ई पासची अट रद्द करा


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन काळापासून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी राज्य शासन ई पास देण्याची योजना राबवत आहे. मात्र राज्य अनलॉक होत असताना या ई पासचे औचित्य आता फार राहिलेले नाही. एसटीतून आंतरराज्य प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे, मग खासगी गाडीतून प्रवास करताना ई पास बंधनकारक करण्याचे प्रयोजन काय हे अनाकलनीय आहे. तसेच अनेक दलाल ई-पास मंजूर करण्यासाठी पैसे घेत असल्याचे प्रकार घडत आहेत, तसेच बनावट ई पास वितरित करणाऱ्या लोकांचेदेखील पेव फुटले आहे. अनेक जिल्हयांच्या सीमांवर तर ई-पास तपासणी करणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. ओळखीच्या लोकांसोबत खासगी गाडीतून प्रवास करताना ई-पास बंधनकारक आणि अनोळखी प्रवाशांसोबत एसटीतून प्रवास करताना मात्र पासची गरज नाही ही सरकारी भूमिका न पटणारी असून त्यावर जनसामान्यांतून नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. रस्त्यांवरील खड्डे, वाहतूककोंडी यांमुळे रस्ते प्रवास दिवसेंदिवस अधिक वेदनादायी ठरत आहे. सामान्यांना लोकलमध्ये प्रवेश नाही. एसटी-बेस्टमध्ये गर्दी असल्याने सर्वसामान्यांना खासगी वाहतुकीचाच आधार आहे. अनेक जणांना कामानिमित्त खाजगी वाहनांतून आंतरराज्य प्रवास करावा लागतो. अशा वेळी ई-पास अडचणीचा ठरतो. सर्वसामान्यांना होणारा त्रास व त्यातून होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवासासाठी ई-पासची अट तातडीने रद्द करावी असे मत आहे.


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त