रिपोर्ट जरी आला तरी घाबरुन न जाता आवश्यक काळजी व सरकारी सुचनांचे पालन करुन बरे होता येते. त्यामुळे टेस्ट पॉझीटिव्ह आली म्हणून लगेच रुग्णालय गाठण्याची गरज नाही. खाजगी रुग्णालयांनीदेखील आता लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणाचा पर्याय सुचवायला हवा तरच शहरी भागांतील रुग्णांचे योग्य व्यवस्थापन पुढील काळात करता येईल.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment