आरोग्य विभागाची डिजिटल वाटचाल


कोरोना प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल डिस्टनसींगला प्रचंड महत्व आलेले आहे. हस्ते परहस्ते करावयाच्या गोष्टींवर प्रचंड बंधने आल्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य झालेला आहे. तसे पाहायला गेले तर तंत्रज्ञानाने आज सर्वच गोष्‍टींवर मात केली आहे. इंटरनेट क्षेत्रातील क्रांतीमुळे संपर्क यंत्रणा अत्‍यंत जलद व प्रभावी बनलेली आहे. कोणतीही माहिती किंवा घटना काही क्षणामध्‍ये एकमेकांकडे पोहोचताना दिसत आहे. मात्र शासकीय कामकाज याला अपवाद ठरत होता. फायलींची लाकडी कपाटे, टेबलावर फायलींचे व कागदांचे मोठमोठे गठ्ठे आणि त्यात हरवून जाऊन काम करणारे कर्मचारी अशा पद्धतीचे चित्र जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये दिसते. मात्र गेल्‍या काही वर्षांपासुन राज्‍याच्‍या आरोग्‍य सेवेत अमुलाग्र असे बदल घडुन येताना दिसत आहेत. फाईली व कागदांच्‍या ढिगा-यात हरवलेली कार्यालये आता चक्क डिजीटल व्‍यवहारांकडे वाटचाल करताना दिसत आहेत. कोरोना काळात तर ह्या डिजिटल व्यवहारांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. प्रत्यक्षात घेण्यात येणाऱ्या बहुतांश बैठका आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येत आहेत. यासाठी झूम, इको, एनआयसी, टेलमेडिसीन यासारख्या माध्यमांचा प्रभावी वापर सुरू आहे. तंत्रज्ञानाने दिलेल्या देणगीचा पुरेपूर वापर करून सोशल गॅदरिंग टाळण्यात येत आहेत. वास्तविकता, शासकीय कार्यालयांमध्ये कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी ही पद्धत अगदी योग्यच आहे. तसेच, फाईली व कागदपत्रांच्‍या देवाणघेवाणीसाठी ई ऑफीस या प्रणालीचा वापर होऊ लागल्‍याने मोठया प्रमाणावर आर्थिक खर्चात व मनुष्‍यबळाच्‍या शारिरीक दगदगीत घट झाली. आरोग्य विभागातील बरेचसे कार्यालयीन व्‍यवहार आज याच ई ऑफीस संकल्‍पनेने जोडण्यात आले आहेत. आज आरोग्‍य खात्‍यातील सर्वच विभागांचे दैनंदिन कामकाज ई मेल, ई ऑफीस याव्‍दारेच सुरु आहे. काही वर्षापुर्वी याच्‍या विपरित परिस्‍थती होती. आरोग्‍य विभागाची क्षेत्रिय कार्यालये विभागीय, जिल्‍हा, तालुकास्‍तरावर कार्यरत आहेत तसेच राज्‍यस्‍तरावरील कार्यालयांचीदेखील मुंबई व पुणे अशी विभागणी करण्‍यात आली आहे. संसर्गजन्य आजारांचे काम पुणे येथील संचालकांमार्फत तर असंसर्गजन्य आजार मुंबई येथील संचालकांमार्फत हाताळले जातात. सध्या राज्याचा कोरोना सनियंत्रण कक्षदेखील पुणे येथेच कार्यरत आहे. या अगोदर ही सर्व कार्यालये परस्‍परांशी संपर्क साधण्‍यासाठी व फाईली, कागदपत्रांचा व्‍यवहार करण्‍यासाठी पोस्‍ट, कुरिअर, फॅक्‍स व विशेष दुत या पर्यायांचा वापर अधिक प्रमाणात करत होती. कालपरत्‍वे सर्वच कार्यालयांमध्‍ये संगणक, इंटरनेट यासारखे तंत्रज्ञान अवतरले व कार्यालयांचा चेहरामोहराच