अग्नी आयुर्वेदीक केंद्र, पनवेल
अग्नी आयुर्वेदीक केंद्र, पनवेल - निसर्गरम्य व शांत ठिकाणी आयुर्वेदीक उपचार
कोरोनासारख्या महाभयंकर रोगाशी मुकाबला करता करता अनेक जण आज आयुर्वेद शास्त्राकडे वळताना दिसत आहेत. आयुर्वेदिक औषधांचा वापर, योग, प्राणायाम सारखे शारीरीक कसरतीचे प्रकार तसेच विविध आयुर्वेदिक थेरपींकडे आता लोक वळू लागलेले आहेत. आयुर्वेद शास्त्राचा अभ्यास व वापर करण्यासाठी प्रसिध्द असलेल्या मुंबईजवळील पनवेल येथील एका नामांकित ठिकाणाला भेट देण्याचा योग मला नुकताच आला. पनवेलपासुन साधारणतः १० ते १२ किलोमिटर अंतरावर पनवेल-माथेरान रस्त्यावर मोरबे गावानजिक गेल्या ३० वर्षांपासुन स्थापित असलेले अग्नि आयुर्वेदीक व्हिलेज या नावाने एक आयुर्वेद केंद्र स्थापित आहे. केरळमध्ये आयुर्वेदाचा प्रसार ज्या झापाटयाने झाला तितक्या गतीने देशातील कुठल्याच राज्यात झालेला नाही. केरळमधील आयुर्वेद संस्थांंच्याच धर्तीवर तयार करण्यात आलेले हे अग्नी आयुर्वेद सेंटर त्यामुळेच आपले वेगळेपण सिध्द करते. अत्यंत निसर्गरम्य व शांत वातावरण, आजुबाजुला डोंगरमाथे व मध्येच वसवण्यात आलेले हे अग्नि आयुर्वेद केंद्र, आयुर्वेदाची ओढ असणा-या प्रत्येकालाच खुणावणारे आहे. अनेकांकडून या ठिकाणाबददल माहिती मिळाल्यानंतर आमचे कार्यालयीन सहकारी डॉ. सुभाष घोलप यांचेसह या ठिकाणी जाण्याचा योग मागच्या शनिवारी आला. या केंद्राचे सर्वेसर्वा श्री भुपेश बाबु यांचेशी सपर्क साधुन आम्ही या ठिकाणी पोहोचलो. अत्यंत नयनरम्य, शांत व मनमोहक ठिकाण आम्हाला पोहोचता क्षणी खूप भावले. भुपेश बाबूंची तिथे भेट झाली. वाशीला राहणारे भुपेश बाबू संपूर्ण लॉकडाऊन काळात येथे सहकुटुंब वास्तव्यास आहेत. गप्पागोष्टी झाल्यावर त्यांनी आम्हाला या संपूर्ण केंद्राची परिपूर्ण माहिती दिली. पंचकर्म थेरपी, विशेष केरळ चिकीत्सा तसेच हाडांच्या, श्वसनाच्या, गरोदरपणाच्या, वृध्दत्वाच्या यासारख्या विविध व्याधींवरील आयुर्वेदीक पध्दतीने उपचार पध्दती या ठिकाणी करण्यात येते. यानंतर संपूर्ण परिसरात आम्ही फेरुटका मारला. अगदी पंचतारांकीत हॉटेल्सना लाजवेल अशा प्रकारच्या रुम्स, सोयीसुविधा, सर्वत्र दर्जेदार लाकडी फर्निचरचा वापर, हवेशीर कक्ष, प्रत्येक कक्षाला बाल्कनी व नैसर्गिक नजारा अशा पध्दतीची रचना असलेल्या जवळपास ५० सुसज्ज रुम्स या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत. विविध थेरपींसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी प्रशिक्षित डॉक्टर, थेरपिस्ट व मनुष्यबळ या ठिकाणी उपलब्ध आहे. प्रत्येक थेरपीसाठी निरनिराळी पॅकेजेस तयार करण्यात आली असुन त्याची ऑनलाईन माहिती व बुकिंग अग्नीच्या वेबसाईटव्दारे करता येते. दोन दिवसांपासुन ते महिन्याभरापर्यंत मुक्कामी राहून उपचार घेण्याची व्यवस्था व पॅकेजेस या ठिकाणी उपलब्ध आहेत. जवळपास ६० एकर विस्तीर्ण जागेवर वसवलेल्या या जागेत आयुर्वेदिक सेंटरव्यतिरीक्त शेती व शेतीजन्य उत्पादनांचे इतरही अनेक प्रयोग यशस्वीपणे करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी अनेक प्रतिष्ठित व सर्वसामान्य नागरीक येऊन उपचार घेत असल्याचे श्री भुपेश यांनी आम्हाला सांगितले. सध्या लाॅकडाउनमुळे केंद्र बुकींंगसाठी बंद आहे. अनेक रुग्ण या ठिकाणी येऊन उपचार घेतल्यानंतर ठणठणीत बरे झाल्याचेदेखील त्यांनी उदाहरणांसह सांगितले. आपल्या हया आयुर्वेदीक व्हिलेजच्या प्रकल्पामध्ये आणखी नवनवीन कल्पना राबविणार असल्याचा मनोदय श्री भुपेश यांनी व्यक्त केला. ते व त्यांचे कुटुंब या ठिकाणी पूर्णवेळ कार्यरत असतात. त्यांनी आम्हाला दुपारचे भोजन त्यांच्यासमवेत करण्याचा आग्रह केला. त्यानंतर सवयीप्रमाणे त्यांना माझे आरोग्यमंथन हे पुस्तक भेट दिले. जेवणानंतर रिमझिम पावसात तिथून जवळच असलेल्या माथेरान पायथ्याशी फेरफटका मारुन तेथील निसर्गसौंदर्याचा आस्वाददेखील आम्ही घेतला. तेथे मनसोक्त भटकंती करत फोटोशुटची हौसदेखील भागवली. निसर्गरम्य व शांत ठिकाणी आयुर्वेदीक उपचार घेऊ इच्छीणा-या लोकांसाठी पनवेलजवळील अग्नि आयुर्वेदीक व्हिलेज हे मस्त ठिकाण आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई







































































Nice bro
ReplyDelete