घरबसल्या आरोग्य सेवा

घरबसल्‍या आरोग्‍य सेवा - महा ई संजिवनी ओपीडी

सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक खाजगी दवाखाने, रुग्णालये बंद आहेत. जी सुरू आहेत तिथे रुग्णसंख्या भरमसाठ असल्यामुळे एकतर रुग्णांना दाखल करून न घेण्याचे प्रकार वाढायला लागलेत किंवा रुग्णही संसर्गाच्या भीतीपोटी खाजगी रुग्णालये गाठायला घाबरत आहेत. अनेक ठिकाणी खाजगी रुग्‍णालयांमध्‍ये  मनमानी पध्‍दतीने बीले आकारण्‍याचे प्रकारदेखील वाढस लागले आहेत. यामुळे रुग्‍ण व रुग्‍णालयीन प्रशासन असा संघर्षदेखील उभा राहत आहे. कोरोनाची लागण झालेल्‍या व लक्षणे दिसणा-या रुग्‍णांना खरेतर रुग्‍णालयात भरती होण्‍याशिवाय गत्‍यंतर नसते. मात्र ज्‍यांना विविध कारणांनी आरोग्‍याच्‍या कुरबुरी जाणवतात किंवा कोरोनाची लक्षणे जाणवत नाहीत त्‍यांना उपचारासाठी वणवण फिरावे लागत आहे. येत्‍या काळात ही समस्‍या अधिक गंभीर होत जाणार आहे. गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना खरेतर पर्याय नसतो मात्र खरी अडचण होते ती आरोग्याच्या किरकोळ तक्रारी असलेल्या रुग्णांची. त्यांना उपचारासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र आज सगळीकडे आहे. यावर उपाय म्हणून शासनाच्या आरोग्य विभागाने ऑनलाईन ओपीडी द्वारे डॉक्टरांशी संवाद साधण्याचा पर्याय नागरिकांना उपलब्ध करून दिला आहे. ई संजीवनी ओपीडी या नावाने विकसित करण्यात आलेल्या संकेतस्थळावर नोंदणी करून या सेवेचा लाभ घेता येतो. प्रशिक्षीत व शासन सेवेतील प्रदीर्घ अनुभव असलेल्‍या डॉक्‍टरांचे मार्गदर्शन व सल्‍ला या अॅपव्‍दारे मिळवता येतो. सोमवार ते शनिवार ही ओपीडी सुरु असते. ज्‍यांच्‍याकडे मोबाईल, इंटरनेट, संगणक या गोष्‍टी उपलब्‍ध आहेत त्‍यांना या सेवांचा लाभ घेता येईल. आता तर अँड्रॉईड मोबाईलवर ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ही सेवा सर्वांसाठी उपलब्ध झाली आहे. गुगल प्ले स्टोरमधून हे एप डाऊनलोड करता येते. एपवर तुमचा मोबाईल क्रमांक टाकल्यावर ओटीपी येतो व या ओटीपीच्या आधारे नोंदणी केल्यावर तुम्हाला टोकन नंबर एसएमएसद्वारे प्राप्त होतो. हे टोकन नंबर टाकल्यानंतर तुमचा डॉक्टरांशी संवाद सुरू होतो. अशा प्रकारे हे अॅप घरबसल्या डॉक्टरी उपचार घेण्यासाठी खूप लाभदायी ठरत असून आतापर्यंत जवळपास दोनेक हजार लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे. ही सेवा पूर्णतः मोफत असून डॉक्टरांशी कन्सल्ट केल्यावर तुम्हाला प्रिस्क्रिप्शनदेखील मोबाईलवरच प्राप्त होते ज्या आधारे तुम्ही औषधे घेऊ शकता. विविध कारणांनी दवाखान्यांपर्यंत पोहोचू शकत नसणाऱ्या रुग्णांसाठी ही सुविधा वरदानच ठरत आहे. आजवर दोन हजारांच्‍या वर रुग्‍णांनी घरबसल्‍या या सेवेचा लाभ घेतलेला आहे. रुग्णालयांची व दवाखान्यांची कोरोनामुळे झालेली आजची अवस्था पाहता ह्या ई संजीवनी ओपीडीच्या वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार असून उपचारांचा नवा ऑनलाईन ट्रेंड आता लोकांना घरबसल्या उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी ई संजीवनी ओपीडिद्वारे घरबसल्या सरकारी डॉक्टरांशी संवाद साधून या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा.


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त