नैराश्यात दडलेला कोरोना

 कोरोनावर उपचार घेत असताना मृत्यू पावलेल्या लोकांमध्ये मानसिक ताण व नैराश्य आल्याने मृत्यू झाल्याचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाविषयी असलेल्या अज्ञानाने एक गंभीर असाध्य आजार झाल्याची भीती रुग्णांमध्ये निर्माण होते व ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाते. त्यातून बाहेर पडणे त्या व्यक्तीला कठीण होऊन जाते व वेळीच तिला मानसिक पाठबळदेखील न मिळाल्याने त्याचा जीवघेणा परिणाम त्या व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर होतो. आगामी काळात याच मानसिक विवक्षिततेतून रुग्णांना बाहेर काढण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणांसमोर आहे. तसेच मानसिक आरोग्य या काहीश्या दुर्लक्षित समस्येकडेदेखील कटाक्षाने लक्ष केंद्रित करणे काळाची गरज बनलेली आहे. मनाने व्यक्ती सक्षम व सशक्त असेल तिला इतर व्याधी फार पटकन चिकटत नाहीत. मानसिक आरोग्य हा गहन आणि व्यापक विषय आहे. मात्र ताण आणि नैराश्य हे मानसिक आरोग्याचे सर्वाधिक चर्चिले जाणारे व्यंग आहेत. ताण ही आपल्यातील सर्वाधिक जणांना भेडसावणारी समस्या आहे तर नैराश्य हा सर्वात जास्त आढळणारा मानसिक आजार आहे. अनेकदा ताण हे नैराश्य येण्याचे कारण असते. मात्र ह्या ताणाचे परिणाम व नैराश्याची कारणे इतरही असू शकतात. खरेतर नैराश्य हा भावनिक आजार आहे. हा आजार असलेल्या व्यक्ती सतत दु:खी राहतात. कुठली ना कुठली चिंता त्यांना भेडसावत असल्यामुळे ह्या व्यक्ती आपल्याच दुनियेत हरवल्याचे पाहायला मिळते. अगदी आनंदी घटनांमध्येही त्या निराश असतात. समस्या सुटली की, नैराश्य आपोआप जाईल असा अनेकांचा समज असतो. पण असे होताना फार अपवादानेच आढळते. रोजच्या आयुष्यातील दगदग, अपयश, नकार, विरह, पैशांचे व्यवस्थापन हे ताण वाढवणारे असते. काही वेळा यापेक्षाही अधिक तणावपूर्ण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. अपघात, जिवावर बेतलेला प्रसंग, सामाजिक बहिष्कार, बलात्कार, तिरस्कार, सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान यापैकी एखाद्या कारणाने आत्मसन्मानावर झालेला आघात यामुळे तणाव वाढतो.

