करूया कुटुंबाचे नियोजन, आंनदी राहू प्रत्येकजण
आज जागतिक लोकसंख्या दिन - ११ जुलै
सन 1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटीच्या घरात होती. सन 1987 साली हि लोकसंख्या दुप्पट म्हणजे 500 कोटी झाल्याने वाढत चाललेल्या जागतिक लोकसंख्येच्या आकडेवारीला प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने 11 जुलै 1987 पासून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. आज लोकसंख्या वाढ हि केवळ कोण्या देशाची वा प्रांताची समस्या नाही तर संपूर्ण जगाची समस्या बनलेली आहे. लोकसंख्या वाढीबरोबरच ग्लोबल वार्मिंगची समस्या देखील मानव जातीला प्रचंड मनस्ताप देऊ लागलेली आहे. वाढत्या लोकाद्रेकाने व मानवी गरजांनी निर्माण केलेल्या अनैसर्गिक व तांत्रिक गोष्टींमुळे निसर्गाची भयंकर हानी होऊन निसर्गव्यवस्थेचा विस्फोट होण्याची भीतीदेखील वाढ्लेली आहे. यामुळेच जागतिक पातळीवर लोकसंख्या वाढीची गंभीर दखल घेतली जात आहे. जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.
भारतामधील झपाटय़ाने वाढणार्या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी, महागाई आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू लागले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे देशाच्या प्रगतीला लोकसंख्यावाढ ही बाब अडसर ठरत आहे. ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावरून व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. कुटुंब कल्याण व कुटुंब नियोजन कार्यक्रमांच्या व्याप्तीमुळे लोकसंख्यावाढीच्या गतीला खीळ बसवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये लोकसंख्येचे प्रमाण मर्यादित असले तरी वाढत्या शहरीकरणामुळे शहरी भागातील लोकसंख्यावाढीचा वाढता दर दखलपात्र ठरतो. ग्रामीण भागामध्ये आशा कार्यकरतींमार्फत कुटुंब नियोजनासाठी लोकप्रबोधनाचे काम उत्तम रित्या सुरु असून संपूर्ण आरोग्य विभागासाठी कुटुंब नियोजन व लिंग गुणोत्तरासारख्या योजना प्राधान्यक्रमाच्या आहेत. आज देशाची लोकसंख्या साधारणतः 130 कोटीच्या वर असून यात राज्याच्या लोकसंख्येचा वाटा 12 कोटीच्या आसपास आहे. लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमांमध्ये अधिक व्यापकता आणणे आवश्यक असून सर्व यंत्रणांसाठीच हे एक मोठे आव्हान आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून चीन ओळखला जातो ज्याची लोकसंख्या जवळपास 138 कोटी आहे पण चीनलादेखील मागे टाकण्याच्या मार्गक्रमणात 130 लोकसंख्येचा आपला देश आहे. हि हर्षाची नाही तर गंभीर व विचार मंथनाची बाब आहे. वाढत असलेल्या लोकसंख्येला आवश्यक सुविधा व पूरक गोष्टी निर्माण करणे हेदेखील एक आव्हान असून यामध्ये देशाला येणाऱ्या काळात मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागेल. यामुळे गरीब श्रीमंतीमधील दरी वाढत चालली असून श्रीमंत हे अतिश्रीमंत तर गरिबांना दोन वेळचे जेवण देखील दुरापास्त आहे. लोकसंख्या वाढीचा फटका सर्वात जास्त समान्यांनाच बसत असून वाढत असलेली लोकसंख्या केवळ गरीब व श्रीमंत यांच्यातच विभागली जात आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे एकीकडे गाडी, बंगला अशी एैशोआरामाची जीवनपध्दती तर दुसरीकडे दारिद्रय़, एक वेळची भूक भागविण्याची धडपड, असे आजचे चित्र दिसते. तेव्हा जनतेनेदेखील या बाबीचा अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कुटुंब नियोजनाचे नियम समाजातील सर्वच घटकांनी काटेकोरपणे पाळले पाहिजेत. येणाऱ्या पिढ्याना समाजात सुखाने व सन्मानाने जगायचे असेल लोकसंख्या नियंत्रणासाठी शासन प्रयत्नांना सर्वांनी साथ दिली पाहिजे.
लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत असून याविषयी जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. शासन दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचे धोरण लोकसंख्या नियंत्रणासाठी राबवत असून सामान्य जनतेवर परिणामकारक अशी विविध घोषवाक्य देखील जनतेसमोर सादर करण्यात येतात. महाराष्ट्र राज्याने ‘करूया कुटुंबाचे नियोजन आनंदी राहू प्रत्येकजण’ 'लहान कुटुंब सुखी कुटुंब' 'हम दो हमारे दो' अशी अनेक घोषवाक्य सकारात्मक परिणाम घडवत आहेत. पण या जनजागृतीने अपेक्षित बदल घडणे आवश्यक आहे.
लोकसंख्या ही समस्या उग्र रुप धारण करीत असल्याने विकासाला खीळ बसत आहे. उपलब्ध साधन संपत्तीवर येत असलेल्या अतिरिक्त ताणामुळे लोकांना मूलभूत गरजा देतानाही कसरत करावी लागत आहे. मुलगाच हवा यासाठी तीन-चार अपत्यांना जन्म दिला जातो. अशिक्षितपणा असलेल्या कुटुंबात लोकसंख्या वाढीची बीजे दिसून येतात. हे रोखणे काळाची गरज आहे. आज मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी गर्दीने अगदी हद्दच ओलांडलेली आहे. जिकडे पहावे तिकडे नुसती माणसेच माणसे. रेल्वेसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचा नियमित वापर करणाऱ्या लोकांना याची चांगलीच जाण आहे. हि परिस्थिती अचानक ओढवलेली नसून अनेक वर्षापासून चालत आलेला लोकांमधील निष्काळजीपणा व अलिप्तवादी वृत्ती याला कारणीभूत आहे. हे कुठंतरी थांबले पाहिजे कुटुंब कबिला वाढविण्यामध्ये व्यस्त असलेल्या आपल्या समाजाला जागृत करणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, विचारवंत, साहित्यिक, लेखक व विविध क्षेत्रांमध्ये नैपुण्य प्राप्त व्यक्ती खूप मोठी जबाबदारी पार पाडू शकतात.
देशात ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी प्रथम लोकसंख्या वाढ आटोक्यात आणणे आवश्क आहे. लोकसंख्या वाढ हा अत्यंत संवेदनशील विषय असून ती रोखण्यासाठी व्यक्तिगत जबाबदारी निश्चित करून कठोर नियम अंमलात आणावे लागतील. व्यक्तिगत, कौटुंबिक व सामूहिक प्रयत्नांनी येणाऱ्या काळात लोकसंख्या वाढीच्या भस्मासुरावर आपण निश्चितच मात करू हाच संकल्प आपण जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी करू या.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई




Comments
Post a Comment