हिंमत होतेच कशी

 


छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातून कर्नाटक सरकारने मागील आठवड्यात रात्रीच्या सुमारास अचानक हटवल्यानंतर उसळलेल्या जनक्षोभानंतर त्याच जागेवर पुन्हा पुतळा बसवण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. मात्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत व देशभरातील नागरिकांसाठी प्रेरणास्रोत असलेल्या शिवरायांचा पुतळा हटवण्याची एखाद्या सरकारची हिंमत होतेच कशी हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. पोलीस बंदोबस्तात कर्नाटक सरकारने हा पुतळा हटवला होता. या घटनेचे पडसाद केवळ बेळगावातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पहायला मिळाले. शिवरायांचा पुतळा हटवल्याने शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली, बेळगावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. तसेच राजकीय वातावरणही चांगलेच तापले. या सर्व घटनेनंतर कर्नाटक सरकारने पुतळा पुन्हा बसवण्याचे आश्वासन देऊन प्रकरणात सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. मुळात पुतळा हटवण्याची दुर्बुद्धी ज्या सुपीक डोक्यातून आली ती डोकी शोधून काढण्याची गरज आहे. अशा प्रकारे महापुरुषांचा अवमान कोणत्याही राज्यात सहन होता कामा नये. प्रशासनाकडून ती घोडचूक होत असेल व लोक मूग गिळून गप्प बसत असतील तर त्या राज्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल. छत्रपती शिवरायांचे कार्य सर्वांसाठी आदर्शवत असून त्यांचा पुतळा हटवून कुणी त्यांचे कार्य मिटवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यासाठी जबाबदार लोकांवर कारवाई झालीच पाहिजे जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.  


वैभव मोहन पाटील 

घणसोली, नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त