अशा मालिका हव्यातच कशाला

झी मराठी वाहिनी ही दर्जेदार मालिकांसाठी व निर्मितीसाठी ओळखली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून ह्या वाहिनीवर सुरू असलेल्या काही मालिका सुज्ञ प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या ठरत आहेत. वास्तवाशी कुठलाही संबंध नसलेल्या गोष्टी ह्या मालिकांच्या भागांतून दाखवण्यात येत आहेत. माझ्या नवऱ्याची बायको, अग बाई सासूबाई ह्या मालिकांमध्ये दाखवण्यात आलेली पात्रे उघड उघड अनैतिक संबंध व विवाहबाह्य प्रेमप्रकरणांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत. मग तो नवऱ्याची बायको मधला गुरुनाथ असो की सासूबाई मधला सोहम. मालिका लांबवायची म्हणजे किती व कशी यालाही मर्यादा हव्यात. काहीही दाखवून ते प्रेक्षकांच्या गळ्यात उतरवण्याच्या कवायतीला काय म्हणावे? झी वाहिनीच्या पुण्याईने घरोघरी पाहिल्या जाणाऱ्या या मालिकांमधून दाखवला जाणारा बीभत्सपणा, पोरकटपणा संस्कृतीला धरून नसून तो त्वरित थांबवला पाहिजे. त्याऐवजी प्रबोधनात्मक व ऐतिहासिक पात्रांवर आधारित मालिका झी ने प्रेक्षकांसमोर आणाव्यात व आपले वेगळेपण टिकवून ठेवावे. प्रेक्षकांना चालते म्हणून टीआरपी साठी काहीही खपवायचा प्रयत्न करू नये. झी तर्फे आज अनेक चांगले उपक्रम, कार्यक्रम सुरू आहेत मात्र अवास्तव व संस्कृतीला गालबोट लावणाऱ्या लांबलचक मालिकांना कुठेतरी आवर घालण्याची गरज आहे. तरुणाई व कौटुंबिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या असल्या उद्देशहीन मालिका हव्यातच कशाला? 

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त