आंग्रीया क्रुझ - पर्यटनासोबत नौदल सैनिक कान्होजी आंग्रे यांची आठवण
आंग्रीया - दर्या सारंग सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कर्तुत्वाला मानवंदना
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन असला तरी अत्यावश्यक सेवा असल्यामुळे मुंबई येथील कार्यालयात नियमितपणे कामावर कार्यरत आहे. मुळात मुंबई ही चोहूबाजुंनी समुद्र व खाडी परिसराने वेढलेली आहे. अथांग अशा अरबी समुद्राच्या किनारी वसलेल्या मुंबईतील बहुतांश इमारतींमधुन समुद्राचे विराट रुप नजरेस पडते, त्यापैकीच आमच्या कार्यालयाची एक इमारत. रोज सकाळी कार्यालयात पोहोचल्यावर खिडकीतून दिसणारे दृष्य म्हणजे भला मोठा समुद्र व त्यात असंख्य बोटी व अवाढव्य जहाजे. बाजुलाच मुंबई पोर्ट असल्यामुळे बहुतांशी मालवाहू जहाजे येतात व एक दोन दिवसांनी माल खाली किंवा भरुन झाल्यावर निघुनही जातात. मात्र गेली तीन चार महिने म्हणजे लॉकडाऊन लागल्यापासुन त्यातीलच एक जहाज रोज नजरेस पडते व ते म्हणजे हे आंग्रीया जहाज. देशातील सर्वात अलिशान जहाजांपैकी एक जहाज म्हणून ते ओळखले जाते. ऑक्टोबर २०१८ पासून मुंबई - गोवा जलमार्गावर आंग्रीया ही पहिली क्रूझ सेवा सुरू झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमारप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी तिचे नामकरण आंग्रीया असे करण्यात आले होते. उत्सुकता म्हणून इंटरनेटवर या जहाजाची थोडी माहिती काढल्यावर बरीचशी रंजक माहिती मिळाली. जलपर्यटनाला चालना मिळावी या हेतुने सुरु करण्यात आलेल्या या क्रुझची आठवड्यातून चार वेळा सेवा सुरू असते. सायंकाळी पाच वाजता ही क्रूझ मुंबई बंदरातून निघते व दुसऱ्या दिवशी सकाळी गोव्याला पोहोचते. रत्नागिरी, मालवण, विजयदूर्ग, रायगड या मार्गे हे क्रुझ प्रवास करते. जवळपास ५०० प्रवाशी क्षमता असलेल्या हया जहाजावर सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. क्रुझवर स्विमिंग पुल, लॉन्ज व इतर मनोरंजनात्मक साधने आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे पर्यटन बंद असल्यामुळे या जहाजाची सेवा बंद आहे मात्र या क्रुझला देण्यात आलेल्या ''आंग्रीया'' या नावाची ऐतिहासिक पार्श्वभुमी आपल्याला ठाऊक होणे महत्वाचे आहे. भारताचे पहिले नौदल प्रमुख ज्यांचा ''समुद्रातील शिवाजी'' म्हणून अखंड मुलखात परिचय होता, ज्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग फक्त समुद्रालाच ठाऊक होता असे पहिले नौदल प्रमुख म्हणजेच सरखेल कान्होजी आंग्रे. अख्ख्या युरोपच्या नौसेनेला ज्यांची धास्ती होती, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगिज एकत्र येऊन पण ज्यांचा पराभव करु शकले नाहीत असे दर्या सारंग म्हणजे कान्होजी आंग्रे. समुद्राच्या लाटा व समुद्रातील राजकारण अचूक हेरुन सुरत ते दक्षिण कोकणचा किनारा सुरक्षित ठेवणा-या, समुद्रातील गनीमी काव्याचे जनक अशी ओळख असलेल्या या प्रथम नौदल सैनिकाची आठवण करुन देणा-या या आंग्रीया क्रुझच्या नावाबददलची आपल्या मनातील उत्कंठा दुर व्हावी तसेच पर्यटन बंद असल्याने हे जहाज गेली काही महिने एकाच बंदरावर उभे आहे व त्याचे दर्शन रोज घडते यासाठी न राहवून केलेला हा लेखप्रपंच.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
















Comments
Post a Comment