लिखाणाने मिळतो आत्मविश्वास
लॉकडाऊनमध्ये काय केले असा प्रश्न कुणी केला तर बऱ्याच लोकांकडे उत्तरेच नाहीत. मात्र लॉकडाऊन ही छंदिष्ट लोकांसाठी एक पर्वणी होती असे मला वाटते. आयुष्य जगण्याच्या धडपडीत आपल्या आवडीच्या अनेक गोष्टी करायच्या राहून जातात. लॉकडाऊनसारखा प्रसंग शतकामध्ये पहिल्यांदाच आला आहे. खरेतर ही जागतिक आपत्ती आहे त्यामुळे तिचा उत्सव साजरा करता येणार नाही. मात्र आयुष्यात पहिल्यांदाच मिळालेल्या ह्या सक्तीच्या सुट्टीत मानसिक तृप्तीचा आंनद शोधण्यात काय हरकत आहे. यासाठी आपल्या आवडीचा छंद जीवनात पुन्हा रुजवणे व जागवणे ही एक प्रकारची पर्वणी ठरू शकेल. आपल्याला अनेक छंद असतात पण 'वेळ मिळत नाही' या सबबीखाली आपण ते जोपासणे सोडून देतो. पण खरेतर हा आपल्या आत्मिक आनंदापासूनचा केवळ पळपुटेपणा आहे. ऐहिक सुखपायी आपण मानसिक आनंदावर विरजण घालत असतो. मनुष्याला आपल्या छंदाची आवड असेल तर सवड मिळतेच या मताचा मी आहे. त्यामुळेच लिखाणाचा लागलेला छंद आज माझे व्यसन बनला आहे. कामाचा कितीही व्याप असला तरी दिवसभरातून थोडा वेळ तरी लिखाणावर खर्च करतोच. मग तो प्रवासातील असो वा रात्री झोपण्यापूर्वीचा. त्यामुळे लॉकडाऊन काळातही जरी कामावर रुजू असलो तरी लिखाण अजिबात थांबले नाही. ज्युनिअर कॉलेजला असल्यापासुनच लिहिण्याची आवड लागली. लायब्ररी व मिळेल तिथून मासिके, वर्तमानपत्रे, दिवाळी अंक, कादंबरी यासारखे मराठी साहित्य वाचायचा जिकीरीने प्रयत्न करायचो. ज्युनिअर कॉलेजला असतानाच अनेक साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकांसाठी जमेल तसे लिखाण करायचो. नवी मुंबईत आल्यावरदेखील लिखाणाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. मात्र मुंबई, नवी मुंबईतील दर्जेदार वृत्तपत्रे व त्यामधील लिखाणाची गुणवत्ता पाहिल्यानंतर आपलेदेखील लिखाण त्या क्षमतेचे असणे गरजेचे असल्याची मला मनोमन खात्री पटली होती. त्यासाठी वाचन व शब्दसंचय वृद्धिंगत करणे आवश्यक होते. मग पुन्हा एकदा वाचनाकडे वळलो. पदवीचे शिक्षण वाशीतली आयसीएल कॉलेजमध्ये घेत असताना पुस्तक खरेदी व वाचनाचे अक्षरश वेडच लागले. दुसरीकडे विविध वृत्तपत्रे व मासिकांसाठी लिखाण सुरूच होते. मधल्या काळात लिखाणासाठी अनेक पुरस्कारदेखील मिळाले. त्यानंतर माझ्या आयुष्यात अशी अनेक व्यक्तीमत्वे आली ज्यांनी वेळोवेळी माझ्या लिखाणाला प्रोत्साहित केले व मनोबल वाढविले. अशी एक ना अनेक नावे घेता येतील ज्यामध्ये काही पत्रकार, संपादक, कुटुंबिय, कार्यालयिन सहकारी, मित्रमंडळी यांचा खूप मोलाचा वाटा आहे. माझ्या लिखाणाचा सुरु झालेला हा प्रवास आजदेखील अविरत सुरु असून अनेक नामांकित वृत्तपत्रांमध्ये सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक यासारख्या विविध विषयांवर दररोज नियमितपणे लिखाण करतोय. अनेक वृत्तपत्रे, सामाजिक संस्था व संघटनांनी लिखाणासाठीआजवर गौरविले आहे. साहित्याशी झालेली संगत मला एका वेगळयाच विश्वात घेऊन गेलेली असुन दैनंदिन जिवनापासून दुर एक विलक्षण काल्पनिक सहवासाची अनुभुती रोज अनुभवायला मिळते. कार्यालयीन व कौटुंबिक कामकाजातील वेळ न वापरता घर ते कार्यालय या प्रवासामधील येण्याजाण्याचा वेळ मी लिखाणासाठी वापरत असून हाच वेळ एकांतात विविध विषयांच्या मांडणीसाठी व्यतीत करत आहे. कोणत्याही व्यक्तीने जोपासलेल्या छंदाला समाजमान्यता व मिळणा-या प्रसिध्दीमुळे त्या माणसाचा दैंनदिन जिवनामध्ये वावरण्यासाठी लागणारा आत्मविश्वासदेखील वाढीस लागतो तसेच विविध ब-यावाईट घडामोडींना तोंड देण्याचे मनसामर्थ्य या आत्मविश्वासाने मिळत असल्यामुळे प्रत्येकाने एखादा तरी छंद कुटुंबकबिला व रोजगार व्यवसायापासून दूर होऊन आपल्या आयुष्यात जोपासलाच पाहिजे हे माझे प्रामाणिक मत आहे. आरोग्य विभागातील सहकाऱ्यांच्या सहयोगाने नुकतेच माझे आरोग्यविषयक लेखमालिकेचे "आरोग्यमंथन" हे ई बुकदेखील भर लॉकडाऊनमध्ये प्रकाशित झाले याबद्दलचा आंनद शब्दात अवर्णनीय आहे. लिखाणाची लागलेली आवड आज प्रापंचिक आयुष्यापासूुन दुर एका वेगळया विश्वात तल्लीन होण्याचे माझे व्यसन बनलेले असुन हा छंद आयुष्यातील अधिकाधिक काळ टीकवण्याचा माझा मानस व संकल्प आहे.

Comments
Post a Comment