असा मामा पुन्हा होणे नाही

कुटुंबाचा आधारस्तंभ हरपला
मागील शनिवारचा दिवस आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळवणारा ठरला. आमच्या सर्वांच्या लाडक्या भाईमामाला काळाने झडप घालत सर्वांपासून दूर नेले. गेल्या दोन वर्षांपासून किडनीचा आजार जडलेले मामा या वेळी मात्र दुखण्यातून सुटू शकले नाही. शुक्रवारी अचानक त्यांना पोटाचा विकार सुरू झाला व नैसर्गिक क्रियांमध्ये बाधा येत पोटात पाणी साचायला लागले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मामांचा मुलगा अनुप याने त्यांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात भरती केले. सायंकाळपर्यंत त्यांची प्रकृती अधिक अत्यवस्थ झाल्याने त्यांना श्वास घेण्यासही प्रचंड त्रास होऊ लागला. त्यामुळे व्हेंटिलेटरच्या ताब्यात गेलेले मामा शनिवारी पहाटे त्यातून बाहेर पडले ते कायमचेच. पन्नाशीच्या वयातील मामा इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील याची सुतरामदेखील शक्यता नसल्याने कुटुंबातील सर्वांसाठीच हा मोठा धक्काच आहे. आपल्या हळव्या व मायाळू स्वभावाने संपूर्ण कुटुंबाला एकसंघ ठेवण्यात यशस्वी ठरलेले मामा इतरांना हेवा वाटावा असेच जीवन जगले. कुणाच्या घरचे लग्न असो, पूजा असो, आजारपण असो, शैक्षणिक अडचण असो किंवा अचानकपणे ओढवलेला संकटकालीन प्रसंग असो, प्रत्येक वेळी कुटुंबातील सर्वांच्या मदतीला निस्वार्थपणे तन, मन, धनाने धावून जाणारा आमचा मामा एकमेवाद्वितिय होता. आप्तजनांच्या प्रत्येकाच्या घरच्या कार्यात पुढाकार घेऊन आघाडीवर काम करताना भाईमामाच दिसायचा. त्यामुळे तो अखेरपर्यंत अनेक कुटुंबांचा आधारस्तंभ ठरला. माझ्याबाबतीत सांगायचे झाले तर माझे शहरात येणे, शिक्षण, नोकरी, आम्हा भावंडांची लग्ने आणि घरातील प्रत्येक कार्यात भाईमामाचा हातभार व सल्ला असायचा. त्यांच्या सहयोगाशिवाय कुठलेच काम कधी पार पडले नाही. त्यामुळे घरातील सर्वांनाच एका वेगळ्या ऋणानुबंधात बांधून ठेवून मामांनी आधाराचा हात दिला. आपले आई वडील, पत्नी, मुलगा, तीन बहिणी, भाऊ, त्यांची मुले यांच्यावर नितांत प्रेम करणारा मामा सर्वांसाठी एक आधारवडच होता. आपल्या सामाजिक जीवनातदेखील मामांनी अनेक कामे केलेली असल्याने त्यांनी असंख्य मित्रमंडळींचा गोतावळा जमा केला होता. गावातील, समाजातील लोकांच्या सुखदुःखात वाटेकरी होताना मी त्यांना जवळून पाहिलंय. ठाणे शहरातील कुणबी सेवा संघाच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावित अनेक लोक आज त्यांच्या अकाली जाण्याने हळहळ व्यक्त करत आहेत. गाव, गावातील भावंडे व इतर लोकांची तसेच गावच्या शेतीची त्यांना विशेष ओढ होती. गावातील बिनकामाच्या महाकाय अशा घराचा ढाचा पाडून त्या ठिकाणी त्यांनी प्रचंड मेहनतीने व स्वकष्टातून टुमदार घर उभे केले आहे. अनेकांना संकटातून सोडवणारे मामा स्वतःला मात्र एका आजारातून सोडवू शकले नाहीत व आम्हाला पोरके करून कायमचे निघून गेले. सध्या आपले करिअर घडवण्याच्या प्रयत्नात असलेला मुलगा, मणक्याचे ऑपरेशन झालेली आई व पत्नीचे दीर्घकालीन आजारपण या तिन्ही पातळ्यांवर मानसिकदृष्ट्या लढणारा व हळवा झालेला मात्र शरीराने पूर्णतः थकलेला मामा मी पाहिलाय. आज मुक्त होऊनदेखील त्यांचा जीव या तीन गोष्टीत अडकला असणार हे निश्चित. आई बाबांचा डोक्यावरील हात, पत्नीची मौलिक साथ व दिलीपमामासारख्या जिगरी मित्राची संगत या गोष्टींचा आयुष्यात प्रचंड अभिमान बाळगणारा मामा कुटुंब, प्रपंच व मैत्रीला जागणारा ठरला. इतरांची आयुष्ये सावरता सावरता स्वतःचे आयुष्य खर्ची घालणारा मामा आज कायमचे मनात घर करून गेलाय. आम्हा भाचेकंपनीसाठी म्हणजे बहिणींच्या मुलांसाठी जीव काढणारा, त्यांची आयुष्य स्थिर - स्थावर होण्याची कामना सदैव मनी बाळगणारा व त्यासाठी सर्वतोपरी योगदान देणारा असा मामा पुन्हा मिळणे नाही. 


वैभव मोहन पाटील 

Comments

  1. Wonderful pen sketch of a dear relative . Its touching !
    Mahendra

    ReplyDelete
  2. वैभवतुझे मामा परलोकवासी भाई परशुराम पाटील यांना नियतीने त्यांच्या संसारात खेळत असलेल्या डावातून अर्ध्या वर डाव मोडून नीयतीनेअकस्मात त्यांचे जीवनावर घाला घातला तुझ्या लेखणीतून असा मामा होणे नाही ह्या पोस्ट द्वारे भाई मामांचे थोडक्यात जीवन चरित्राचा परिचय करून दिला व्यक्तीपेक्षा व्यक्तीचे गुण सामाजिक कर्तव्य महत्त्वाचे असतात तुझ्या मामांनी ती जोपासून अल्पायुष्यात सुद्धा जीवनाचे सार्थक केले आहे आकस्मित निधनामुळे त्यांचे परिवारावर अपरिमित असे दुःख कोसळले आहे ते दुःख सहन करण्याची परमेश्वर त्याला शक्ती देवो.
    मी वैयक्तिक माझा परिवार त्यांच्या दुःखात सहभागी आहोत /₹राम कृष्ण हरी/
    उपजे ते नासे/ नासे ते पुनरपी दिसे /हे घटीका यंत्र जैसे
    परी भ्रमेगा/ ज्ञानेश्वरी----

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त