सरकारी उपचारच घ्या
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
राज्यातील रुग्णसंख्या साडेपाच लाख असली तरी त्यातील जवळपास चार लाख रुग्ण बरे होऊन घेरी परतलेले आहेत. म्हणजेच जवळपास दीड लाख ऍक्टिव्ह रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. यावरूनच कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ७० टक्क्यांच्या वर आहे हे स्पष्ट होते. आज रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतत असले तरी अनेक लोकांच्या मनातील कोरोनाची भीती काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की लगेचच रुग्ण व त्याचे नातेवाईक पटापट खाजगी रुग्णालये शोधण्याच्या मागे लागतात. सरकारने या खाजगी रुग्णालयांवर कितीही निर्बंध आणले तरी या खाजगी रुग्णालयांची पॅकेजेस ठरलेलीच असतात. लक्षणे नसली तरी कोणत्याही विशेष उपचारांविना लाखो रुपये या रुग्णांकडून वसूल केले जातात. मात्र हेच उपचार किंबहुना त्यापेक्षा अधिक परिणामकारक उपचार सरकारी रुग्णालये व कोविड सेंटरमध्ये शासनामार्फत मोफत पुरवण्यात येत आहेत. सरकारी कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन घरी परतलेल्या अनेक रुग्णांच्या अनुभवांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. उत्तम दर्जाचे औषधोपचार, भोजन व इतर सुविधा यामुळे लोकांनी खाजगी रुग्णालयांकडे न वळता सरकारी आरोग्य सेवांकडे वळायला हवे. हजारो रुपयांना मिळणारी कोरोनाची औषधे व इंजेक्शने सरकारी रुग्णालयांमध्ये लोकांना मोफत पुरवण्यात येत आहेत. यामुळेच मृत्युदरदेखील आटोक्यात ठेवण्यात आरोग्य यंत्रणांना यश आले आहे. लॉकडाऊन व मंदीमुळे आधीच बेजार झालेल्यांनी आता पॉझिटीव्ह रिपोर्टमुळे भयभीत व आर्थिक कंगाल न होता सरकारी सेवांचाच लाभ घ्यायला हवा.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment