तां ना पि हि नी पा जा - रंग इंद्रधनुष्याचे
- Get link
- X
- Other Apps
आपल्यापैकी अनेकांनी आयुष्यात एकदातरी इंद्रधनुष्याचा अनुभव घेतला असेल. लहानपणी या इंद्रधनुष्याचे खूप अप्रूप असायचे. दुरवर आकाशातुन कुठेतरी जमिनीवर पडल्यासारखे दिसणारे इंद्रधनुष्य अत्यंत मनमोहक व सूंदर दिसते. परवा कार्यालयाच्या खिडकीतून पाहताना ब-याच वर्षानंतर असे इंद्रधनुष्य नजरेस पडले व बालपण आठवले. आपले बालपण रंगिबेरंगी आठवणींनी भरलेले असते. जसजसे बालपण सरते तसे हे रंग आयुष्यातून दूर होऊ लागतात व एका विशिष्ट छटेने भरलेले जीवन पुढेपुढे सरकत जाते. मात्र आकाशात दिसणारे इंद्रधनुष्याचे असे दुर्मिळ चित्र पुन्हा एकदा मनाला उभारी देते व बालपण आठवायला भाग पाडते. वास्ताविक इंद्रधनुष्य म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील बाष्पकणांवर व दवबिंदूंवर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन होऊन प्रकाशाचा वर्णपट दिसण्याची वातावरणीय, प्रकाशीय प्रक्रीया आहे. हा वर्णपट धनुष्याकृतीप्रमाणे दिसतो. संपूर्ण गोलाकार इंद्रधनुष्याला इंद्रवज्र असेही म्हणतात. इंद्रवज्र क्वचित आणि फक्त काही भौगोलिक ठिकाणीच दिसते. प्रत्येक इंद्रधनुष्य हा पूर्ण गोल "इंद्रवज्रच" असतो. पण क्षितिजामुळे आपल्याला तो अर्धगोल दिसतो. पावसाचे थेंब कसे , कुठल्या दिशेने, त्यातले अंतर आणि किती वेगात पडत आहेत यावर इंद्रधनुष्याचे पूर्ण गोलाकार दिसणे अवलंबून असते. इंद्रवज्राचे वैशिष्ट्य असे, की जो हे दृश्य पाहतो; तो स्वतःलाच त्यात पाहतो. पाहणा-याचे डोके बरोबर मध्यभागी दिसते. तां ना पि ही नि पा जां हे इंद्रधनुष्यातील हे सप्तरंग. रंग लक्षात ठेवण्याचा बालपणीचा फॉर्मूला म्हणजे ''ता ना पि ही नि पा जा''. लहानपणी इंद्रधनुष्याबद्दल वाटणारं अप्रूप, निसर्गाची सुंदर ओळख आणि त्या पाठीमागील विज्ञान जाणण्याची उत्कंठा या बाबी आवर्जून आठवतात. अजूनही इंद्रधनुष्य बघितलं की मन हरखून जातं. इंद्रधनुष्याचे हेच विविध, मनमोहक रंग आयुष्यातही अनुभवले, उपभोगले आणि साठवलेदेखील.
खरंतर आपल्या प्रत्येकाचं आयुष्य असतंच असं रंगीबेरंगी इंद्रधनुष्यासारखं. प्रत्येक वेळी प्रत्येक घटनेला, भावनेला एक एक रंग आहे असं वाटतं. बालपणाचा काळ अजाणतेपणाचा असला, तरी जाणत्या वयात वेगवेगळे अनुभव, सुखाचे, दु:खाचे, संकटांचे, यशाचे आणि अपयशाचे असे विविध रंग आयुष्यात असल्यामुळे निरनिराळया रंगांच्या एकसंघपणे दिसणा-या इंद्रधनुष्याची संकल्पना मला खूप आवडते. इंद्रधनुष्यातील प्रत्येक रंग वेगवेगळा असून एकमेकात सरमिसळ आहे. काही रंग आवडणारे, तर काही न आवडणारेही आहेत, पण सरसकट एकूण अनुभव हा इंद्रधनुषी आहे. तां ना पि हि नी पा जां ह्यातले सगळेच रंग आपल्याला आवडणारे नसले, तरी सर्व रंगांचा आपल्या मनावर व आयुष्यावर एकूण परिणाम खूप रंजक व आल्हाददायक असतो. त्याची अनुभूती प्रत्येकाने कशी घ्यावी हे सर्वस्वी आपल्या संयम, मनस्थिती व प्रसंगावधानावर अवलंबून असते. बाकी आपण सर्व सूज्ञ आहात.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps





V NICE!
ReplyDelete