पालटला. आज बहुतांशी सर्व पत्रव्‍यवहार ई ऑफिस, ईमेलव्‍दारेच होत आहे. पुणे, मुंबई व विभागिय कार्यालये, ई ऑफीस संकल्‍पनेने जोडली गेली आहेत. त्‍यामुळे फाईली व टपालासाठी होणारी दगदग संपुष्‍टात आली आहे. राज्‍यात सर्वप्रथम ई ऑफीस संकल्‍पना राबवण्‍यासाठी आरोग्‍य विभागाने पुढाकार घेतला. यासाठी राज्य शासनाच्या वतीने देण्यात आलेला प्रशासकीय गतिमानता अभियानाचा पुरस्कारदेखील या कार्यालयाला मिळाला आहे. त्‍यानंतर पुणे येथील कुटुंब कल्‍याण कार्यालय व इतर आजार नियंत्रण कार्यालये मुंबईच्‍या आरोग्‍य सेवा आयुक्तालयाशी व राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानाच्‍या कार्यालयाशी ई ऑफीसव्‍दारे थेट जोडली गेली आहेत. निधी वितरण व खर्चाची देयके देण्‍यासाठी ई पेमेंटचा वापर करण्‍यात येत आहे ज्‍यामुळे वेतन, देयके, निधी विनाविलंब लाभार्थ्‍याच्‍या खात्‍यात वर्ग होऊ लागले आहे. व्‍हाटसअप सारख्‍या मोबाईल अॅप्‍लीकेशनव्‍दारे अधिका-यांचे संवर्गनिहाय ग्रुप तयार झाले आहेत ज्‍याव्‍दारे अधिकारी वर्ग सहजपणे एकमेकांच्‍या संपर्कात आला आहे. अनेक महत्‍वाचे निर्णय, बैठकांच्‍या सुचना, योजना आज हया ग्रुपव्‍दारेच सर्वांपर्यंत पोहोचत असुन तंत्रज्ञानाचा वापर करण्‍यात आरोग्‍य यंत्रणादेखील अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. व्हिडीओ कॉन्‍फरन्‍सींगव्‍दारे नियमितपणे बैठकांचे आयोजन होत असुन राज्‍यस्‍तरावरील अधिकारी याच व्हिसीव्‍दारे जिल्‍हास्‍तरावरील अधिका-यांच्‍या नियमित संपर्कात राहत आहेत. अनेक महत्‍वाच्‍या मार्गदर्शक सुचना, आदेश, चर्चा या व्हिसीव्‍दारेच होत आहेत.  आरोग्‍य विभागाची विविध संकेतस्‍थळे, हेल्‍पलाईन क्रमांक इतकेच नव्‍हे १०८ टोल फ्री क्रमांकाच्‍या रुग्‍णवाहिकाही अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाव्‍दारे मध्‍यवर्ती यंत्रणेशी जोडल्‍या गेल्‍या आहेत. खरेदी प्रक्रिया, भरती प्रक्रिया, बदली प्रक्रिया यांसह माहिती संकलनासाठी विविध अॅप्‍लीकेशन्‍सचा वापर करण्‍यामध्‍येदेखील आरोग्‍य विभाग प्रगतीपथावर आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात तर या डिजिटल व्यवहारांमुळे मोठा फायदा विभागाला होताना दिसत आहे. तंत्रज्ञानाने जलद, पारदर्शक व कालबद्ध पद्धतीने कामकाज चालते. त्याचबरोबर ऑनलाईन एकमेकांच्या संपर्कात येत असल्याने सोशल डिस्टनसींग अबाधित राहते. किमान तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण यांच्या बळावर ही डिजिटल प्रक्रिया अंमलात आणणे सोपे आहे. यामुळे आरोग्य विभागाचा हा अभिनव डिजिटल पॅटर्न येत्या काळात सर्वत्र दृढ झाला तर नवल वाटायला नको. एकंदरीत राज्‍याच्‍या आरोग्‍य विभागाची 'डिजीटल'तेकडे सुरु असलेली ही वाटचाल वेळ, पैसा व मनुष्‍यबळ यांची बचत करणारी आहे एव्हढे नक्की.


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त