स्थानिक यंत्रणांचे मनोबल वाढवणे गरजेचे
प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अनेक कारणे असतात. प्रशासकीय, विनंतीने, राजकीय दबावापोटी किंवा कामकाजातील अपयशानेदेखील ह्या बदल्या होत असतात. सध्या कोरोना साथीने अनेक महानगरपालिका, जिल्हे व अगदी मंत्रालयीन अधिकाऱ्यांचेदेखील विभाग बदलण्यात आले आहेत. त्याला कोरोना साथ रोखण्यातील अपयश असे कारण सोयीस्कररित्या लावले जाते जे वास्तविकतेला धरून नाही. वरिष्ठ स्तरावरील प्रत्येक अधिकारी आपापल्या कार्यपद्धतीने उपलब्ध यंत्रणांच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत असतो मात्र अपयशाला त्याला एकट्याला जबाबदार धरणे योग्य नाही. एखादया महापालिका किंवा जिल्ह्यातील साथ आटोक्यात आणण्यासाठी एकसंघपणे काम करणारी संपूर्ण यंत्रणा जबाबदार असते. ही यंत्रणा जितक्या कार्यक्षमतेने काम करेल तितकी परिणामकारकता अधिक असते. कोरोनासारख्या साथीत तर प्रशासकीय यंत्रणांबरोबर लोकसहभागदेखील महत्वाचा आहे. सध्याच्या परिस्थितीत स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला प्रोत्साहित करून त्यांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी फार काही साध्य होईल असे वाटत नाही.

Comments
Post a Comment