अशा दुर्घटना रोखायला हव्यात






रायगड जिल्ह्यातील महाड शहरात तारीक पॅलेस ही पाच मजली निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. या दुर्घटनेत डझनभर लोकांचा मृत्यू झाला आहे. 
या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरसह तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, नगरपालिका इंजिनिअर आणि आरसीसी कन्सल्टन्स अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधारणपणे पाच ते सात वर्षांपूर्वी या इमारतीचं बांधकाम झालं होतं अशी माहिती आहे. 45 फ्लॅट असलेली ही इमारत गेल्या काही महिन्यांपासून हेलकावे खात असल्याची तक्रार रहिवाशांनी विकासकाकडे केली होती. मात्र, या तक्रारींकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने इतकी मोठी दुर्घटना घडल्याचे स्पष्ट होते. शिवाय दुर्घटनेच्या दिवशी इमारतीचा एक पिलेर (खांब) देखील ढासळला असल्याचे दिसून आले आहे. वास्तविकता अशा अनेक इमारती सर्वत्र जलद गतीने उभारण्यात आलेल्या आहेत. काहीतर रातोरात उभारल्या गेल्या आहेत. त्यावर नियंत्रण राखण्यात स्थानिक यंत्रणा अपयशी ठरत असल्याने लोकांची फसवणूक करणारे तथाकथित बिल्डर लोकांना लाखोंचा चुना लावून पसार होतात. त्यांनतर काही वर्षांनी इमारतींच्या बांधकामातील उणिवा जाणवायला लागतात. बांधकाम सैल व्हायला लागते. याकडे दुर्लक्ष केले तर महाडसारख्या दुर्घटना घडतात हे वारंवार घडलेल्या उदाहरनांवरून दिसून आले आहे. मात्र याला खरा जबाबदार कोण हा प्रश्न यानिमित्ताने अनुत्तरीतच राहत आहे. इमारत बांधणारा बिल्डर, त्याला परवानग्या देणारे प्रशासकीय अधिकारी, वास्तुविशारद, अभियंते की घरे विकत घेणारे लोक याचा उहापोह एकदा व्हायलाच हवा. इमारत उभारण्यासाठी ठराविक नियमावली सरकारने घालून दिलेली आहे. मात्र आर्थिक व्यवहारांत गुंतलेले लोक याला रीतसर फाटा देऊन आपला स्वार्थ साधून घेतात व लोकांच्या जीवाशी खेळतात. सरकारने कधीतरी याचा गांभीर्याने विचार करून अशा घटकांवर कडक कारवाई करायला हवी. इमारतींचे पारदर्शक पद्धतीने स्ट्रक्चरल ऑडिट करायला हवे. कमकुवत व निकृष्ट साहित्य वापरलेल्या इमारती त्वरित रिकाम्या करून त्यांची पुनरबांधणी करण्याचे आदेश संबंधीताना द्यायला हवेत. दुर्घटनेनंतर सरकार पीडित कुटुंबाना आर्थिक मदत देऊन तात्पुरता दिलासा देईलही मात्र दुर्घटनेत प्राणाला मुकलेल्या जीवांचे मोल काय? 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 



Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त