कोरोना आणि नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
नवी मुंबई.. तुमची, आमची, इथे राहणाऱ्या सर्वांची मायानगरी.. नवी मुंबईची ओळख थोडक्यात सांगणे शक्यच नाही.. अनेक ऐतिहासिक वारसे जोपासणारी नवी मुंबई.. एकेकाळच्या खेडेगावांची नवी मुंबई.. शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, कौलारू घरांची, कुळदेवांची, आगरी कोळ्यांची नवी मुंबई.. हसत खेळत जुन्या आठवणी जागवणारी नवी मुंबई.. काळ बदलला.. वर्ष सरली आणि जुन्या मुंबईकडे पाहून तिच्या अवस्थेवर हळहळ करणारी नवी मुंबई कधी अस्तित्वात आली कुणाला कळलेच नाही. जुन्या मुंबईवरचा भार अलगदपणे नव्या मुंबईने अंगावर घेतला, गावे शहरांमध्ये बदलली, शेतांचे प्लॉट झाले, खाडी बुजवून टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, पायवाटांचे चकाचक रस्ते झाले, रेल्वेगाड्यांची रेलचेल, रिक्षा बसेसचे जाळे, नाट्यगृह, थेटर, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, दिव्यांचा झगमगाट, वाहनांचा दहशतवाद, कर्णकर्कश आवाज, धुरांचे लोट, सांडपाण्याचा जाच आणि नाल्यांचा सुळसुळाट यानं शहराचं रुपडच पालटलं. भूमीपुत्रांची नवी मुंबई सर्वधर्मसमभाव जोपासायला लागली, आसाम, राजस्थान, केरळ भवन इथे वास करू लागले, मराठी शाळांच्या जागी हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यमाच्या शाळा इथे अवतरल्यात, माणसांची व व्यवसायांची तर गणतीच नाही इतके ते फोफावलेत. मात्र इतके होऊनही कधीच तक्रार न करणारी आमची नवी मुंबई या सर्वांना घेऊन गुण्यागोविंदाने नांदू लागली.. हे विश्वाची माझे घर या कल्पनेतून अनेक संसार इथे फुलले, बहरले... अगदी सिंधी, गुजराती, मारवाडी, राजस्थानी, माथाडी, एनआरआय, देश विदेशी सर्व लोक इथले स्थायिक झाले.. लाखोंची पोशिंदी व माहेर घर बनली आमची नवी मुंबई.. सर्व काही ठीकठाक, नीटनेटके अगदी सौंदर्याने भरलेले.. बेलापूरपासून दिघ्यापर्यंत हसत खेळत दिसणारी आमची नवी मुंबई आज मात्र अगदी शांत शांत झालीय.. कुणाचीतरी नजर लागावी अशी गत या शहराची झालीय.. का तर म्हणे कोरोना नावाचा विषाणू नव्हे शत्रूच या शहरात घुसलाय.. माणसांना डसू लागलाय, कित्येकांचे जीव घेऊ लागलाय, इतकेच नव्हे तर नाती हिरावु पाहतोय, माणसांना माणसापासून दूर नेऊ पाहतोय.. आणि आम्ही.. मात्र हतबल.. घरात बसलोय.. कोरोना डसू नये म्हणून.. कोरोना पसरू नये म्हणून. अख्ख्या शहराला अस्वस्थ करणारा हा कोरोना आला कुठून.. गेल्या अनेक दशकांत कुणालाही न जुमानणारी नवी मुंबई अचानक स्तब्ध करणारा हा विषाणू इतका घातक कसा हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय पण उत्तर कुणाकडेच नाहीय.. कुठे गेल्या आमच्या बाजारपेठा, कुठे गेल्या आमच्या शाळा, कुठे गेली ती उद्याने, कुठे गेले ते आठवडी बाजार, कुठे लपलेत ते मॉल, कुठे आहेत थेटर, नाट्यगृह, कुठे गेले ते मॉर्निंग वॉक, कुठे गेले ते जिम, कुठे गेल्या त्या सभा, कुठे गेल्या त्या मिटिंगा, कुठे गेले आमचे सण, कुठे गेल्या आमच्या प्रथा.. सर्वच लोप पावलेय, सर्वच बंद पडलेय.. घरी बसून कोरोना जाईल पण थांबलेल्या आमच्या आयुष्याचे काय.. हातावर पोट असणारा मजूर वर्ग, व्यावसायिक, उद्योगधंदेवाले, कामगार, नोकरदार सर्वच देशोधडीला लागलेत.. हे सर्व पुन्हा कधी उभे राहणार.. नवी मुंबई पुन्हा कधी चालू लागणार.. पुन्हा आम्ही पूर्वीसारखे जगू की असेच आता सुरू राहणार.. प्रश्न आणि प्रश्नच.. उत्तरे कुणाकडेच नाहीत.. आता एकच मार्ग.. कोरोनाला हरवल्याशिवाय पर्याय नाही.. या हरामखोराला आता शहरातूनच नव्हे तर जगातून नाहीसा केला पाहिजे.. उठा सारे सज्ज होऊ.. संसर्गाला आता रोखलेच पाहिजे.. मास्क वापरलाच पाहिजे, सोशल डिस्टन्स ठेवलेच पाहिजे.. काय फरक पडणार आहे.. हे वर्ष फक्त जगून घेऊ, मजा करायला आयुष्य पडलेय.. कोण म्हणतो कोरोना जाणार नाही.. घालवल्याशिवाय आम्ही राहणारच नाही.. कोरोना योद्धयांच्या पाठी आम्ही ठामपणे उभे राहू आणि कोरोनाला नवी मुंबईतून हद्दपार करू.. बोला आहात तयार..
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment