१५ ऑक्‍टोबर - जागतिक हाताची स्‍वच्‍छता जागरुकता दिन

१५ ऑक्‍टोबर - जागतिक हाताची स्‍वच्‍छता जागरुकता दिन 

१५ ऑक्‍टोबर हा दिवस जागतिक हाताची स्‍वच्‍छता जागरुकता दिन म्‍हणून साजरा केला जातो. आरोग्‍य व स्‍वच्‍छता या दोन घटकांचा अत्‍यंत घनिष्‍ट संबंध असुन निरोगी आयुष्‍यासाठी प्रत्‍येकाने आपल्‍या जिवनात स्‍वच्‍छतेचा अवलंब करणे गरजेचे आहे. सध्‍याच्‍या कोरोना साथपरिस्‍थीतीच्‍या काळात तर स्‍वच्‍छतेची ही गरज अधिक प्रकर्षाने अधोरेखित झाली आहे. नाका तोंडावाटे होणा-या संसर्गासाठी हात हा अवयव सर्वाधिक कारणीभुत ठरत असल्‍यामुळे हाताची नियमित स्‍वच्‍छता अनिवार्य ठरते. कोणतेही काम करण्‍यापूर्वी वा केल्‍यानंतर हात स्‍वच्‍छ धुणे व निर्जंतुक करण्‍याचा नियम संसर्ग टाळण्‍यासाठी यापुढे कटाक्षाने पाळावा लागणार आहे. एकंदरीत, स्‍वच्‍छता हा नियम नसून सवय असायला हवी. सार्वजनिक स्‍वच्‍छतेची सुरुवात वैयक्तिक स्‍वच्‍छतेपासून होते. प्रत्‍येकाने आपले घर व परिसर स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी प्रयत्‍न केले तर 'स्‍वच्‍छ भारत' संकल्‍पना प्रत्‍यक्षात उतरण्‍यास वेळ लागणार नाही. स्‍वच्‍छतेचे धडे प्रत्‍येकाला शालेय जिवनापासुन व कुटुंबांतून मिळायला हवेत. शिक्षण ही विकासाची पहिली पायरी आहे व स्‍वच्‍छता हा विकासाचा अविभाज्‍य भाग आहे. आपल्‍या घरांची,  गावांची, परिसराची व पर्यायाने देशाचीही स्वच्छता वैयक्‍तीक योगदानातून कशी होईल याचा विचार प्रत्‍येकाने करणे व त्‍यायोगे ``स्वच्छतेतून समृध्दीकडे'' ही संकल्पना मूर्तरुपात येणे अपेक्षित आहे. अस्वच्छ परिसर व वैयक्तिक स्वच्छते अभावी उदभावणाऱ्या रोगांमुळे पिडीत असलेल्यांची आकडेवारी वाढत आहे, त्यामुळे स्‍वच्‍छतेतून लोकांचे आरोग्‍यमान उंचावण्‍यासाठी शासनही प्रयत्नशील असुन संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान,  निर्मल भारत अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना यांसारख्‍या योजनांमध्‍ये ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन स्‍वच्‍छतेचे महत्‍व पटविण्‍यात येत आहे. परदेशात जाऊन आल्‍यानंतर आपण तेथील शहरांची स्वच्छता पाहुन त्यांचे गुणगान गातो,  मात्र तेथील स्वछता, शिस्त,  सौंदर्य,  सृष्टी व हिरवळ वाखाणण्याजोगी आहे,  ती केवळ तेथे राहणाऱ्या लोकांमुळेच हेदेखील विसरता कामा नये. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, पण परिसराशी आपल्‍याला काही देणेघेणे नसते. अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात येऊन आपला घामाचा पैसा व वेळ वाया जात आहे. आज सार्वजनिक ठिकाणी बस, ट्रेन, इमारती, कार्यालये, उदयान, रस्‍ते  या ठिकाणी आपल्याला अस्वच्छतेचे साम्राज्‍य दिसते. कुठेही थुंकणे,  पान खाऊन पिचकारणे, सिगारेटची थोटके,  खाद्यपदार्थांची वेष्टने, कागदाचे तुकडे, तंबाखू, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगविलेल्या भिंती दिसतील. आपल्याकडील नदया व नाले या सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी बनल्या आहेत. कचऱ्याचे डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत. अनेक रोग हे अस्वच्छतेमुळे होत आहेत. 
आपल्‍या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकानेच अंगी बाळगावयास हवी. आपण केवळ वैयक्तिक स्वच्छतेवरच भर न देता सामुदायिक पातळीवर एकत्र येवून काम केल्यास आपले शारीरिक स्वास्थ्य व सामाजिक स्वास्थ्य टिकण्यास व वृध्दींगत होण्यास मदत होईल. स्‍वच्‍छतेमुळे आपण केवळ वैयक्तिक स्वार्थ साधत नाहीतर, ती एक मोठी देश सेवा व निसर्ग सेवाही आहे.
आपल्‍या सभोवतालचा परिसर स्‍वच्‍छ राखण्‍यासाठी वैयक्तिक पातळीवर खूप गोष्‍टी करता येतात. आजकाल जागोजागी पसरलेल्‍या क-चयामध्‍ये सर्वात मोठया प्रमाणावर दिसणारा घटक म्‍हणजे प्‍लॅस्टिक. एकतर प्‍लॅस्टिकचे विघटन होत नाही व हा प्‍लॅस्टिकचा कचरा आरोग्‍यासाठी खूप घातक आहे. त्‍यामुळे आपण सर्वांनी प्‍लॅस्टिक पिशव्‍या व प्‍लॅस्टिकचे आवरण असलेले खादयपदार्थ वापरणे बंद करायला हवे तसेच प्‍लॅस्टिकचे विघटनदेखील योग्‍य मार्गाने करायला हवे. सार्वजनिक ठिकाणी कचरा न फेकणे, न थुंकणे या बाबीदेखील कटाक्षाने पाळल्‍या पाहिजेत. घरातील व सोसायटीतील   कच-याची योग्‍य त्‍या ठिकाणी ओला – सुका वर्गीकरण करुन विल्‍हेवाट लावली गेली पाहिजे. जमेल तशी व तेव्‍हा परिसराची स्‍वच्‍छता केली पाहिजे व इतरांनादेखील त्‍यासाठी प्रवृत्‍त करायला हवे. स्‍वच्‍छतेची सवय आपल्‍याला अधिक समृध्‍द व सुंदर बनवणारी असुन यासाठी सर्वांचा सक्रिय सहभाग अत्‍यंत मोलाचा आहे. 


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर