११ ऑक्टोबर - आंतराष्ट्रीय बालिका दिन
- Get link
- X
- Other Apps
आज ११ ऑक्टाेबर,आंतराष्ट्रीय बालिका दिन. देशामध्ये महिलांंवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. आजदेखील स्त्री हा कायमच समाजातील उपेक्षित व कमकुवत घटक समजला जातो ज्याचा परिणाम स्त्रीवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये होताना दिसत आहे. स्त्री सक्षमीकरणाचा परिणाम म्हणावा तितक्या प्रमाणात दिसत नसल्याने स्त्री -पुरुष लिंगामधील विषमता वाढत चालली आहे. स्त्री भ्रुण हत्या हा आपल्या समाजातील अत्यंत संवेदनशील विषय आहे. गर्भात असतानाच मुलीचा जीव घेतल्याने आज देशातील अनेक राज्यांत मुलींचा जन्मदर खूपच कमी झालेला आहे. मुलांच्या संख्येच्या तुलनेत मुलींची संख्या बहुतांश राज्यांत कमालिची घसरली असल्याचे दिसून येत आहे. आजदेखील पुरुषप्रधान संस्कृतीचा पुरस्कार करणारे समाजघटक अस्तित्वात आहेत याचेच खरेतर अप्रूप वाटते. या घटकांच्या माध्यमातून पुरुषी अहंकार पुढे रेटला जात आहे व त्यामुळे वंशाचा दिवा वगैरे या संकल्पना आजदेखील जोर धरून आहेत. आज अनेक कुटुंबे आपण पाहिली तर मुलगा व्हावा यासाठी नवस, आराधना व गर्भलिंगपरिक्षा करत असताना आपणास दिसतात. मुलगा हाच वंशाचा दिवा, तोच आपल्या वृद्धापणातील आसरा हि सामान्य माणसाची संकल्पना असते. मुलगी कितीही चांगली असली तरी ती परक्याघरची, एक ना एक दिवस ती आईवडिलांना सोडून परघरी जाणार हा निसर्गनियम स्वीकारून अनेक जण स्त्री भ्रूण हत्येचा टोकाचा निर्णय स्वीकरत आहेत. पण आज जर आपण नीट डोळे व मन उघडे ठेवून पाहिले तर सर्वच क्षेत्रांत मुली ह्या मुलांपेक्षा कितितरी पुढे असल्याचे आपणास आढळून येईल. शिक्षण, खेळ, नोकरी, व्यवसाय, घर या सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. एकाच वेळी पत्नी, आई, बहीण, गृहिणी व इतर कितीतरी नाती फक्त एक स्त्रीच निभाऊ शकते. तसेच प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते हे आपण उपहासाने नाही तर अभिमानाने म्हणतो तेदेखील याचसाठी. मुलांच्या बाबतीत आढळणारी व्यसनाधीनता, असंगती, संस्कृतीचा अभाव, बेरोजगारी, अशिक्षितपणा ह्या गोष्टी मुलींमध्ये क्वचितच आढळून येतील. लग्न होऊन देखील आई वडीलांबद्दल प्रचंड प्रेम, आपुलकी, माया, सन्मान, आदर या गोष्टी मुलांच्या तुलनेत मुलींकडे काकणभर जास्तच दिसून येतील. यामुळे एक किंवा दोन मुलींवरच समाधान मानणारी अनेक आदर्श कुटुंबे समाजात दिसून येतील. खरेतर त्यांचा समाजातून सन्मानाच व्हायला पाहिजे. स्त्री भ्रूण हत्येची कीड आपल्या समाजास ज्यांच्यामुळे लागली आहे त्यांचा सर्व स्तरातून निषेध व्हायला पाहिजे. काही मोजके स्वार्थी लोक समाजाचा समतोल बिघडविण्याचे काम करत आहेत. त्यांना वेळीच आवरले गेले पाहिजे. सोनोग्राफी सारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेवेळी उपयोगी पडणाऱ्या यंत्राचा वापर गर्भलिंग निदानासाठी केला जात आहे. ज्यामुळे अनेक निष्पाप जीव जन्माला येण्याआधीच संपवले जात आहेत. हे