श्री विलास कांबळे सर यांची ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागात अधीक्षक अभियंता म्हणून बदली
आरोग्य आयुक्तालयात काल वित्त विभागाचे अधिकारी श्री पतंगे सर यांच्यानंतर आज अभियान कार्यालयातील अधीक्षक अभियंता श्री विलास कांबळे सर हेदेखील बदली झाल्याने कार्यमुक्त झाले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पायाभूत सुविधा विकास कक्षातील कामकाजाची जबाबदारी बराच काळ त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. राज्यातील आरोग्य संस्थांची बांधकामे व दुरुस्त्यांच्या कामांवर सनियंत्रण करण्यासाठी त्यांनी राज्य पालथे घातले. अभियानांतर्गत कार्यरत राज्यभरातील उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, कार्यकारी अभियंता, वास्तुविशारद यांच्यासमवेत त्यांनी एक चांगला समन्वय राखला होता. अभियानाच्या वार्षिक आराखड्यातील मोठा भाग हा बांधकाम दुरुस्त्यांसाठी मंजूर होत असतो. त्याचे सुनियोजन, कालमर्यादीत व्यवस्थापन, राज्यस्तरीय सनियंत्रण, क्षेत्रीय स्तरावर स्थळ पाहणी या बाबी पार पाडण्याची जबाबदारी अधीक्षक अभियंता या पदाची असून त्याला न्याय देण्याचा कांबळे सरांनी पुरेपूर प्रयत्न केला. कुठल्याही प्रकारचे दडपण न घेता अडचणीच्या वेळी शांत राहून मार्ग कसा काढावा याचे त्यांना चांगले कसब होते. त्यामुळे कोणत्याही कामाचे त्यांना कधी टेन्शन आल्याचे पाहिले नाही. कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत सहकार्याचे व सौजन्याचे वर्तन यामुळे कांबळे सर विशेष लक्षात राहतात. ठाण्यासारख्या सर्वात मोठ्या जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागात त्यांची अधीक्षक अभियंता म्हणून झालेली बदली आव्हानात्मक असली तरी ही जबाबदारी ते सहजरित्या पेलतील अशी आशा आहे. त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी व आरोग्यदायी आयुष्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
वैभव







Comments
Post a Comment