सोशल मिडीयाचा अति वापरदेखील नैराशाला कारणीभूत ठरू शकतो. सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपली मित्रमंडळी व जवळच्या माणसांसोबत तुम्ही सतत संपर्कात राहू शकता. हे जरी खरे असले तरी तासंतास सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवत असता. माणसातील माणुसकी हिरावण्याचे काम ह्या सोशल माध्यमाने केले आहे. तसेच विविध ऍप्लिकेशन्स तसेच सोशल मीडिया वरचे अपडेट्स पाहून नैराश्य, मत्सर, एकटेपणाची भावना येऊ शकते. त्यामुळे काही काळासाठी का असे ना या सगळ्यापासून दूर रहा. एखादी कुटुंबातील व्यक्ती अशा कोणत्याही नात्यात तुम्हाला वाईट अनुभव येत असेल तर त्या व्यक्तीपासून स्वतःला दूर ठेवा. जर एखाद्या नात्यात तुम्ही भावनिकरीत्या दुखावले जात असाल, तुमच्यात नकारात्मक भावना येत असेल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या मानसिक व भावनिक आरोग्यावर होतो. त्यामुळे चिंता, नैराश्य वाढीस लागतं. त्यामुळे अशा नकारात्मक व मनाला न पटणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवणे कधीही उत्तम. तणावपूर्ण प्रसंग झाल्यावर व्यक्तीच्या वागणुकीत बदल होतात. एकदम उत्तेजित होणे, हसणे-रडणे, गोंधळल्यासारखे वागणे, इकडे-तिकडे फिरणे, विसरणे किंवा एकटक पाहत राहणे. सुरक्षित, शांत ठिकाणी ओळखीच्या माणसांसोबत ठेवून या व्यक्तीची काळजी घेतली की या ताणातून पूर्ण बरे होता येते. काही व्यक्ती ताणातून बाहेरच येत नाहीत. सतत तोच विचार करतात. काहींना त्या प्रसंगाचे चित्र डोळ्यासमोर दिसते, त्या वेळचा त्रास पुन्हा अनुभवणे, दचकणे असे वारंवार घडते. भित्रेपणा, उदासीनता, चिडचिड वाढते. भविष्याचे किंवा अगदी घराबाहेर फिरायला जाण्याचेही नियोजन करणे जमेनासे होते. जग, इतर व्यक्ती आणि घटनांशी ते अलिप्त होतात. त्यामुळे नात्यांमध्ये अंतर येऊ लागते. या व्यक्तींना योग्य औषध, समुपदेशनाची गरज असते. त्याशिवाय जीवनामध्ये सकारात्मक राहण्यासाठी मार्गदर्शन देखील अत्यंत आवश्यक असते. संपूर्ण जगभराच्या तुलनेत भारतात नैराश्याचे प्रमाण १५.९% म्हणजे सर्वाधिक आहे. काही अभ्यासातून असे दिसून येते की गेल्या काही दशकांपासून भारतात नैराश्याचे प्रमाण  वाढलेले आहे. तुमच्या रोजच्या सवयी तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम घडवून आणतात. सतत आणि तीव्र स्वरूपाच्या मानसिक वेदना होतात. मन बधिर, अस्वस्थ आणि असमाधानी होते. सतत रडू येते, काही करावेसे वाटत नाही. यातून बाहेर पडण्यासाठी व्यक्ती नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करतात, धार्मिक होतात किंवा वारंवार फिरायला जातात. काही काळ थोडे बरे वाटते. भूक आणि झोप कमी झाल्याचे लक्षात आल्यावर ते व्यायाम करतात, पथ्य पाळतात. वेगवेगळ्या तपासण्या, थेरपी, पथीची औषधे घेऊन बरे होण्याचा प्रयत्न करतात. काही व्यक्ती दारू किंवा झोपेच्या गोळ्या घेतात. मात्र यामुळे शरीर आणि मन थकून जाते. ही व्यक्ती निराश होते. मनात आत्महत्येसारखे टोकाचे विचार येतात. नैराश्यात व्यक्ती गोंधळते, निर्णय घेताना डगमगते आणि अकार्यक्षम होत व नव्या समस्या तयार होतात. त्यामुळे वाट पाहण्यापेक्षा उपचार घेणे उत्तम. नैराश्य कमी करण्यासाठी डॉक्टरी सल्ला किंवा एखादा नामांकित समुदेशक निवडणे कधीही चांगले. वेळेत उपचार दुरु झाल्याने रुग्ण नैराश्यातून बाहेर पडू शकतो अन्यथा मानसिक स्थिती ढासळत चालल्यास तो जीवन संपवण्याचाही विचार करू लागतो. कोरोना महामारीत अनेक रुग्ण या नैराश्यात जाऊन मुत्यूमुखी पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात कोरोना व यासारख्या अनेक रोगांचा मुकाबला करण्यासाठी रुग्णांना नैराश्यातून बाहेर काढून मानसिक स्थैर्य प्रदान करणे गरजेचे असून त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न खूप मोलाचे ठरतील. 


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
मोबाईल ९८१९११२८८५
vaibhavpatil2k5@yahoo.com


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त