खरतर खूपच भयानक आहे. केवळ पुरुष भ्रूणच जन्माला आले पाहिजे या पाशवी वृत्तीपायी आज स्त्री पुरुष लोकसंख्येचा सामाजिक समतोलदेखील ढासळत चालला आहे. प्रत्येकाला आपल्या घरात एक चांगली पत्नी हवी असते, प्रेमळ आई पाहिजे, भावावर जीव ओवळणारी बहीण पाहिजे पण मुलगी नको हि वृत्ती कुठेतरी थांबवली गेली पाहिजे. यासाठी मोठ्या प्रमाणावर सामाजिक जागरूकता गरजेची आहे. व्हाट्सअप, फेसबुक यासारख्या सोशिअल माध्यमांचा वापर याकामी खूपच प्रभावी ठरू शकतो. सामाजिक कार्यात काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, राजकीय पुढारी, कुटुंबप्रमुख हे घटक या कामामध्ये मोठी भूमिका बजावू शकतात. राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मुलींचा जननदर अजूनही खूप कमीच आहे. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी व मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी सर्व स्तरांतून व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. स्त्री जन्माबाबत समाजात असलेले गैरसमज, स्त्री भ्रूण हत्येचे घडणारे प्रकार व मुलींना ओझे समजण्याची आजची सामाजिक प्रवृत्ती यांच्यासाठी ही घटना खरेतर एक चपराकच आहे. मुलींचे समाजातील घटणारे प्रमाण रोखायचे असेल तर स्त्री जन्माला प्रोत्साहन देणारे व मुलींच्या जन्माचा सन्मान करणारे असे उपक्रम सर्वत्र आयोजित करण्याची आज गरज आहे. शासनाच्या वतीने स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून व्यापक प्रयत्न सुरु आहेत. गर्भलिंगनिदान करणाऱ्या सोनिग्रफी सेंटर्स वर शासकीय पथकांमार्फत छापे मारण्यात येत आहेत. दोषी लोकांवर व त्यांच्या यंत्रासमुग्रीवर सीलबंदीची व फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. बीड जिलहयातील गाजलेले डॉ मुंडे प्रकरण सर्वसृत आहेच. त्यामुळे गर्भलिंगनिदान विरोधी कायदा अत्यंत कडक करण्यात आलेला असून अशा प्रकारे बेकायदा व्यवसाय करणाऱ्या व गर्भलिंगनिदान चाचणीचा अवैध व्यवसाय करणाऱ्या कोणाचीही गय केली जात नाही. तसेच त्यांना समाजदेखील कधीच पाठीशी घालत नाही व माफ करत नाही, करणारही नाही. त्यामुळे आता खरी जागृकतेची गरज आहे ती लोकांमध्ये. अशा प्रकारे मुलीच्या गर्भाचा जीव घेणे एक प्रकारे परमेश्वराने दिलेल्या वरदानाला ठोकरन्यासारखे आहे, निसर्गाविरुद्ध चालण्यासारखे आहे. स्त्री पुरुष समानता हि काळाची व सामाजिक गरज आहे. त्याचा समतोल बिघडवण्याचे काम जाणीवपूर्वक करू नका नाहीतर तुमच्या वैयक्तिक स्वार्थापायी तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे येणारी भावी पिढी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. त्यांचे समाजजीवन उध्वस्त केल्याचे पातक माथी मारून घेऊ नका. गर्भलिंगनिदान करणे एक गंभीर गुन्हा व सामाजिक अपराध आहे. त्यापासून दूर रहा व आपल्या समाजाला सुद्धा दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.
"मुलगी वाचवा, देश वाचवा"
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment